४ जून या दिवशी तासाभरात पुणे शहर जलमय !

वाहतूककोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप !

पुणे – मान्सूनपूर्व पावसाने ४ जून या दिवशी अवघ्या तासाभरात शहर जलमय केले. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार वडगावशेरीत अवघ्या तासाभरात ११४ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे धानोरीत मुख्य रस्त्यावर ४ फुटांहून अधिक पाणी साचून तळी साचली होती. वडगावशेरीसह स्वारगेट, नगररस्ता, खराडी, कात्रज, धनकवडी, सातारा रस्ता, विठ्ठलवाडी, धायरी, स्वारगेट, गोखलेनगर, शिवाजीनगर, पुणे स्थानक भागांतही अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते, तसेच लक्ष्मीनगर येथे डोंगरावरून आलेले पाणी थेट रस्त्यावर आल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरण्यासह चारचाकी वाहनेही अडकून पडली होती. त्यामुळे रस्त्यांवर दुतर्फा वाहतूककोंडी झाल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

महापालिकेचा कामचुकारपणा !

दुसरीकडे अवघ्या काही वेळामध्ये इतके पाणी साचले, तरी महापालिकेचे जवळपास सर्वच कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या निकालात असल्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी कुणीही उपलब्ध नसल्याने नागरिकांनीच पुढाकार घेत पाण्याला वाट करून दिली. धानोरीमधील लक्ष्मीनगर येथे सर्वाधिक हानी झाली आहे. नागरिक, तसेच लोकप्रतिनिधी यांनी वारंवार मागणी करून या भागात महापालिकेकडून कामेच केली जात नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे. पुण्यातील अनेक भागांत ७ घंटे वीजपुरवठा खंडित झाला. आधी वीजपुरवठा खंडित झाला, त्यानंतर जोरदार पाऊस चालू झाला, तर काही ठिकाणी पाऊस झाल्यावर वीजपुरवठा खंडित झाला.

संपादकीय भूमिका 

प्रशासन नागरिकांच्या समस्यांची स्वत:हून नोंद घेऊन काही कृती करणार का ?