कायद्याचा आडोसा घेऊन स्वार्थ साधणार्‍यांना उत्तरप्रदेश सत्र न्यायालयाकडून चपराक !

उत्तरप्रदेशमधील बरेलीमध्ये सत्र न्यायाधीश ज्ञानेंद्र त्रिपाठी यांनी नुकत्याच एका बलात्काराच्या खटल्यामध्ये मुलीला दिलेल्या शिक्षेने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सदर मुलीने एका तरुणावर मिठाईतून अमली पदार्थ खायला घालून स्वतःचे अपहरण करून स्वतःवर बलात्कार केल्याची तक्रार वर्ष २०१९ मध्ये केली. तेव्हापासून संबंधित तरुण कारागृहात होता. हा खटला चालू असतांना उलटतपासणीच्या वेळी या मुलीने स्वतःचा जबाब फिरवून त्या वेळी त्या मुलाने आपल्याशी कुठलेही गैरकृत्य केले नसल्याचा जबाब दिला. यानंतर या तरुणाची निर्दोष म्हणून सुटका झाली. यानंतर या तरुणीवर भा.दं.वि. १९५ नुसार (जन्मठेप किंवा ७ वर्षे किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्याच्या हेतूने खोटे पुरावे देणे किंवा बनवणे) खटला प्रविष्ट (दाखल) झाला आणि यात वर उल्लेखिलेल्या न्यायमूर्तींनी या तरुणीला संबंधित तरुण जितके दिवस खोट्या आरोपांमुळे कारागृहात होता, म्हणजे १ सहस्र ६५३ दिवस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याचसमवेत हा तरुण इतके दिवस कारागृहात असल्यामुळे तितक्या दिवसांचा उत्तरप्रदेश सरकारचा अकुशल कामगार भत्ता, म्हणजे एकूण ५ लाख ८८ सहस्र रुपयाचा दंड या तरुणाला देण्याचे आदेश दिला, तसेच जर दंड भरला नाही, तर अजून ६ मासांचा कारावास अशी शिक्षा सुनावली.

१. स्वार्थासाठी पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेला माध्यम बनवणे आपत्तीजनक !

श्री. अनिकेत विलास शेटे

भारतात बलात्कार आणि स्त्री अत्याचाराशी संबंधित गुन्ह्यांची गंभीर नोंद घेतली जाते. याविषयी समाजमनही संवेदनशील आहे. यासंबंधीचे कायदे हे स्त्रियांच्या रक्षणासाठीच बनवले आहेत; पण इथेसुद्धा सध्या बर्‍याच प्रकरणात पैशाच्या मोहापायी किंवा स्वतःच्या अहंकारासाठी पुरुषांवर खोटे आरोप लावून त्यांना तुरूंगात जायला भाग पाडणे किंवा कारावासाच्या भीतीने त्यांच्याकडून पैसे उकळ्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रवृत्तींना हा निकाल, म्हणजे सणसणीत चपराक आहे. सदर न्यायाधिशांनी याविषयी टिपणी करतांना म्हटले, ‘‘संपूर्ण समजासाठी ही स्थिती गंभीर आहे. केवळ आपल्या स्वार्थासाठी पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेला माध्यम बनवणे आपत्तीजनक आहे. असे अनुचित लाभ घेण्यासाठी स्त्रियांना पुरुषांच्या हितसंबंधाना बाधा आणता येणार नाही. हा निकाल त्या स्त्रियांसाठी एक महत्त्वपूर्ण उदाहरण बनेल, ज्या केवळ पैसे कमवण्यासाठी पुरुषांवर खोटे आरोप करतात.’’

२. कठोर शिक्षा अवलंबल्यास समाजात वचक निर्माण होईल !

देशातील अन्य न्यायालयांनी या निकालाचा संदर्भ घेऊन खोटे आरोप करून न्यायालय आणि पोलीस प्रशासन यांचा वेळ फुकट घालवणार्‍या प्रवृत्तींना अशीच कडक शिक्षा देणे आरंभले, तर समाजात नक्कीच वचक निर्माण होईल.

३. धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता दर्शवणारी घटना !

भारतीय समाजात आजही स्त्रीला मानाचे आणि आदराचे स्थान आहे. हे आदराचे स्थान समाजाच्या मनात टिकवून ठेवण्याचे दायित्व हे स्त्रीचेही आहे. अशाच खोट्या खटल्यांची संख्या वाढली, तर बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांचे गांभीर्य अल्प होऊन जाईल आणि ज्या खर्‍या पीडित महिला आहेत, त्यांच्याकडेही समाज (म्हणजे पोलीस प्रशासन, न्यायव्यवस्था) संशयाने पाहील. स्त्री आणि पुरुष हे दोन समाजघटक धर्माचरणी झाले, तर असे गुन्हे घडणार नाहीत अन् अशा कायद्यांचा गैरवापर करायची इच्छा कुणाला होणार नाही. यावरून सांप्रत काळात धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हे दिसून येते.

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– श्री. अनिकेत विलास शेटे, प्रमाणित आर्थिक सल्लागार, चिंचवड, जिल्हा पुणे.