वात दोष वाढण्यामागील कारणे आणि उपाययोजना

एका पाठोपाठ एक विरुद्ध गोष्टी कराव्याशा वाटणे किंवा आताच्या काळात ‘मूड स्विंग्ज’ (स्वभावात पालट) हे नवीन नाही; विशेषतः मध्यमवयीन स्त्रियांमध्ये ! स्वभावाची रुक्षता, स्वभाव लगोलग पालटत रहाणे, मनाची चंचलता, एका गोष्टीवर मन स्थिर न होणे, निर्णय घेण्याची क्षमता न्यून होणे, कुठल्याही गोष्टीचा अधिक ताण येणे, ही सगळी वाताची मनावर दिसणारी लक्षणे आहेत. सध्याच्या युगात त्या मानाने अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असणारा दोष म्हणजे वात दोष ! या व्यतिरिक्त मनाचा कोरडेपणा किंवा भावनिकता न्यून होणे, हे सुद्धा शरिरातील स्निग्धता न्यून झाल्याचे लक्षण आहे.

१. वात कशामुळे वाढतो ?

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

सतत कोरडा आहार, गाडीवरून भरपूर प्रवास, जागरण, चिंता ही झाली सामान्य कारणे. स्थूलता न्यून करण्यासाठी, आवडत नाही म्हणून ‘कोलेस्टेरॉल’ अधिक झाले म्हणून तेल, तूप बंद करून रात्री केवळ छोट्या धान्याचे पदार्थ, गोड पूर्ण बंद करणे; वात प्रकृती असतांना कमी, अगोड, कडू खाणे, पुष्कळ व्यायाम करणे, पोट साफ नसणे या सगळ्या गोष्टी वात वाढवतात. वात वाढला की, कुठल्याही भाव पदार्थाचा क्षय होणार, हे साधारणपणे लक्षात घ्या. त्यात हाडे झिजणे, केस गळण्यापासून कानाची ऐकण्याची शक्ती, मेंदूची विचारशक्ती, स्नायूंची शक्ती, मनाचा आघात सहन करण्याचा स्वभाव न्यून होणे इथपर्यंत विविध लक्षणे दिसू शकतात.

वयपरत्वे साधारण वात वाढत जातोच; परंतु सध्या पुष्कळ लहान वयात ही लक्षणे दिसतात की, जे धोकादायक आहे. स्निग्धता टिकवून ठेवणे, हा वात शांत ठेवण्याचा उपाय आहे. तूप, दूध, अभ्यंग, शिरोधारा, नस्य, औषधी तूप सेवन आणि काही रसायन औषधी याने ही स्निग्धता टिकते. पुष्कळ अधिक प्रमाणात साबण लावणे, हेही वात वाढण्याचे पटकन न कळणारे असे कारण आहे, तेही टाळावे. नात्यातील ताणतणाव वाढणे आणि कामातील ताण हे दोन्ही वातदोष वाढवते. वात दोष वाढला की, ताण सहन करायची क्षमता न्यून होते.

२. वात न्यून करण्यासाठीचे उपाय

अशा या दुष्टचक्रातून सुटका करायला आधी शरीर आणि मन स्निग्ध करणे, हा उपाय उत्तम काम करतो. एकमेकांशी स्नेहार्द्रतेने वागणे, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, तुलना या भावना मनाबाहेर ठेवायचा प्रयत्न करणे, हेही त्यातीलच काही उपाय. वाढती स्पर्धा, स्वतःच्याच स्वतःच्या आयुष्याकडून असणार्‍या अधिकच्या अपेक्षा, त्यातून येणारे असमाधान आणि त्यात बाकी वर वर्णन केलेली वात वाढण्याची कारणे यांना दूर ठेवायचा सगळ्यांनी नक्कीच तरुण वयापासून प्रयत्न करायला पाहिजे, जेणेकरून वय वाढल्यामुळे नैसर्गिकरितीने वाढणारा वात हा आटोक्यात रहायला साहाय्य होते.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (१.६.२०२४)