७९ दिवसांनंतर पंढरपूर येथे वारकर्‍यांना श्री विठुरायाचे पदस्पर्श दर्शन चालू !

वारकर्‍यांमध्ये अलोट उत्साहाचे वातावरण !

डावीकडून पदस्पर्श दर्शन खुले झाल्यावर नयनविभोर रूपातील श्री विठ्ठलाची मूर्ती आणि वारकर्‍यांचा भाव जागृत करणारी विलोभनीय श्री रुक्मिणीदेवीची मूर्ती

पंढरपूर – गेले ७९ दिवस ज्या पांडुरंगाच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी वारकरी आसुसलेले होत. अखेर तो दिवस २ जून, म्हणजेच वैशाख कृष्ण एकादशीला उजाडला. पहाटे ४ वाजता ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’चे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री विठ्ठलाची पूजा करण्यात आली. या प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित हाते. सकाळी ७ वाजल्यापासून सर्व वारकर्‍यांसाठी पदस्पर्श दर्शन खुले झाले आहे.

‘‘आजी सोनियाचा दिनु। वर्षे अमृताचा घनु। हरी पाहिलारे हरी पाहिलारे। सबाह्यभ्यंतरीं अवघा व्यापक मुरारी।’’

हा दिवस म्हणजे ‘‘आजी सोनियाचा दिनु। वर्षे अमृताचा घनु। हरी पाहिलारे हरी पाहिलारे। सबाह्यभ्यंतरीं अवघा व्यापक मुरारी।’’ अशीच वारकर्‍यांची स्थिती होती. राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या वारकर्‍यांनी साश्रूपूर्ण नयनांनी श्री विठ्ठलाच्या गजरात दर्शनानंद लुटला.

शासनाने दिलेल्या ७५ कोटी रुपयांमध्ये मंदिराचे सुंदर काम ! – पालकमंत्री  चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

या प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने ७५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून गेले २ महिने काम चालू आहे. शासनाने दिलेल्या निधीमधून अत्यंत सुंदर काम झाले आहे. पूर्वी केवळ सकाळी ११ वाजेपर्यंत मुखदर्शन होते; मात्र आता सर्वांना दर्शन खुले करण्यात आले असून महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्यासाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.’’

काही प्रतिक्रिया

१. श्री. विद्याधर ताटे, ज्येष्ठ वारकरी अभ्यासक – वारकर्‍यांना आजपासून अपूर्व आनंद मिळाला आहे. मंदिराला प्राचीन स्वरूप देण्यात आले आणि यातून हिंदूंची मंदिरे कशी होती ?, हे पहायला मिळाले. अशीच पावित्र्यता, स्वच्छता, मोकळेपणा रहावा. वर्ष १८८७ पूर्वी श्री विठ्ठलाला आलींगन देऊन मग पदस्पर्श दर्शन घेण्याची परंपरा होती. यानंतर मात्र आज केवळ पददर्शन चालू आहे.