रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ३ दिवसांचा ‘चंडी याग’ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८२ वा जन्मोत्सव !

यागासाठी केलेल्या देवतांची, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राची मांडणी !

रामनाथी (गोवा), २९ मे (वार्ता.) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त २८ ते ३० मे या कालावधीत येथील सनातनच्या आश्रमात ‘चंडी याग’ केला जात आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तसेच सनातनचे संत यांच्या वंदनीय उपस्थितीत हा याग होत आहे. ३० मे या दिवशी तिथीनुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा वाढदिवस आहे.

यागाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २८ मे या दिवशी सनातनच्या पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी या यागात दशद्रव्य मिश्रित पायस आदी द्रव्यांनी हवन केले.  ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्युयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळावे, तसेच साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील त्रास दूर व्हावेत अन् लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशांच्या पूर्तीसाठी हा याग करण्यात येत आहे.

यज्ञाच्या वेळी मिळालेली दैवी साक्ष : यागाच्या आदल्या दिवशी आश्रमातील कमळपिठामध्ये दोन कमळे फुलली.