मॉस्को (रशिया) – रशिया तालिबानचे नाव प्रतिबंधित आतंकवादी संघटनांच्या सूचीतून हटवणार आहे. रशियाची सरकारी वृत्तसंस्था ‘आर्.आय.ए. नोवोस्ती’ने ही माहिती दिली. गेल्या वर्षाच्या अखेरीस कझाकिस्तानने तालिबानचे नाव प्रतिबंधित आतंकवादी संघटनांच्या सूचीतून हटवले होते. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथे होणार्या आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचासाठी रशियाने तालिबानलाही आमंत्रित केले आहे. हा कार्यक्रम ५ ते ८ जून या कालावधीत होणार आहे. वर्ष २०१८ मध्ये रशियाने तालिबान आणि तत्कालीन अफगाणिस्तान सरकार यांच्यात करार करण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी सांगितले की, कझाकिस्तानने अलीकडेच तालिबानच्या संदर्भात हा निर्णय घेतला असून आम्हीही लवकरच आमच्या या विषयीच्या निर्णयाची कार्यवाही करू. तालिबान ही खरी शक्ती आहे. आम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे नाही. मध्य आशियातील आमचे सहयोगीही त्यांच्यापेक्षा वेगळे नाहीत.