Sinicization Of Islam In China : चीनमधील अस्तित्वात असलेल्या अरबी शैलीतील शेवटच्या मशिदीवरील घुमट आणि मिनार हटवले !

बीजिंग (चीन) : चीनमध्ये अस्तित्वात असलेल्या अरबी शैलीतील शेवटच्या मोठ्या मशिदीच्या इमारतीत अनेक पालट करण्यात आले आहेत. मशिदीचे घुमट आणि मिनार पालटण्यात आले आहेत. ‘ही मशीद म्हणजे अरबी शैलीत बांधलेल्या इमारतीऐवजी चिनी शैलीमध्ये बांधलेली इमारत आहे’, अशा प्रकारे पालट करण्यात आले आहेत. सरकारी मोहिमेचा भाग म्हणून देशातील मशिदींमध्ये पालट केले जात आहेत. याअंतर्गत मशिदीचे घुमट आणि मिनार, तसेच मशिदीच्या वर असणारी चंद्रकोरही हटवण्यात आली आहे. विशेषत: चीनच्या शिनजियांग प्रांतात ही मोहीम राबवण्यात येत आहे.

१. वर्ष २०१८ मध्ये चीन सरकारने ‘इस्लामचे चिनीकरण’ करण्यासाठी पंचवार्षिक योजना घोषित केली. या योजनेअंतर्गत हे केले जात आहे. या योजनेचा उद्देश विदेशी स्थापत्यशैलींना विरोध करणे आणि चिनी वैशिष्ट्यांसह इस्लामी वास्तूकलेचा प्रचार करणे हा आहे.

२. एप्रिल २०१६ मध्ये राष्ट्रीय धार्मिक कार्य परिषदेत राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ‘इस्लामचे चिनीकरण’ या संकल्पनेबद्दल बोलले होते.

चिनीकरण म्हणजे काय ?

चिनीकरण म्हणजे चिनी संस्कृतीत गैर चिनी समाजाला समाविष्ट करून घेणे. यामध्ये मुसलमानांना चीनची संस्कृती, विचार आणि वांशिक नियम यांमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी इस्लामी नियमांमध्ये पालट करण्यावर भर देण्यात आला आहे. अलीकडच्या काळात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी इस्लाम, ख्रिस्ती आणि इतर धार्मिक अल्पसंख्यांकांचे चिनीकरण करण्याचे वारंवार आवाहन केले आहे. या मोहिमेसाठी चीनवर सातत्याने मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप होत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या वर्ष २०२२ च्या अहवालात चीन सरकारने शिनजियांगमध्ये मानवाधिकारांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका होऊनही चीन त्याच्या धोरणापासून मागे हटलेला नाही.

‘ह्युमन राइट्स वॉच’च्या नोव्हेंबर २०२३ च्या अहवालात असे म्हटले आहे की मशिदी आणि मुसलमान यांवर विविध निर्बंध लादण्याची चीन सरकारची मोहीम शिनजियांग, निंग्जिया आणि गान्सू प्रांतांपर्यंत विस्तारली आहे.

३. वर्ष २०१७ मध्ये चीन सरकारने मुसलमानांविषयी कठोर भूमिका घेण्यास आरंभ केला. तेव्हापासून चीनने मुसलमानांविरुद्ध केलेल्या कारवाईचे वर्णन ‘धार्मिक आतंकवाद दूर करण्यासाठी केलेला प्रयत्न’ असा केला आहे. यामध्ये उघूर मुसलमानांच्या अनेक धार्मिक विधींवर बंदी घालण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात अटकही करण्यात आली. शिनजियांगमधील मशिदी पाडल्याचा आरोपही चिनी अधिकार्‍यांवर करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

चीनने गेल्या काही वर्षांत देशातील मुसलमानांचे इस्लामीकरण रोखून त्यांचे चिनीकरण केले आहे. याविरोधात एकही इस्लामी राष्ट्र किंवा त्यांची संघटना तोंड उघडत नाही. या उलट भारतात मुसलमान हिंदूंवर आक्रमण करत असतांनाही ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’ अशी आवई उठवली जाते !