पुरणगाव (छत्रपती संभाजीनगर) येथील अवैध उत्खनन प्रकरणी ग्रामस्थांनी काम बंद पाडले !

आश्वासनानंतर ग्रामस्थांची माघार !

गोदावरी नदीपात्रात बंद पाडण्यात आलेले उत्खनन

वैजापूर – छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना कामासाठी तालुक्यातील पुरणगाव येथील गोदावरी नदीपात्रात गौण खनिज विभागाच्या नियम अन् अटी धाब्यावर ठेवून कंत्राटदार आस्थापनाने २ जेसीबीद्वारे वाळू उत्खनन करण्याच्या प्रकारावर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ‘वाळू घाटाचे शासकीय मोजमाप केल्याविना या ठिकाणाहून वाळूचे उत्खनन आणि वाहतूक करू देणार नाही’, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. तहसीलदार सुनील सावंत यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जर्‍हाड यांच्याशी चर्चा करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वाळू घाटात कंत्राटदाराने किती वाळूचा उपसा केला, याची पडताळणी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी दुपारी नदीपात्र सोडले.