गोव्यातील उष्णतेत वाढ, तर कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज !
नवी देहली – देशात उष्णतेमुळे हाहा:कार माजला आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने देहलीसह ९ राज्यांमध्ये पुढील ५ दिवस उष्णतेची लाट येण्याची चेतावणी दिली आहे. यांमध्ये देहली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, बिहार आणि बंगाल या राज्यांचा समावेश आहे. याखेरीज आसाम, त्रिपुरा, ओडिशा, झारखंड आणि गोवा या राज्यांतील उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
१७ मे या दिवशी उष्णतेच्या लाटेची चेतावणी दिलेल्या ९ राज्यांतील अनेक शहरांमधील तापमान ४३ ते ४६ अंश इतके नोंदवले गेले. आगरा येथे तर कमाल तापमान ४६.९ अंशांवर पोचले होते.
दक्षिण भारतात मुसळधार पावसाची चिन्हे !
दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ५ दिवस तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी येथे मुसळधार पाऊस पडेल. कर्नाटकात २० मेपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १७ ते २१ मे या कालावधीत कर्नाटकातील शिवमोग्गा, चिक्कमगळुरू, कोडागु, हसन, म्हैसुरू, मंड्या, चामराजनगर, उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.