पाटलीपुत्र (बिहार) येथील शाळेच्या गटारात सापडला ४ वर्षांच्या मुलाचा मृतदेह

  • मुलाच्या संतप्त नातेवाइकांनी शाळेला आग लावली !

  • पोलिसांकडून हत्येचा गुन्हा नोंद !

पाटलीपुत्र (बिहार) – येथील टायनी टॉट अ‍ॅकॅडमी या शाळेच्या नाल्यामध्ये ४ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने संतप्त झालेल्या मुलाच्या नातेवाइकांनी संपूर्ण शाळाच पेटवून दिल्याची घटना १७ मे या दिवशी घडली. यामुळे येथे सध्या तणावाची स्थिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांना कह्यात घेतले आहे.

१. शाळेतून हा मुलगा घरी परत न आल्यामुळे मुलाचे पालक चिंताग्रस्त झाले. ते चौकशीसाठी शाळेत पोचले. शाळेने मुलगा शाळा सुटल्यावर घरी गेल्याचे सांगितल्यावर पालकांनी आणि नातेवाइकांनी मुलाचा शोध चालू केला. त्या वेळी त्यांना मुलाचा मृतदेह शाळेजवळील नाल्यात सापडला. यामुळे नातेवाइकांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी शाळाच पेटवून दिली. तसेच शाळेसमोरचा रस्ता बराच काळ अडवून ठेवला. त्यामुळे या भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. काही जणांनी रस्त्यावरच गाड्यांचे टायरही जाळले.

२. या प्रकरणात पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे. पोलीस अधीक्षक चंद्रप्रकाश यांनी सांगितले की, शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये आम्ही या मुलाला शाळेत जातांना पाहिले; पण पुढच्या संपूर्ण चित्रीकरणामध्ये हा मुलगा शाळेतून बाहेर येतांना दिसला नाही. या प्रकरणात हत्येचाच गुन्हा नोंदवण्यात येत आहे. मृतदेह लपवण्यात आल्याचे दिसून आल्यामुळे त्याच दिशेने आमचे अन्वेषण चालू आहे. शाळेच्या आवारात मृतदेह सापडल्यामुळे शाळेशी संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे