१. झारखंडमध्ये ग्रामविकास मंत्र्याचा कोट्यवधीचा घोटाळा
‘झारखंडच्या सरकारमध्ये आलमगीर आलम हे ग्रामविकास खात्याचे मंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि नंतर चंपाई सोरेन या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीत आलमगीर हेच ग्रामविकास मंत्री आहेत. नुकतेच अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) झारखंडमध्ये ६ ठिकाणी धाड घातली. त्यात त्यांना कोट्यवधी रुपयांचे घबाड मिळाले. या खात्याचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांच्याशी संबंधित २४ ठिकाणांवर या धाडी घालण्यात आल्या. आलम यांच्या संजीव कुमार लाल या स्वीय सचिवाच्या नोकराकडे ३५ कोटी रुपये सापडले. त्यानंतर आलमगीर आलम आणि संजीव कुमार लाल यांना अटक करण्यात आली होती. यासमवेतच बांधकाम व्यावसायिक मुन्ना सिंह यांच्याशी संबंधित ठिकाणीही धाड घालण्यात आली. त्यांच्याकडेही कोट्यवधी रुपये सापडले.
या भ्रष्टाचाराचा प्रारंभ वर्ष २०१९ मध्ये झाला. वर्ष २०१९ मध्ये सुरेश प्रसाद वर्मा या कनिष्ठ अभियंत्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले होते. त्यानंतर वर्ष २०१३ च्या फेब्रुवारीत अभियंता वीरेंद्र राम याला अटक झाली. त्याच्याकडेही बेहिशोबी संपत्ती सापडली. वीरेंद्र राम याच्या विरोधात आर्थिक अफरातफरीचे गुन्हे नोंदवण्यात आले. त्या वेळी २४ ठिकाणी धाडी घालण्यात आल्या होत्या. हा घोटाळा ‘प्रारूप निविदा अनुदान घोटाळा’ या नावाने ओळखला जायचा. या प्रकरणातही आलमगीर यांचे नाव घेण्यात आले होते. तेव्हापासून हे प्रकरण वर्ष २०२४ पर्यंत चालू आहे. त्या वेळी वीरेंद्र राम याच्या चुलत भावावरही धाड घालण्यात आली होती आणि त्यांच्याकडेही प्रचंड पैसा सापडला.
२. मंत्र्यांच्या भ्रष्टाचारात कनिष्ठ कर्मचार्याची हानी
हे चालू असतांना शंभूनंदन या व्यावसायिकाने पोलिसांकरवी एक फौजदारी गुन्हा नोंदवला. त्यात पंकज मिश्रा यांच्याखेरीज प्रथमच मंत्री आलमगीर आलम यांचे नाव गोवण्यात आले. यात शंभूनंदन म्हणतो, ‘बार हरवा टोल प्लाझामध्ये त्याला सहभागी होऊ दिले नाही. पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात मंत्र्यांना ‘क्लिन चिट’ (निर्दाेषत्व) मिळाली.’ शंभूनंदन यांनी पंकज मिश्रा आणि मंत्री यांचे नाव घेतल्यानंतर ते अन्वेषण तेथेच सोडून देण्यात आले नाही. अंमलबजावणी संचालनालयाने पंकज मिश्राला अवैध खाण घोटाळ्याच्या चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर ९.५.२०२४ या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने स्वीय सचिव संजीव लाल आणि त्यांच्या नोकराच्या घरी धाडी घातल्या.
३. आलमगीर आलमचा उद्दामपणा आणि त्यांना अटक
काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली होती. ती झारखंडमध्ये आल्यानंतर आलम यांच्यासारख्या मंत्र्यांना त्यापासून लांब ठेवण्यात आले होते. प्रत्येक वेळी खालच्या स्तरावर काम करणार्या व्यक्तींची हानी केली जाते आणि आलम यांच्यासारख्या मंत्र्याचे व्यवहार चालूच असतात. ही व्यक्ती ४ वेळा आमदार झाली आहे. त्यांना २ वेळा ग्रामविकास हे खाते मिळाले. या भ्रष्टाचाराविषयी आलम म्हणाले, ‘‘संजीव लाल हे केवळ माझ्या एकट्याचे सचिव नव्हते, तर ते आणखीही अनेक मंत्र्यांसमवेत सचिव पदावर कार्यरत होते. त्यामुळे या मिळालेल्या पैशाशी माझा संबंध नाही.’’ ‘कृतीनुसार फळ मिळणारच असते’, असे कर्मफलन्याय सिद्धांत सांगतो, त्याप्रमाणे आलमगीर आलम यांना १५ मे २०२४ या दिवशी ‘ईडी’ने अटक केली आहे.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (१२.५.२०२४)