सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष इतरांची उणीदुणी काढण्यात अधिक स्वारस्य दाखवत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केल्यास गेल्या २० वर्षांत राज्यातील जनतेने सर्वच राजकीय पक्षांना राज्याची सत्ता भोगण्याची संधी दिली आहे, त्यामुळे कुणाची किती पात्रता आहे ? कोणता पक्ष आणि कोणता नेता किती भ्रष्ट आहे ? कुणाला जनतेची काळजी आहे ? याविषयी नागरिकांचा चांगलाच अभ्यास झाला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी इतरांवर टीकाटिपणी करून स्वतःची पात्रता लोकांसमोर उघडी करण्याऐवजी येणार्या
५ वर्षांत देशाचा पर्यायाने समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, बाह्य आणि देशांतर्गत सुरक्षेसाठी, नागरिकांची शैक्षणिक, आर्थिक अन् सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी, स्त्रियांसह अबाल-वृद्धांना देशात भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी, राज्यातील बहुसंख्य हिंदूंना त्यांचे धार्मिक अधिकार मिळवून देण्यासाठी, लोकसंख्या नियंत्रणासाठी आणि देशात सुराज्य आणण्यासाठी काय प्रयत्न करणार ? याविषयी ठामपणे अन् प्रतिज्ञापूर्वक सांगितल्यास त्यांच्याप्रती नागरिकांचा विश्वास निर्माण होण्याची संधी अधिक बळावू शकते.
स्वातंत्र्यपूर्व काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा’ (तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन) असे म्हणताच सहस्रोंच्या संख्येने तरुण पुढे आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली देशासाठी प्राणार्पण करणार्या तरुणांचा प्रचंड मोठा गट सशस्त्र क्रांतीसाठी सिद्ध झाला. इंग्रजांनी नागरिकांवर किती अत्याचार केले ? याचा केवळ पाढा न वाचता त्या इंग्रजांना देशातून हाकलून लावण्यासाठी लढा उभारून जनतेला त्यात सहभागी होण्याचे आवाहन करणारी असंख्य थोर मंडळी या देशात होऊन गेली. या मंडळींच्या नेतृत्वाखाली अनेकांनी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले, कित्येकांनी आपल्या प्राणांचीही बाजी लावली. या मंडळींनी घेतलेल्या पुढाकारामुळे आणि केलेल्या त्यागामुळे आपण आज स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. या सर्वांचे एकच ध्येय होते आणि ते म्हणजे या मातृभूमीला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करून स्वातंत्र्य आणणे. आज किती राजकीय पक्षांचे ध्येय ‘देशात सुराज्य आणण्याचे आहे’ आणि किती जणांचे ध्येय ‘सत्तेचा मलिदा लाटण्याचे आहे ?’, हे जनता चांगलेच ओळखून आहे. निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या राजकीय नेत्यांमध्ये ‘दगडापेक्षा वीट मऊ’ असे बघून त्यातल्या त्यात कोण अल्प स्वार्थी आहे, हेच पहाण्याचे आजच्या जनतेच्या नशिबी आहे; परंतु त्याला इलाज नाही. येत्या काळात सुराज्य आणण्यासाठी जनतेने त्यातल्या त्यात योग्य असा प्रतिनिधी निवडणे, ही काळाची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधींनीही काळाचे भान ठेवून जनतेला देत असलेल्या आश्वासनांविषयी योग्य ती सूत्रे मांडणे आवश्यक आहे !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.