‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गा’त सांगितल्याप्रमाणे कृती केल्याने रुग्णावर प्रथमोपचार करून प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता आल्याची काही उदाहरणे !

समाजातील सर्व स्तरांवरील लोकांना लाभदायक ठरलेले हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणारे विनामूल्य ‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग’ !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी ‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग’ घेतले जातात. ‘दैनंदिन जीवनातील कठीण प्रसंगांना धिराने सामोरे जाता यावे आणि आपत्काळात श्रद्धावान हिंदू अन् संत यांना साहाय्य करता यावे’, यासाठी या प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गांचे आयोजन करण्यात येते. या वर्गांना ग्रामीण आणि शहरी भागांतील धर्मप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वर्गांमध्ये ‘वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंत रुग्णाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर आधार कसा द्यावा ?’, हे शिकवण्यात येते. प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गात शिकवल्याप्रमाणे समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रथमोपचार वर्गात येणार्‍या समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील, तसेच वेगवेगळ्या वयोगटांतील लोकांनी काही वास्तविक प्रसंगांत रुग्णांवर प्रथमोपचार केले. त्यांचा त्या रुग्णांना लाभ झाला, तसेच देवाचे साहाय्य घेऊन प्रथमोपचार केल्याने कार्यकर्ते आणि समाजातील लोक यांच्यात अनेक गुणांचे संवर्धनही झाले. या संदर्भातील काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. सौ. विनया जोशी, भुसावळ, जिल्हा जळगाव.

१ अ. गावातील एका गृहस्थाने पत्नीला त्रास झाल्यावर साहाय्य मागणे आणि देवाच्या कृपेने तिच्यावर प्रथमोपचार करण्याची संधी मिळणे : ‘मी नांद्रा (जिल्हा जळगाव) येथे रहात होते. तिथे रहाणारे एक गृहस्थ साहाय्यासाठी माझ्याकडे आले. ते पुष्कळ घाबरलेल्या स्थितीत होते. त्यांनी सांगितले, ‘‘माझ्या पत्नीला काहीतरी झाले आहे. तुम्ही लवकर चला.’’ गावात तशी वैद्यकीय सुविधा नसल्याने मी लगेच त्या ताईला बघायला गेले. ‘ताई ७ मासांची गर्भवती होती आणि तिला झटके येत होते’, हे माझ्या लक्षात आले. तेथे लोकांनी पुष्कळ गर्दी केली होती. काही महिलांनी ताईचे हात-पाय धरून ठेवले होते. मी त्या महिलांना सांगितले, ‘‘असे करायला नको.’’

डॉ. (सौ.) साधना जरळी

मी लोकांना तेथून जाण्यास सांगून गर्दी न्यून केली आणि ताईला मानसिक आधार दिला. ती पूर्ण शुद्धीत नव्हती; पण प्रतिसाद देत होती. तिच्या यजमानांना सांगून मी तिला गावातील रुग्णालयात नेले. तिथून तिला जळगाव रुग्णालयात पाठवायचे होते. ‘गाडी मिळेपर्यंत तिचे नाडीचे ठोके आणि तिचा प्रतिसाद कसा आहे ? ती शुद्धीवर आहे का ?’, या गोष्टी मी पडताळत होते. गाडीची व्यवस्था झाल्यावर मी तिला जळगाव रुग्णालयात पाठवले. ‘देवाच्याच कृपेने या प्रसंगात स्थिर राहून मला प्रथमोपचार करता आला’, याबद्दल देवाच्या चरणी कृतज्ञता !

१ आ. एका महिलेच्या पायावर दगड पडून तिच्या पायाला सूज येणे, अंगठ्याचा अस्थीभंग झाला असल्याचे लक्षात येणे आणि त्यावर तिला प्रथमोपचार सांगणे : भुसावळ येथे रहात असतांना मला तेथील एका महिलेचा भ्रमणभाष आला. तिने सांगितले, ‘‘माझ्या पायावर धुणे धुण्याचा दगड पडून अंगठ्याला लागले आहे. अंगठा निळा पडून माझ्या पायाला सूज आली आहे आणि चालत असतांना मला वेदना होत आहेत.’’ तिला सायंकाळी वैद्यकीय साहाय्य मिळणार होते. ‘तोपर्यंत मी काय काळजी घेऊ ?’, असे त्या ताईने मला विचारले. ‘तिच्या पायाच्या अंगठ्याचा अस्थिभंग झालेला असू शकतो’, असे माझ्या लक्षात आले. मी तिला सांगितले, ‘‘तुम्ही चालणे आणि जिना उतरणे’, या कृती करू नका. शक्य असेल, तर पाय थोडा उंच स्थितीत ठेवा आणि एका कापडात बर्फ घेऊन पाय शेका.’’ त्यांनी त्याप्रमाणे केले.

१ आ १. रुग्णालयात गेल्यावर ‘महिलेच्या पायाला अस्थीभंग झाला असून प्रथमोपचारात सांगितल्याप्रमाणे विश्रांती घेतली नसती, तर शस्त्रकर्म करावे लागले असते’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे : सायंकाळी रुग्णालयात जाऊन आल्यावर ताईने मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘ताई, तुम्ही जे सांगितले, तेच आधुनिक वैद्यांनी मला सांगितले आणि १ मास पाय ‘प्लास्टर’मध्ये ठेवण्यास सांगितले. तुम्ही मला ‘चालू नका’, असे सांगितले; म्हणून मी सायंकाळपर्यंत विश्रांती घेतली. रुग्णालयात जाईपर्यंत माझ्या पायावरची सूज ओसरून वेदनाही न्यून झाल्या होत्या. आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तुम्ही विश्रांती घेतली नसती, तर तुमच्या पायाचे शस्त्रकर्म करावे लागले असते.’’ तेव्हा ताईला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती आणि माझ्याकडूनही देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

(क्रमशः)

संकलक : डॉ. (सौ.) साधना जरळी, समन्वयक, प्रथमोपचार प्रशिक्षण, हिंदु जनजागृती समिती. (१५.९.२०२३)

पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/794731.html