नवी देहली – नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (‘सीएए’च्या) अंतर्गत १५ मे या दिवशी नागरिकत्व प्रमाणपत्रांचा पहिला संच जारी करण्यात आला. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी नवी देहलीत १४ अर्जदारांना नागरिकत्व प्रमाणपत्रे सुपुर्द केली. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इतर अनेक अर्जदारांना ई मेलद्वारे डिजिटल स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र देण्यात आले जात आहेत. या वेळी गृह सचिवांनी अर्जदारांचे अभिनंदन करतांना नागरिकत्व सुधारणा कायद्यातील प्रमुख सूत्रांवर प्रकाश टाकला.
या कायद्याच्या अंतर्गत ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत धार्मिक छळामुळे किंवा त्यांच्या भीतीमुळे भारतात आलेले पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिस्ती या समुदायांतील व्यक्तींकडून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यात आले होते. अर्जांची पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पोर्टलद्वारे केली गेली. अधिकारप्राप्त समितीने केलेल्या पडताळणीनंतर १४ अर्जदारांना नागरिकत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर २०१९ मध्ये ‘सीएए’ अमलात आला होता.