एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावाला नरेंद्र मोदी यांनी होकार दिला ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई – एकनाथ शिंदे यांच्यासारख्या बाळासाहेब ठाकरे यांच्या खर्‍या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा विषय मी मांडला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला होकार दिला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला.

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मुख्यमंत्रीपदाचे दायित्व एकनाथ शिंदे समर्थपणे सांभाळत आहेत. उद्धव ठाकरे काँग्रेससमवेत जातील, असे कधीच वाटले नव्हते. अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचा शब्द आम्ही त्यांना कधीही दिला नव्हता. राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणे काही चुकीचे नाही; परंतु उद्धव ठाकरे यांना जनहितापेक्षा पद महत्त्वाचे वाटते, असे मला वाटते. राज ठाकरे हे वर्तमान पिढीला योग्य विचार देऊ शकणार्‍या नेत्यांपैकी एक आहेत. हिंदुत्वाच्या सूत्रावर ते पुन्हा स्थिरावले आहेत. याविषयी त्यांचे स्वागतच आहे. लोकसभेत आम्ही मनसेला जागा देऊ शकलो नाही, तरी विधानसभेत अवश्य विचार करू.’’