स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथाचे वैशिष्ट्य

१० मे २०२४ या दिवशी ‘१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभदिन’ आहे. त्या निमित्ताने…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘मॅझिनीचे चरित्र आणि राजकारण’ हा ग्रंथ लिहून हातावेगळा केला. त्यानंतर त्यांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला. या ग्रंथ लेखनासाठी आवश्यक असलेली साधने जमा करण्यास त्यांनी आरंभ केला. त्यासाठी त्यांना साहाय्य झाले ते इंडिया हाऊसचे व्यवस्थापक मुखर्जी यांचे ! याच मुखर्जींनी सावरकरांना मॅझिनीचे ग्रंथ मिळवून दिले होते. त्यांनी जॉन के. लिखित बंडाच्या इतिहासाचा पहिला खंड सावरकर यांना आणून दिला. या खंडाच्या अखेरीस बंडाच्या इतिहासाचे आणखीन ५ खंड प्रसिद्ध करण्यात आल्याची टीप सावरकर यांना आढळली. सावरकर यांनी लगेच मुखर्जींना ते सारे खंड आणून देण्याची विनंती केली. मुखर्जींनी सुद्धा अत्यंत वेगाने हालचाली करून त्या ५ खंडांचा शोध घेतला. तेव्हा त्यांना जॉन के. आणि मॅलेसन या लेखकद्वयींनी लिहिलेला बंडाचा समग्र इतिहास जो ६ खंडांत प्रसिद्ध झाला होता, ते सारे खंड त्यांनी केवळ ८ दिवसांत मिळवले अन् सावरकर यांना आणून दिले.

हे सारे खंड सावरकर यांनी एकाग्रतेने वाचले. इंग्रजांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्य युद्ध’ या विषयावर भरपूर साहित्य निर्माण केले असल्याचे सावरकर यांच्या लक्षात आले. हे सर्व साहित्य मिळवून सावरकर यांनी वाचण्याची इच्छा मुखर्जी यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनी ‘हे सर्व साहित्य ‘इंडिया ऑफिस’च्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत’, असे सांगून सावरकर यांना तिथे बसून सर्व साहित्य वाचण्ो आणि टिपणे काढण्ो यांची अनुमती मिळवून दिली. त्यामुळे सावरकर यांना ‘इंडिया ऑफिस’च्या ग्रंथालयात बसून सर्व प्रमुख कागदपत्रे वाचता आली. त्या ग्रंथालयाच्या ग्रंथपालाने १८५७ च्या संग्रामाचे साहित्य असलेल्या एका स्वतंत्र दालनात सावरकर यांना नेले. तिथे बसून सर्व ग्रंथ, मूळ कागदपत्रे यांचा अभ्यास करण्यास पूर्ण मोकळीक दिली. ग्रंथपालाने सावरकर यांना १८५७ शी संदर्भातील सर्व धारिका आणि कागदपत्रे उपलब्ध करून दिली. सावरकर यांची अभ्यासू वृत्ती पाहून तो ग्रंथपाल त्यांच्याशी १८५७ च्या युद्धावर चर्चा करू लागला.

‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ ग्रंथाचे मुखपृष्ठ

१. ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’चे लेखन पूर्ण न होण्यासाठी ब्रिटिशांनी आडकाठी आणणे

‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ लेखन करत असतांना सावरकर त्यातील घटनांवर शत्रूच्या शिबिरातच, म्हणजे लंडनमध्येच भाषण देऊ लागले. ही माहिती जेव्हा गुप्तचरांकडून सरकारला कळली, तेव्हा इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात सावरकरांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. असे असले, तरी सावरकरांना त्याची पर्वा नव्हती; कारण तोपर्यंत ग्रंथ लिहून झाला होता. ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ एप्रिल १९०८ मध्ये लिहून पूर्ण झाला. इंग्रजांच्या राजधानीत सावरकर यांनी मराठी भाषेत ग्रंथ लिहिला. या ग्रंथातील एक-दोन प्रकरणे चोरीला सुद्धा गेली होती. स्कॉटलंड यार्डची ही करामत होती. त्यासाठी स्कॉटलंड यार्डने कीर्तिकर नावाच्या एका मराठी भाषिक तरुणाचे साहाय्य घेतले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर

२. हिंदुस्थान, पॅरिस आणि जर्मनी येथे ग्रंथ छापण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न अन् आलेल्या अडचणी

काहीही झाले, तरी मोठ्या कौशल्याने या ग्रंथाची प्रत पोलीस किंवा गुप्तहेर यांना मिळणार नाही, याची काळजी घेऊन हिंदुस्थानात पाठवण्यात आली. ‘अभिनव भारत’चे सभासद असलेले लिमये यांच्या सोलापूरमधील छापखान्यात हा ग्रंथ छपाईसाठी सावरकर यांचे मोठे भाऊ बाबाराव यांनी पाठवला. लिमये यांच्या छापखान्यात सावरकर यांचा ग्रंथ छापला जात असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. पोलिसांनी त्याच्या छापखान्यावर धाड घालायचे ठरवले. पोलीस खात्यातील एका देशभक्त पोलीस अधिकार्‍याने लिमये यांच्याशी संपर्क साधून पोलीस धाड टाकण्यास येत असल्याचे सांगितले. त्यामुळे लिमये सावध झाले. त्यांनी तो ग्रंथ अत्यंत गुप्तपणे आणि तातडीने बाबारावांपर्यंत पोचवण्याची व्यवस्था केली. अखेरीस त्या ग्रंथाची हस्तलिखित प्रत पॅरिसला पाठवण्यात आली. हिंदुस्थानात ग्रंथ छापता येत नव्हता; म्हणून तो ग्रंथ छापण्याचा प्रयत्न जर्मनीत करण्यात आला; कारण जर्मनीत त्या वेळी संस्कृत साहित्य छापले जात होते; पण तिथेही तो छापणे शक्य झाले नाही.

३. ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ ग्रंथ हॉलंडमध्ये इंग्रजी भाषेत छापला जाणे

आता या ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद करण्याचे ठरले. ते काम हरिश्चंद्र कोरेगावकर, फडके, कुंटे आणि सावरकर यांनी केले. इंग्रजी भाषेत अनुवादित करण्यात आलेला हा ग्रंथ इंग्लंडमध्ये छापला जाणे शक्यच नव्हते; म्हणून इंग्रजी हस्तलिखिताची प्रत पॅरिसला पाठवण्यात आली; पण तिथे तो ग्रंथ छापणे अशक्य झाले; म्हणून तो ग्रंथ हॉलंडला छापण्यात आला. त्या ग्रंथाच्या प्रती बॅरिस्टर सरदार सिंग राणा यांच्या घरी ठेवण्यात आल्या. या छपाईचा व्यय दादाराव करंदीकर आणि दादासाहेब खापर्डे या दोघांनी स्वेच्छेने केला. या ग्रंथाच्या शेकडो प्रती ‘पिकविक पेपर्स’, ‘स्कॉच वर्क्स’, ‘डॉन क्विकझोट’ या पुस्तकांची वेष्टने लावून हिंदुस्थानात पाठवण्यात आल्या.

श्री. दुर्गेश परुळकर

४. ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ ग्रंथावर ब्रिटीश सरकारने हिंदुस्थानात बंदी घालणे

स्वातंत्र्यपूर्व काळात पंजाबचे मुख्यमंत्री आणि लीगचे नेते सर शिकंदर हयातखान हे त्या वेळी अभिनव भारताचे सभासद होते. ते हिंदुस्थानला परत येतांना त्यांनी स्वतःसह या ग्रंथाचा एक गठ्ठा आणला. या ग्रंथाच्या छपाईची आणि प्रसिद्धीची वार्ता हिंदुस्थानातील ब्रिटीश सरकारला कळताच त्यावर बंदी घालण्यात आली. सावरकर यांना हे कळताच त्यांनी ‘लंडन टाइम्स’ला पत्र पाठवून स्वतःचा निषेध नोंदवला. सावरकरांचे पत्र ‘लंडन टाइम्स’ने छापले; पण सावरकर यांच्यावर टीका केली. पुढे हा ग्रंथ मराठी, गुजराती, मल्याळी, तमिळ, तेलुगु, उर्दू, फ्रेंच, जर्मन, संस्कृत अशा अनेक भाषांमध्ये अनुवादित करण्यात आला.

५. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ च्या ग्रंथाला देवकीच्या कृष्णाची उपमा देणे

स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतः त्यांचा ग्रंथ आणि लेखणी यांविषयी म्हणतात, ‘विनायकाच्या लेखणीची देवकीच्या कुसव्यासारखी करुणास्पद स्थिती आहे.’ देवकीच्या पोटी आलेला प्रत्येक बालक कंसाकडून मारला गेला. सावरकर यांच्या प्रत्येक गोष्टीला विरोध केला गेला. आजही त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना विरोध केला जात आहे. देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण हा अनेकांचा स्फूर्ती आणि मुक्ती दाता झाला. त्याप्रमाणे १८५७ चा सावरकर लिखित ग्रंथ ब्रिटीश साम्राज्याच्या पकडीतून निसटला आणि परदेशात वाढला. या ग्रंथाने अनेकांना प्रेरणा दिली. श्रीकृष्ण कंसाच्या कारागृहातून निसटला गोकुळात वाढला आणि विश्वाला प्रेरणा देणारा ठरला.

६. डॉ. कुतिन्हो यांनी स्वतःकडे ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ ग्रंथाची मराठी हस्तलिखित प्रत जपून ठेवणे

सावरकर लिखित या ग्रंथाची मराठी हस्तलिखित प्रत सावरकर यांचे ‘अभिनव भारत’चे सहकारी जे गोव्यात रहात होते ते डॉ. कुतिन्हो यांच्याकडे होती. हे मूळचे हिंदु ! त्यांना बळाने धर्मांतरित करण्यात आले. ते ख्रिस्ती झाले; पण आपल्या धर्माशी आणि राष्ट्राशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी ती प्रत जीवापाड जपली. इंग्लंडमधील राजकीय वातावरण बिघडले. सावरकर यांना अटक होऊन पुढे ते अंदमानला २ जन्मठेपांची शिक्षा भोगण्यासाठी गेले. डॉ. कुतिन्हो यांना इंग्लंडमध्ये रहाणे अशक्य झाले. ते विविध देशांमध्ये आसरा घेत राहिले; पण त्यांनी सावरकर यांच्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ ग्रंथाची हस्तलिखित प्रत आपल्याजवळच ठेवली. नंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांनी देश स्वतंत्र झाल्यावर ती हस्तलिखित प्रत वर्ष १९४९ मध्ये श्री. गोहोकर यांच्या हस्ते सावरकर यांच्याकडे पाठवली. असा हा या ऐतिहासिक ग्रंथाचा इतिहास आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.