कोल्हापूर – केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून सध्या मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे. अनेक नवीन प्रकल्प चालू होत आहेत. अनेक युवकांना त्यांचे उद्योगधंदे चालू करण्यास, संशोधन करण्यास प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे मतदारांनी उद्यमशीलतेला प्राधान्य देणारे सरकार निवडावे, असे आवाहन ‘झी २४ तास’चे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. येथील युवक व्यासपीठ, कोल्हापूरच्या वतीने मतदार जागृती अभियान अंतर्गत ‘विकसित महाराष्ट्र’ यावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. हे व्याख्यान टिंबर मार्केट परिसर येथे पार पडले.
रोजगार निर्मितीतील ‘स्टार्टअप’चे (‘स्टार्ट अप’ – नवोदितांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय चालू करणे) महत्त्व अधोरेखित करत गेल्या १० वर्षांत देश आणि राज्यात चालू झालेल्या अनेक ‘स्टार्टअप’च्या यशस्वी प्रकल्पांची माहिती डॉ. उदय निरगुडकर यांनी उपस्थितांना या प्रसंगी दिली. या कार्यक्रमाचे संयोजन ‘युवक व्यासपीठ कोल्हापूर’चे अध्यक्ष श्री. युवराज शिंदे, सर्वश्री हितेंद्र पटेल, दयालाल पटेल, चेतन मोहिते, स्वप्नील पाथरूट, संजय सातपुते यांनी केले होते.