वर्ष २०१६ मधील भाग्यनगर (हैद्राबाद), तेलंगाणा येथील केंद्रीय विद्यापिठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या प्रकरणी तेलंगाणा पोलिसांकडून चालू असलेले अन्वेषण बंद करण्यात आले आहे. ३ मे या दिवशी तेलंगाणा पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण बंद करण्यासाठीचा ‘क्लोजर रिपोर्ट’ (एखाद्या गुन्ह्याचे अन्वेषण बंद करावे, यासाठी पोलिसांनी न्यायालयात सादर करावयाचा अहवाल) हैद्राबाद उच्च न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात आंदोलन उभे राहिले असल्यामुळे या अहवालाकडे अनेकांचे लक्ष गेले आहे. ‘रोहित वेमुला दलित असल्यामुळेच त्याच्यावर अन्याय झाला. त्याला आत्महत्येला प्रवृत्त करण्यात आले’, अशी ओरड काँग्रेसने त्या वेळी केली आणि देशभरातील पुरो(अधो)गामी समजणार्या राजकीय पक्षांनी त्याला साथ दिली. रोहित याच्या आत्महत्येनंतर हिंदूंना दलितविरोधी ठरवून त्यांचीही अपकीर्ती करण्यात आली. राहुल गांधी यांनी संसदेत भाषण ठोकून केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला अन्यायी ठरवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. तो ‘दलित’ असल्याचा कांगावा करत काँग्रेसने रोहित याच्या मृत्यूचे भांडवल केले; मात्र तो ‘दलित’ नव्हता, हे पोलिसांच्या अहवालातून उघड झाल्यानंतर हे प्रकरण आता काँग्रेसवर उलटले आहे. एकूणच रोहित वेमुला हा विद्यार्थी हिंदु असता, तर त्याच्यासाठी ना राहुल गांधी यांनी संसदेत भाषण ठोकले असते, ना पुरोगाम्यांनी देशभर आंदोलन केले असते. बहुसंख्य हिंदूंमधील एखाद्याचा अशा प्रकारे मृत्यू झाला, तर त्यामुळे देशाची काही हानी होत नाही किंवा मानवाधिकार हा केवळ अल्पसंख्यांकांसाठीच असावा, अशी या मंडळींची धारणा असते.
शाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘स्मशानातील सोने’ या गाजलेल्या कथेमध्ये भीमा नावाची एक गरीब दलित व्यक्ती कुटुंबाला पोसण्यासाठी स्मशानात जाऊन प्रेताच्या तोंडातील सोने काढायची. अन्यांच्या मरणावर स्वत:चे कुटुंब पोसावे लागते, याची त्या व्यक्तीला खंत होती; तरीही पैशाच्या लोभापाई ती हे कृत्य करत होती. या कथेतील भीमा प्रेताच्या तोंडातील सोने कुटुंब चालवण्यासाठी करत होता, तशीच काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी दलित व्यक्तीच्या मृत्यूचे राजकारण करण्यापर्यंत खालच्या पातळीला गेली. रोहित याच्या मृत्यूनंतर काँग्रेसने देशभरात आंदोलने केली. पुरोगामी पत्रकारांच्या स्तंभलेखांनी वृत्तपत्रांचे रकाने भरले. पुरोगामी ठरण्याच्या स्पर्धेत येण्यासाठी वृत्तवाहिन्यांनी हिंदूंना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आणि सर्कशीतील ‘रिंगमास्टर’ असल्याप्रमाणे फटके मारून हिंदूंना जर्जर केले. रोहित दलित नसल्याचे उघड झाल्यावर या सर्व मंडळींची जात्यंधता पुन्हा उघड झाली आहे. हिंदूंना लक्ष्य करण्याचे हे काही एकच प्रकरण नाही. यापूर्वीही मालेगाव बाँबस्फोट, तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश आदींच्या हत्या या प्रकरणांमध्ये न्यायालयात खटला उभा रहाण्याच्या पूर्वीपासूनही सर्व पुरोगाम्यांनी हिंदूंना आरोपीच्या कठड्यात उभे करून झोडपून काढले होते. श्वानाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरिराचे लचके तोडण्यासाठी एकत्र येणार्या गिधाडांनाही लाजवेल, अशा पद्धतीने या पुरो(अधो)मंडळींनी हिंदूंची मानहानी केली.
हिंदूंच्या अपकीर्तीची संधी शोधणारे पुरो(अधो)गामी !
रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या प्रकरणी आरोपी करण्यात आलेले सिकंदराबादचे खासदार बंडारू दत्तात्रेय, हैद्राबाद विश्वविद्यालयाचे कुलपती अप्पा राव यांसह तत्कालीन केंद्रीय महिला अन् बाल विकास मंत्री स्मृती ईराणी यांसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते यांना दोषमुक्त ठरवण्यात आले आहे. तेलंगाणा पोलिसांनी २१ मार्च या दिवशी ‘क्लोजर रिपोर्ट’ न्यायालयात सादर केला होता; मात्र तो ३ मे या दिवशी उघड झाला. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या लाभासाठी हा अहवाल पोलिसांनी सादर केल्याची ओरड काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी चालू केली आहे. हा प्रकार म्हणजे स्वत:चे जात्यंध राजकारण समाजाला कळू नये, यासाठी चालवलेला हा प्रयत्न होय ! रोहित वेमुला याच्या आत्महत्येनंतर काँग्रेससह सर्व पुरो(अधो)गामी मंडळींनी महाविद्यालयाच्या प्रशासनावर, तसेच तत्कालीन सरकारवर कारवाईसाठी दबाव आणला. त्यामुळे प्रकरणामध्ये काही तथ्य नसतांनाही वरील मंडळींना त्यामध्ये हकनाक गोवण्यात आले.
पंख्याला गळफास लावून रोहित वेमुला याने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये त्याने त्याच्या आत्महत्येला कुणीही उत्तरदायी नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार रोहित वेमुला याच्या आईने तो दलित असल्याचे खोटे जात प्रमाणपत्र मिळवून त्याला आरक्षणाचा लाभ मिळवून दिला होता. तो दलित नसल्याचे उघड झाल्यास होणारी मानहानी टाळण्यासाठी त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद केले आहे. सद्यःस्थितीत रोहित याचे कुटुंबीय तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेऊन रोहित याच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करणार आहेत. पोलिसांच्या चौकशीने रोहित याच्या कुटुंबियांचे समाधान झाले नसेल, तर त्याविषयी पुन्हा चौकशी अवश्य व्हावी; परंतु जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करण्यात आले असेल, तर तसे करणार्यांनाही शिक्षा व्हायला हवी. यापूर्वीही वर्ष २००९ मध्ये देशात काँग्रेसची सत्ता असतांना ‘हिंदु आतंकवाद’ नावाचे अशाच प्रकारचे कुभांड रचण्यात आले होते. हिंदुत्वाचे कार्य करणार्यांना यामध्ये गोवण्यात आले. हिंदु आतंकवादाच्या कपोलकल्पित कहाण्या वृत्तवाहिन्यांवरून रंगवण्यात आल्या. वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर त्याची वृत्ते देण्यात आली; पण ‘हिंदु आतंकवाद’ असा कोणताही प्रकार नसल्याचे न्यायालयात उघड झाल्यानंतरही या माध्यमांनी ही सत्य बाजू समाजापुढे मांडली नाही.
रोहित वेमुला दलित असो, हिंदु असो, वा मुसलमान असो, तो प्रथम भारतीय आहे. कोणत्याही धर्माचा व्यक्ती जर देशविरोधी किंवा समाजविरोधी कारवायांमध्ये सहभागी असेल, तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी. मुसलमानांच्या भारतविरोधी कारवाया भारताचे इस्लामीकरण करण्याचा हेतू असल्याचे उघडसत्य आहे. याचा अर्थ ‘सर्व मुसलमान धर्मांध आहेत’, असा होत नाही; परंतु अन्य मुसलमान अशा धर्मांधांची तळी उचलून धरतात, यामुळे त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. बहुतांश मुसलमान धर्मबांधव म्हणून धर्मांध मुसलमानांच्या राष्ट्रद्रोहाकडे दुर्लक्ष करतात आणि काँग्रेससारखे राजकीय पक्ष मतांसाठी मुसलमानांच्या राष्ट्रद्रोहाला दुर्लक्षित करतात. रोहित वेमुला याच्या आत्महत्येचे प्रकरणही यापेक्षा वेगळे नाही. त्याच्या मृत्यूचे काँग्रेसने राजकारणच केले; परंतु कपोलकल्पित हिंदु आतंकवादाप्रमाणे हिंदूंची अपकीर्ती करण्याच्या या प्रकरणाचा भांडाफोड होऊन याचे सत्य उघड झाले आहे.
रोहित वेमुला याला दलित ठरवून केलेली हिंदूंची अपकीर्ती, हे हिंदु आतंकवादाप्रमाणेच काँग्रेसने रचलेले षड्यंत्र ! |