Aurangjeb Or Modi: औरंगजेब हवा कि मोदी हवेत, हे प्रत्येकाने ठरवावे ! – केंद्रीय गृहमंत्री

लोकसभा निवडणूक २०२४ – रत्नागिरी येथे महायुतीची सभा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

रत्नागिरी – देशाला विकसित करायचे आहे. देशातील हिंदूंना सन्मान मिळवून द्यायचा आहे. विरोधक हे करू शकत नाहीत. पंतप्रधानांच्या तोडीचा एकही उमेदवार त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ते पंतप्रधानपदी वेगवेगळी नावे सांगत आहेत. अस्थिर सरकारचा हा खेळ आता पुरे. अस्थिर सरकारचे परिणाम भोगल्यामुळे आता पूर्ण बहुमतातीलच सरकार आम्हाला हवे. आता औरंगजेब हवा कि मोदी हवेत, हे प्रत्येकाने ठरवावे. यासाठी ‘फिर एक बार नरेंद्र मोदी’ यांच्यासाठी नारायण राणे यांनाच निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले.

सभेत उपस्थित भाजप, शिवसेना आणि महायुतीचे कार्यकर्ते

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीत घेण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर भाजप, शिवसेना आणि महायुती यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अमित शहा पुढे म्हणाले की,

१. सिंधुदुर्ग किल्ला, छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी राज्य, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व आणि लोकमान्य टिळक यांच्यासारखे कणखर नेते देणारा हा मतदारसंघ आहे. भारतरत्न मिळवणारे पांडुरंग काणे आणि धोंडो कर्वे हेही याच भूमीतील आहेत. अशा भूमीत हिंदुत्व जागवणे आवश्यक आहे.

२. आता उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याचे धाडस करू  शकतील का ? हे धाडस करू शकत नसाल, तर तुम्ही नकली शिवसेना चालवत आहात. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. मुंबईतील सभेत तुम्ही श्रीराममंदिराविषयी विचाराल का ? तलाक हटवण्याविषयी आणि पी.एफ्.आय.वरील बंदीविषयी बोलू शकता का ? आता ते छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानीदेवी यांचे नावही घ्यायला घाबरत आहेत; कारण त्यांनाही आता काँग्रेसप्रमाणे ‘व्होट बँके’ची चिंता सतावत आहे. त्यामुळेच हे औरंगाबादच्या नामकरणाला विरोध करतात. आता औरगंजेब हवा कि मोदी हवेत, हे प्रत्येकाने ठरवावे.

३. मोदी यांनी ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी कलम ३७० हटवले. त्यामुळे काश्मीर कायमस्वरूपी भारतात आले आहे. काँग्रेस पक्ष आणि शरद पवार कलम ३७० हटवण्यासाठी विरोध करत होते. राहुल गांधी संसदेत उभे राहिले आणि म्हणाले, ‘‘३७० हटवू नका. काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वहातील. आज ५ वर्षे झाले रक्ताची नदी सोडा; साधी दगडफेकही झाली नाही. काश्मीरच्या लाल चौकात जाणे अवघड होते; मात्र आज तेथे कृष्णजन्माष्टमी उत्साहात साजरी केली जाते.

४. जे राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या मांडीवर बसायला जात आहेत, ते महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकणार नाहीत. १० वर्षांत सोनिया-मौनीबाबा मनमोहन यांची सत्ता होती. पाकिस्तानी आणि अतिरेकी देशात घुसत होते; मात्र त्यांना व्होट बँकेची चिंता असल्यामुळे ते मौन बाळगून होते. मोदीजींनी मात्र पाकिस्तानात घुसून आतंकवाद्यांचा नाश केला.

५. छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आली आणि २९ नक्षलवादी मारले गेले. काँग्रेसवाल्यांनी यास ‘फेक एन्काऊंटर’ (बनावट चकमक) म्हणून संबोधिले. मोदी यांनी ५ वर्षांत राममंदिराची केस जिंकली आणि राममंदिरही बांधून दाखवले. ५०० वर्षांचा प्रश्‍नच मिटवून टाकला आहे.

६. मोदी यांनी तिसर्‍यांदा निवडून आल्यानंतर संकल्पपत्रात समान नागरी कायदा आणणार आणि  ‘मुस्लिम पर्सनल लॉ’ समाप्त करणार, हे स्पष्ट केले आहे.

७. कोरोनाच्या काळात १३० कोटी लोकांना लसीकरण करण्यात आले. यालाही विरोध करण्याचे पाप काँग्रेसने केले.

८. कोकणासाठी काजू बोर्ड बनवले आहे, त्याचप्रमाणे आंबा बोर्ड ही बनवणार आहोत. १४६ कोटी रुपयांचा फिशरीज हर्बल प्रकल्प बनवणार आहोत. विश्‍वकर्मा योजनेमधून १३ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले जाणार आहे.

आता कॅलिफोर्नियावाले बोलतील कोकणासारखा विकास हवा ! – मंत्री नारायण राणे

नारायण राणे

रत्नागिरी मतदारसंघात अनेकांनी कोकणचा कॅलिफोर्निया बनवू, अशा घोषणा केल्या होत्या. आता मात्र कॅलिफोर्नियावालेच कोकणासारखा विकास हवा, असे म्हणायला पाहिजेत, एवढा विकास कोकणचा आम्ही करणार आहोत. कोकणच्या विकासासाठी कमळावर शिक्का मारून विकासाची संधी द्या, असे आवाहन महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांनी सभेत केले.

नारायण राणे म्हणाले की, भारत देश एक विकसित देश, आत्मनिर्भर देश व्हावा यासाठी गेली १० वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. अर्थव्यवस्थेत भारत देश ५ व्या क्रमांकावर आला आहे. येणार्‍या काळात तो ३ र्‍या क्रमांकावर येईल. मोदी यांनी ५४ योजना दिल्या. या योजनांतील ६० टक्के लाभार्थी येथीलच आहेत. विरोधी आघाडी काय बोलते ? विकासाविषयी ते काही बोलतात का ? त्यांनी केवळ जनतेला टीकाच दिली आहे. शेतकर्‍यांना कर लावतात, अशी भाषा बोलली जाते. हिंदुत्वाशी गद्दारी करून मुख्यमंत्रीपदी बसणारे आम्हाला नकोत. त्यांचे डिपॉझिट जप्त करा.

मंत्री राणे यांना अधिक मताधिक्य मिळवून देणे, हा आमचा शब्द ! – पालकमंत्री उदय सामंत

पालकमंत्री उदय सामंत

मंत्री राणे यांना अधिक मताधिक्य मिळवून देणे, हा आमचा शब्द आहे. देशाचे राजकारण करतांनाही माणसाने जमीनीवर कसे रहावे ? हे अमित शहा यांच्याकडून शिकायला मिळते. रत्नागिरी निसर्गरम्य जिल्हा आहे. या ठिकाणी पर्यटन आहे, आंबा आणि काजू ही प्रमुख पिके आहेत; मात्र येथे सहकार रुजला नाही. केंद्रीय विभागाने येथे सहकार रुजवून येथील बेरोजगारी दूर करावी, तसेच ‘येथील मोठे उद्योग गुजरातमध्ये गेले’, असे वारंवार म्हटले जातेय. आम्हालाही येथे मोठा प्रकल्प मिळावा, अशी विनंती आहे.

वारकरी समाज पंतप्रधान मोदी आणि नारायण राणे यांच्या भक्कम पाठीशी ! – भगवान महाराज कोकरे  

भगवान महाराज कोकरे

आपल्याला केवळ जय श्रीरामाच्या घोषणा देऊन भागणार नाही, तर प्रत्येकाने आता देशासाठी अविरत काम करणार्‍या नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायला सज्ज झाले पाहिजे. मोदी यांच्यामुळेच ५०० वर्षानंतर आपला श्रीराम स्वाभिमानाने मंदिरात रहात आहे. पूर्वी मुसलमानांना भडकवले जायचे; पण आता त्यांच्या हातात मोदींनी संगणक दिला आहे, विकासाच्या प्रक्रियेत घेतले आहे. वारकरी समाज पंतप्रधान मोदी यांच्या बाजूने उभा आहे.