श्रीराम सहज, साधा-सरळ; पण दृढनिश्चयी आहे. तो केवळ आपल्या मित्रांचाच शुभचिंतक नाही, तर त्याच्या आश्रयाला येणार्या शत्रुंनाही अभय देतो. राम एक भाऊ, एक पती, एक मित्र आणि एक राजा या अशा सर्व भूमिकांमध्ये अनुकरणीय आहे. राम म्हणजे आत्मा-ज्योती, म्हणजेच हृदयातील प्रकाश आहे. राम नेहमी आपल्या हृदयात असतो. श्रीरामाचा जन्म आई कौसल्या आणि वडील दशरथ यांच्या पोटी झाला. संस्कृतमध्ये ‘दशरथ’ म्हणजे, ‘१० रथ असलेला.’ या ठिकाणी १० रथ, म्हणजे आपले ५ ज्ञानेंद्रियांचे आणि ५ क्रिया इंद्रियांचे प्रतीक आहे. ‘कौसल्य’, म्हणजे ‘जो कुशल आहे.’ रामाचा जन्म तिथेच होऊ शकतो, जिथे ज्ञान पंचेंद्रियांच्या आणि ५ इंद्रियांच्या संतुलित कार्यात कार्यक्षमता असते. अयोध्या याचा शाब्दिक अर्थ ‘ज्या ठिकाणी युद्ध होऊ शकत नाही.’ जेव्हा मन कोणत्याही संघर्षाच्या स्थितीपासून मुक्त होते, तेव्हाच आपल्या मनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो. राम हे आपल्या आत्म्याचे, लक्ष्मण हे सतर्कतेचे, सीता हे मनाचे, तर रावण हे अहंकार आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे.
जसे पाण्याचा स्वभाव वहात जाणे आहे, तसाच मनाचा स्वभाव डगमगणे आहे. मनरूपी सीता सोन्याच्या हरणाकडे पाहून आकर्षित झाली. आपले मन वस्तूंकडे आकर्षित होते. अहंकाररूपी रावण मनरूपी सीतेचे हरण करतो. अशा प्रकारे मनरूपी सीता आत्मरूपी श्रीरामापासून विलग होते. हनुमानाला ‘पवन पुत्र’ म्हणतात. सीतेला परत आणण्यासाठी तो श्रीरामाला साहाय्य करतो. श्वास आणि सतर्कता (हनुमान आणि लक्ष्मण) यांच्या साहाय्याने मन (सीता) पुन्हा आत्म्याशी (राम) जोडले जाते. अशा प्रकारे संपूर्ण रामायण आपल्यातच घडत असते. राम भरतासह अयोध्येत परतला असता, तर रामायण कधीच झाले नसते. रामाने सोन्याच्या हरणाचा पाठलाग केला नसता, तर गोष्ट वेगळीच असती. अशा स्थितीत हनुमानाची भूमिकाच आली नसती. जर हनुमान नाही, तर रामायणही नाही.
– पू. (प्रा.) के.वि. बेलसरे
(साभार : ‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक साहित्य’ फेसबुक)