(म्हणे) ‘खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कटामागे ‘रॉ’चा हात !’ -‘वॉशिंग्टन पोस्ट’ वृत्तपत्र

अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राचा भारतद्वेषी आरोप

गुरपतवंत सिंह पन्नू

वॉशिंग्टन – खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा जो कट रचण्यात आला होता, त्यामागे ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर यंत्रणेचा हात आहे, असा फुकाचा आरोप अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राने केला.

‘वॉशिंग्टन पोस्ट’ने त्याच्या एका वृत्तात ‘रॉ’चे अधिकारी विक्रम यादव हे पन्नू याच्या हत्येच्या प्रयत्नात सहभागी असल्याचे म्हटले आहे. यात असाही दावा करण्यात आला आहे की, विक्रम यादव यांनी त्यांच्या प्राथमिक लक्ष्यांच्या सूचीत पन्नूचा समावेश केला होता आणि त्याची हत्या करण्यासाठी नेमबाजांचे पथक निवडले होते. या वृत्तात अज्ञात माजी अमेरिकन अधिकारी आणि भारतीय सुरक्षा अधिकारी यांचा संदर्भ देत दावा करण्यात आला आहे की, यादव यांनी पन्नूची सर्व माहिती त्याच्या न्यूयॉर्कमधील पत्त्यासह मारेकर्‍यांना पाठवली होती.

आरोप अनुचित आणि निराधार ! – भारतीय परराष्ट्र मंत्रालय

एका गंभीर प्रकरणावर ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रसिद्ध केलेले वृत्त अनुचित आणि निराधार आहे. अमेरिकेने व्यक्त केलेल्या सुरक्षेच्या चिंतांचा शोध घेण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीचे अन्वेषण चालू आहे. त्यावर अशा दायित्वशून्य टिपण्या करणे योग्य नाहीत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण ?

अमेरिकेने गेल्या वर्षाच्या अखेरीस अमेरिकन नागरिक खलिस्तानी आतंकवादी  गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कटात भारतीय अधिकारी सहभागी असल्याचा आरोप केला होता. हे सूत्र भारतासमोरही मांडण्यात आले होते. याविषयी अन्वेषण करण्यासाठी भारत सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

संपादकीय भूमिका 

भारतावर निराधार आरोप करणारे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या एका पाठोपाठ एक होत असलेल्या हत्यांच्या प्रकरणी चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या !