Global Times China : (म्हणे) ‘भारताचे शेजारील देश त्याच्यापासून दूर जात आहेत !’ – ‘ग्लोबल टाइम्स’

मालदीवमधील मुइज्जू यांच्या विजयावरून चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’चा दावा !

बीजिंग (चीन) – चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने मालदीवमधील चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांच्या पक्षाला निवडणुकीत विजय मिळाल्यावरून लेख प्रकाशित केला आहे. यात भारतावर टीका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, ‘भारत ‘नेबर फर्स्ट पॉलिसी’ (शेजारी देशांना प्राधान्य देणे) या धोरणाचे पालन करतो; पण गेल्या काही काळापासून भारताचा दृष्टीकोन ‘नेबर फर्स्ट पॉलिसी’ वरून ‘इंडिया फर्स्ट’ असा पालटला आहे. भारत दक्षिण आशियात स्वतःचा प्रभाव वाढवण्याचा जितका प्रयत्न करतो, तितकेच त्याचे शेजारी देश त्यापासून दूर जात आहेत. मालदीवच्या संसदीय निवडणुका, हा त्याचा पुरावा आहे. तेथील लोक आता भारताच्या आदेशांचे पालन करू इच्छित नाहीत. त्यांनी स्वतंत्र परराष्ट्र धोरण निवडले आहे. ते आर्थिक आणि सामाजिक विकासाला प्राधान्य देते.’

या लेखात पुढे लिहिले आहे की, भारताच्या आक्रमक वृत्तीमुळे शेजारील राष्ट्रांमध्ये भारतविरोधी भावना निर्माण होत आहे. भारत आणि चीन हे शत्रू नसून भागीदार आहेत. मालदीवच्या जनतेनेही मुइज्जू यांची निवड केली आहे; कारण त्यांना वाटते की, भारत मालदीवमध्ये हस्तक्षेप करत आहे. मालदीवच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण करणार्‍या मालदीवला भारत आणि चीन या दोन्ही देशांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. मालदीवची निवडणूक ही त्यांची अंतर्गत गोष्ट असून चीन याचा आदर करतो; पण काही पाश्‍चात्त्य माध्यमांनी या निवडणुका प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचे काम केले. ही निवडणूक खरे तर भारत आणि चीन यांच्यातील लढत आहे. याखेरीज भारतातील काही प्रसारमाध्यमांनीही त्यांच्या अहवालामध्ये मालदीवचा कल चीनकडे वाढत असल्याचे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका 

शेजारील देश भारतापासून दूर जात नसून चीन त्यांच्या साम, दाम, दंड आणि भेद यांद्वारे त्यांना स्वतःकडे वळवत आहे आणि त्याचा परिणाम या देशांच्या आत्मघातात होणार आहे, हे लक्षात ठेवायला हवे !