श्रीरामावतार, शरयू नदी आणि अयोध्यानगरी

शरयू नदी

‘अयोध्यानगरी हिंदूंच्या प्राचीन सप्तपुरींपैकी एक आहे. या नगरीतील ऐश्वर्याची तुलना स्वर्गलो काशी केलेली आहे. ‘अथर्ववेदा’त या नगरीला ‘ईशपुरी’ म्हटले आहे. प्रभु रामचंद्रांचा जन्म त्रेतायुगात झाला. सध्याची अयोध्यानगरी विक्रमादित्याने २००० वर्षांपूर्वी पुन्हा वसवली. अयोध्येत साजर्‍या केलेल्या दिवाळीचे वर्णन वेद-पुराणात आढळते. लंकाधिपती रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येत परत आल्यावर घरोघरी दिवे लावण्यात आले, पक्वान्ने करून लोकांनी आनंद साजरा केला.

अयोध्येचे धार्मिक महत्त्व

अयोध्या मूळ हिंदु मंदिरांची नगरी आहे. ही रामजन्माच्या आधीपासून अस्तित्वात आहे. येथे रामाचा जन्म व्हावा; म्हणून देवता आणि ऋषिमुनी यांनी या नगरीत अनेक वर्षे कठोर तप केले. त्यानंतर भगवान विष्णूंनी इक्ष्वाकू कुळात रामाच्या अवतारात जन्म घेतला.

अयोध्या आणि शरयू नदी यांचे महत्त्व

अयोध्या म्हणजे ‘जिथे युद्ध होत नाही ती नगरी.’ जिथे प्रेमाचे राज्य आहे, ती अयोध्या. संत तुलसीदासरचित रामचरित मानसमध्ये शरयू नदीचे वर्णन आहे, ‘अवधपुरी मम पुरी सुहावनि । दक्षिण दिश बह सरयू पावनि ।’

प्रभु श्रीरामाच्या जीवनात अयोध्येइतकेच शरयू नदीचेही महत्त्व आहे. त्यांनी वनवासात जातांना ही नदी ओलांडली आणि वैकुंठगमन करण्याच्या वेळीही हीच नदी साक्ष होती. शरयू नदीच्या तिरावर अयोध्यानगरीत गुप्तद्वार घाट, कैकेयी घाट, कौसल्या घाट, पापमोचन घाट, लक्ष्मण घाट, सहस्रधारा घाट, ऋणमोचन घाट, शिवाला घाट, जटाई घाट, अहिल्याबाई घाट, धौरहारा घाट आणि जानकी घाट, असे एकूण १२ प्रमुख घाट आहेत.’

(साभार : ‘उगता भारत’ आणि ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १६ ते ३१ जानेवारी २०२४)