निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखा ! – सर्वोच्च न्यायालय

निवडणूक आयोगाला सूचना

नवी देहली – निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखा. जे अपेक्षित आहे, ते होत नाही, अशी कुणालाच भीती वाटू नये, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. मतदान यंत्रासह (‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन’सह) ‘व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल स्लिप्स’चा (‘व्ही.व्ही.पी.ए.टी.’चा) वापर करून मत दिल्याची तपशीलवार माहिती द्या, असेही सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला सांगितले. ‘व्ही.व्ही.पी.ए.टी.’ ही अशी प्रणाली आहे, जी मतदाराने अमुक पक्षाला मतदान दिल्यानंतर या प्रणालीद्वारे यंत्रावरच मतदाराने दिलेले मत त्याच्या आवडत्या पक्षालाच दिल्याचे संरक्षित झाले आहे ना, हे लक्षात आणून देते. या प्रणालीमुळे मतदानयंत्रामधील संभाव्य त्रुटी लक्षात येऊ शकते.

सौजन्य HW News English 

मतदान यंत्रासह ‘व्ही.व्ही.पी.ए.टी.’ प्रणालीचा उपयोग केला जावा, अशी मागणी करणार्‍या याचिकेवर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. केरळच्या कासरगोड येथे नुकत्याच करण्यात आलेल्या ‘मॉक पोल’मध्ये (तपासणी करण्यात आलेल्या मतदानामध्ये) भाजपच्या बाजूने अतिरिक्त ४ मते पडली, असा दावा केरळमधील सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी आणि ‘युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ यांनी केला. संबंधित अहवालाचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला या समस्येकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.