चैत्र शुक्ल नवमी, रामनवमी (१७.४.२०२४) या दिवशी सौ. मनीषा दामोदर गायकवाड यांचा ४३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सौ. मनीषा दामोदर गायकवाड यांना ४३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. नियोजनकौशल्य
‘सौ. मनीषाताई सहसाधकांच्या सेवेचे नियोजन व्यवस्थित करते. ‘कोणत्या सेवेला किती वेळ लागू शकतो ?’, हे तिला अचूक कळते. एकाच वेळी ४ कामगार आले, तरीही ताई त्यांचे उत्तम नियोजन करून त्यांच्याकडून सेवा करून घेते.
२. साधकांना प्रोत्साहन देणे
ती माझ्या सेवेतील अडचणी सोडवते. ती मी केलेल्या सेवेचे कौतुकही करते. काही वेळा मी तिला सांगते, ‘‘मला ही सेवा जमणार नाही.’’ तेव्हा ती मला ‘‘तुम्ही ती सेवा करणार’’, असे सांगून मला सेवा करण्यास प्रेरणा देते.
३. तत्त्वनिष्ठ
ती साधकांना सेवेतील चुका तत्त्वनिष्ठतेने सांगते. ‘साधकांकडून सेवेत पुन्हा त्याच चुका होऊ नयेत आणि साधकांचा वेळ वाया जाऊ नये’, असा तिचा उद्देश असतो.
४. नामजपादी उपाय करण्याचे गांभीर्य
पूर्वी तिला धान्य साठवण्याच्या संबंधित काही सेवा जमत नव्हत्या. तिने अन्य साधकांकडून त्या सेवा लवकर शिकून घेतल्या. तिला पुष्कळ सेवा असतात. त्यामुळे तिला नामजपादी उपाय करायला अल्प वेळ मिळतो. तिला ज्या वेळी वेळ मिळतो, त्या वेळेत ती नामजपादी उपाय करायला प्राधान्य देते.
५. स्वतःत पालट करण्याची तळमळ
पूर्वी मला आणि अन्य साधकांना तिच्याशी बोलतांना भीती वाटत असे. मी तिला तसे सांगितल्यावर ती म्हणाली, ‘‘मला स्वतःत पालट करायला हवा.’’ तिने स्वतःमध्ये पालट केला. आता मला तिच्याशी सहजतेने बोलता येते.
‘प.पू. डॉक्टर, तुम्ही मला मनीषाताईसारखी उत्तरदायी साधिका दिली. मला तिच्याकडून सतत शिकता येऊ दे. तिची आध्यात्मिक प्रगती लवकर करून घ्या’, अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करते.’
– श्रीमती संध्या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०२४)