देवाची ओढ असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कोपरखैरणे, नवी मुंबई येथील चि. मल्हार राहुल यादव (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. मल्हार राहुल यादव हा या पिढीतील एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

चैत्र शुक्ल नवमी (१७.४.२०२४) या दिवशी चि. मल्हार राहुल यादव याचा चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई, आजी आणि आत्या यांच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. मल्हार यादव

चि. मल्हार राहुल यादव याला चौथ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. वय १ ते २ वर्षे

१ अ. ‘मल्हार लहान असल्यापासून त्याच्याकडे पाहिल्यावर प्रसन्न वाटते.’ – सौ. रेश्मा जांभळे (चि. मल्हारची आत्या), घणसोली, नवी मुंबई.

सौ. शीतल यादव

२. वय २ ते ३ वर्षे

२ अ. प्रेमभाव

१. ‘मल्हारला कुणी खाऊ दिल्यावर तो आधी घरातील सगळ्यांना देतो आणि नंतर स्वतः खातो.’ – सौ. शीतल राहुल यादव (चि. मल्हारची आई), कोपरखैरणे, नवी मुंबई.

२. ‘आसंदीमध्ये कुणी बसले असल्यास मल्हार त्यांना टेकण्यासाठी उशी देतो आणि त्यांना ‘टेकून बसा’, असे सांगतो.’ – सौ. रेश्मा जांभळे

२ आ.  इतरांना साहाय्य करणे

१. ‘प्रतिवर्षी श्री गणेशचतुर्थीच्या वेळी तो त्याच्या वडिलांना सजावट करायला साहाय्य करतो.

२. तो त्याच्या आजी-आजोबांना कामात साहाय्य करतो.

२ इ. देवाविषयी ओढ : तो २ वर्षांचा असल्यापासून खेळतांना एखादी वस्तू मधे ठेवून ‘ॐ नमः शिवाय ।’ असा नामजप करत प्रदक्षिणा घालत असे. तो अडीच वर्षांपासून लहान श्लोक म्हणू लागला.

३. वय ३ ते ४ वर्षे

३ अ. चांगली स्मरणशक्ती : त्याला एखादी गोष्ट सांगितली की, तो लगेच लक्षात ठेवतो.

३ आ. व्यवस्थितपणा : त्याला सगळ्या गोष्टी नीटनेटकेपणाने करायला आवडतात. तो रुमाल नीट घडी करून खिशात ठेवतो. तो खेळून झाल्यावर खेळणी जागेवर ठेवतो. तो अंथरूण व्यवस्थित घालतो.

३ इ. नम्रता : घरी साधक किंवा पाहुणे आल्यास मल्हार त्यांच्या पायांवर डोके ठेवून त्यांना नमस्कार करतो.

३ ई. देवाविषयी ओढ : तो साडेतीन वर्षांचा असल्यापासून ‘हनुमान चालिसा’ म्हणत आहे. त्याला कधी भीती वाटली, तर तो लगेच ‘हनुमान चालिसा’ म्हणतो. मल्हारला औषध दिल्यावर ‘हनुमानजी मला औषधामधून शक्ती देतात’, असे सांगतो. मल्हारच्या गळ्यामधे गणपति आणि दत्त यांचे पदक घातले आहे. तो शाळेत जातांना म्हणतो, ‘‘माझ्या समवेत दत्तगुरु शाळेत येतात. ते शाळेत माझे रक्षण करतात.’’

३ उ. समंजस : वर्ष २०२३ मधील गुरुपौर्णिमेच्या वेळी मला रांगोळी काढण्याची सेवा होती. तेव्हा माझी सेवा पूर्ण होईपर्यंत मल्हार माझ्या शेजारी बसून अन्य ठिकाणी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करत होता.

३ ऊ. संतांप्रती भाव : एकदा पू. रमानंद गौडा यांचे साधकांना मार्गदर्शन होते. त्या वेळी मल्हार शांतपणे मार्गदर्शन ऐकत होता. त्याची आजी ठाणे सेवाकेंद्रातून घरी आल्यावर तो आजीला नेहमी विचारतो, ‘‘तू सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना भेटलीस का ?’’

– सौ. शीतल राहुल यादव

३ ए. प्रेमभाव : ‘एकदा मी रुग्णालयात असतांना तो मला ‘‘आजी, मी तुला जेवण भरवतो. तुला भाकरी मोडून देतो. तुला कुठे लागले आहे ?, ते मला दाखव’’, असे सांगत असे.

३ ऐ. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता : मी रुग्णालयात असतांना तो मला ‘महाशून्य’ हा नामजप करायला सांगत असे. मी दायित्व साधकांना नामजपादी उपाय विचारल्यावर त्यांनी मला ‘महाशून्य’ हाच नामजप करायला सांगितला.’

– सौ. तनुजा यादव (चि. मल्हारची आजी), कोपरखैरणे, नवी मुंबई.

३ ओ. ‘त्याला ‘एखाद्या कार्यक्रमात कोण व्हायचे आहे ?’, असे विचारल्यावर तो सांगतो, ‘‘मी कृष्णबाप्पा होणार आणि आर्वीला (मल्हारच्या आतेबहिणीला) राधा बनव.’’

– सौ. रेश्मा जांभळे

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २१.२.२०२४)

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.