अन्नाचा होणारा अपव्यय वेदनादायी !

‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हा संस्कार देणारी आपली महान हिंदु संस्कृती. परब्रह्मरूप असलेल्या अन्नाच्या भरल्या ताटाला नमस्कार करण्याची शिकवणही नकळत्या वयापासून आम्हास मिळाली आहे. अन्न देणार्‍या ईश्वराचे, ते पिकवणार्‍या शेतकर्‍याचे आणि अन्न शिजवून ताटात वाढणार्‍याला नमस्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आमची पद्धत आहे. अन्नाला परब्रह्मस्वरूप मानून आपण त्याचे पूजन करतो, त्याचा आदर करतो; कारण भगवान श्रीकृष्णाने गीतेत अन्नाच्या रूपाने ‘मीच सर्व जिवांचे संवर्धन करतो’, असे सांगितले आहे. आपल्या समोरचे भरलेले ताट दुसर्‍याला द्यायला शिकवणारी हिंदु संस्कृती आहे. संस्कृतीने आपल्या स्वतःसह इतरांच्या तहान-भुकेचा विचार करण्यास शिकवले आहे, तर अन्नदान ‘सर्वश्रेष्ठ दान’ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अन्नाचे मोल आणि महत्त्व ओळखून त्याचा उचित अन् योग्य आदर वा वापर करण्यातच त्या परब्रह्माचा खरा आदर असल्याचे म्हटले आहे; पण असे असले, तरी पूर्णब्रह्म, परब्रह्म असलेल्या अन्नाचा अपव्यय हा जागतिक चिंता आणि चिंतनाचा विषय आहे.

१. जागतिक स्तरावर अन्न वाया जाण्याचे प्रमाण आणि त्यामुळे होणारी आर्थिक हानी

संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमांतर्गत नुकतीच एका सर्वेक्षणाची आकडेवारी घोषित करण्यात आली. या सर्वेक्षणातून समोर आलेले सत्य जगातील सूज्ञ म्हणवणार्‍या सर्वांचीच चिंता वाढवणारे आहे. एकीकडे जगातील ७८ कोटींहून अधिक लोक तीव्र उपासमार सहन करत असतांनाच दुसरीकडे १९ टक्के अन्नाचा अपव्यय होत असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. या सर्वेक्षणाची आकडेवारी आता जरी घोषित केली असली, तरी हे सर्वेक्षण वर्ष २०२२ चे आहे. यात अधिक चिंतेचे, म्हणजे याच प्रकारच्या वर्ष २०२१ केलेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीत वर्ष २०२२ मध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. तब्बल १.०५ अब्ज मेट्रिक टन अन्न या वर्षात वाया गेले. जितके अन्न सिद्ध करण्यात आले, त्याचा हा पाचवा हिस्सा होता.

या सर्वेक्षण अहवालानुसार प्रतिवर्षी जगातील प्रतिमाणसी ७९ किलो अन्न वाया गेले. हे प्रमाण भारतात प्रतिमाणसी ५५ किलो इतके आहे. वाया गेलेल्या अन्नाचे आर्थिक मूल्य तब्बल १ लाख कोटी इतके असल्याचेही या अहवालात नमूद आहे. अन्न वाया जाण्याचे सर्वाधिक ६० टक्के प्रमाण घरांमधून, उपाहारगृहांमधून २८ टक्के, तर १२ टक्के अन्न किरकोळ विक्रेते वाया घालवतात. एकीकडे काहींची होणारी उपासमार, तर दुसरीकडे वाया जाणारे अन्न हे वेदनादायी आहेच; पण वाया जाणार्‍या अन्नामुळे पर्यावरणावर होत असलेले गंभीर परिणाम चिंतेत भर टाकणारे आहेत. अन्न वाया जाणे टाळल्यास पर्यावरण आणि संसाधने यांच्या संरक्षणासह भुकेल्याची भूक भागवणे शक्य होऊ शकते; पण यासाठी पुढाकार घेणार कोण ? हा खरा प्रश्न आहे.

२. भारतात प्रतिवर्षी प्रतिव्यक्ती ५५ किलो अन्न वाया जाणे, हे लाजिरवाणे !

गत काही वर्षांमध्ये ‘पैशाचे झालेले अवमूल्यन, वाढता चंगळवाद यात संस्कृती आणि संस्कार यांचा विसर पडतो आहे का ?’, असा प्रश्न आपल्या देशातील प्रत्येकाला पडावा, अशी ही आकडेवारी आहे. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे म्हणत असतांना देशात प्रतिवर्षी प्रतिव्यक्ती ५५ किलो अन्न वाया जाणे, हे लाजिरवाणे आहे. हवे तेवढे अन्न ताटात घेऊन ‘यज्ञकर्म’ म्हणून खाण्याची हिंदु परंपरा आहे; पण सर्वेक्षणातील आकडेवारी मात्र भारतियांना चपराक लावणारी आहे.

३. ‘अन्नाचा अपव्यय थांबवण्याचा संकल्प करणे’, हाच उपाय !

एकीकडे अन्न टाकून वाया जात असतांना दुसरीकडे पोटाची आग शमावी म्हणून लाखो लोक भीक मागतात. आदिवासी दुर्गम भागातील अनेकांना पोटभर अन्न न मिळाल्याने कुपोषणाची समस्या आहे. दुसरीकडे अन्नाची नासाडी होत आहे. हा विरोधाभास न्यून व्हावा, नव्हे तर संपावा, यासाठी सर्व बाजूंनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. उपाहारगृह व्यावसायिकांनीही ग्राहक मागेल तितके देणे चालू करावे, तर विविध लग्न समारंभासह कार्यक्रमात उपलब्ध आहे म्हणून ताटात वाढून घेण्याची सवय न्यून व्हावी, तसेच घरातही अन्न वाया जाणार नाही, यांसाठी योग्य उपाययोजना करण्याची आवश्यक आहे; कारण अन्नाचा सर्वाधिक अपव्यय (६० टक्के) हा घरातून होतो. ‘पूर्णब्रह्म’ म्हणून ज्याचे आम्ही स्मरण आणि पूजन करतो त्याचा अवमान, म्हणजेच ‘अन्नाचा अपव्यय थांबवण्याचा संकल्प करणे’, हाच या समस्येवर उपाय आहे.

– नीलेश जोशी

(साभार : दैनिक ‘नागपूर तरुण भारत’, ४.४.२०२४)