गुरुदेवांप्रती अतूट श्रद्धा आणि भाव अन् साधनेची तळमळ असणारी चोपडा, जिल्हा जळगाव येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. किमया प्रशांत पाटील (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. किमया प्रशांत पाटील ही या पिढीतील एक आहे !

चैत्र शुक्ल पक्ष सप्तमी (१५.४.२०२४) या दिवशी चोपडा, जिल्हा जळगाव येथील चि. किमया पाटील हिचा चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘वर्ष २०२१ मध्ये  ‘चि. किमया प्रशांत पाटील उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली  असून  तिची आध्यात्मिक पातळी ५४  टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी  ५५ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (७.४.२०२४) ॐ 
चि. किमया पाटील
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

चि. किमया पाटील हिला सनातन परिवाराकडून चौथ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !

१. सौ. कल्याणी पाटील (चि. किमयाची आई)

सौ. कल्याणी पाटील

१ अ. धर्माचरणाची आवड : ‘किमयाची निरीक्षणक्षमता चांगली आहे. माझ्याकडून देवपूजा करतांना, रांगोळी काढतांना किंवा स्वयंपाक करतांना एखादी चूक झाल्यास ती मला माझी चूक निदर्शनास आणून देते. इतर मुलींचे ती निरीक्षण करत असते. एखाद्या मुलीने जीन्सची पँट घातली असल्यास ती तिला ‘तूही माझ्यासारखाच सात्त्विक पोशाख घालत जा’, असे सांगते.

१ आ. लढाऊवृत्तीने घोषणा देणे : ती ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, जय भवानी जय शिवाजी’ इत्यादी घोषणा लढाऊवृत्तीने देते.’

२. श्री. प्रशांत पाटील (कु. किमयाचे वडील)

श्री. प्रशांत पाटील

२ अ. आध्यात्मिक त्रासामध्ये झालेला पालट : ‘कु. किमयाला आध्यात्मिक त्रास आहेत. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी तिच्या आईला (सौ. कल्याणीला) किमयासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप १ घंटे करायला सांगितला होता. किमयाच्या आईने १ घंटा नामजप केल्यामुळे किमयामध्ये १ वर्षानंतर ५० टक्के पालट झालेला दिसत आहे.

२ आ. धर्माचरण : ती शाळेत जाण्यापूर्वी प्रतिदिन प.पू. भक्तराज महाराज, परात्पर गुरुदेव आणि आई-बाबा अन् आजी-आजोबा यांना साष्टांग नमस्कार करते.

२ इ. ‘किमयाची साधनेची ओढ पूर्वीपेक्षा वाढली आहे’, असे जाणवते.’

३. सौ. कल्पना पाटील (चि. किमयाची आजी, वय ५५ वर्षे)

३ अ. कुटुंबियांना साहाय्य करण्याची वृत्ती : ‘ती घरकामात साहाय्य करण्याचा प्रयत्न करते. ती आईला सांगते, ‘‘आई, तुला साधनेला वेळ मिळत नाही. मी तुला साहाय्य करीन.’’

३ आ. तिला समष्टी सेवांत सहभागी होण्याची आवड आहे.

३ इ. गुरुदेवांप्रती अतूट श्रद्धा आणि भाव : किमया रात्री झोपतांना सर्वांचे वाईट शक्तींपासून रक्षण व्हावे आणि शांत झोप लागावी, यासाठी सगळ्यांच्या उशांजवळ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवन दर्शन’ या पुस्तिका ठेवते. ती म्हणते, ‘‘तुम्हाला झोपेत वाईट शक्ती त्रास देणार नाहीत. गुरुदेव तुमचे वाईट शक्तींपासून रक्षण करतील.’’

४. श्री. शांताराम पाटील (चि. किमयाचे आजोबा, वय ६५ वर्षे)

४ अ. देवघरात जाऊन प्रार्थना करणे : ‘किमया मधेमधे देवघरात जाऊन प्रार्थना करते, ‘हे गुरुदेवा, मला सुबुद्धी द्या. मला आनंदी ठेवा. माझ्याकडून ‘गुरुदेव दत्ता’चा नामजप करून घ्या. माझे त्रास दूर करा.’ कापूर आणि अत्तर यांचे उपाय करतांना ती म्हणते, ‘मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास आहेत. आध्यात्मिक स्तरावरील उपायांमुळे माझे रक्षण होते. मी माझी आई, बाबा आणि आजी यांना पुष्कळ त्रास देते. मला क्षमा करा.’

४ आ. गुरुदेवांशी बोलणे : किमया देवघरात एकटी बसून गुरुदेवांशी बोलत रहाते. ‘गुरुदेवा, मला वाईट शक्ती पुष्कळ चिडचिड करायला लावतात.  जेव्हा आई, बाबा, आजी आणि आजोबा ‘गुरुदेव दत्त’ हा नामजप करतात, तेव्हा मी हळूहळू शांत होते.’ तिला आपल्यामुळे घरच्यांना त्रास होतो’, याविषयी पुष्कळ खंत वाटते.

४ इ. तिला गुरुदेवांच्या गोष्टी ऐकायला आवडतात.’

स्वभावदोष : चिडचिड करणे, संयम नसणे.’ (या दोषांमध्ये ५० टक्के फरक पडला आहे.)

५. किमयाला आलेल्या अनुभूती

५ अ. मंदिरात गुरुदेवांचे सूक्ष्मातून दर्शन होणे : मंदिरात गेल्यावर किमया सांगते, ‘मला गणपतिबाप्पामध्ये गुरुदेव दिसले. ते माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद देत होते आणि मी हसत होते.’

५ आ. वाढदिवसाच्या दिवशी गणपति आणि गुरुदेव आशीर्वाद देत असल्याचे जाणवणे : २८.३.२०२३ या दिवशी तिथीनुसार किमयाचा वाढदिवस होता. औक्षण करतांना ती आईला म्हणाली, ‘‘माझ्या वाढदिवसाला गणपतिबाप्पा आणि गुरुदेव आले आहेत. ते माझ्या बाजूला आसंदीवर बसले आहेत. ते माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद देत आहेत. मला पुष्कळ आनंद झाला आहे.’’

५ इ. स्वप्नात गुरुदेवांचे दर्शन होणे : ७.४.२०२३ या दिवशी संध्याकाळी झोपेतून उठल्यावर ती  म्हणाली, ‘‘गणपतिबाप्पा माझ्या स्वप्नात आले. मला त्यांच्यामध्ये गुरुदेव दिसले. गुरुदेवांनी मला उचलून घेतले. ते मला विचारत होते, ‘माझ्याबरोबर आश्रमात येतेस का?’ मी गुरुदेवांना विचारले, ‘आश्रम कुठे आहे ?’ गुरुदेव म्हणाले, ‘आश्रम पुष्कळ दूर आहे.’ मी म्हटले, ‘मला तुमच्या आश्रमात यायचे आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक ४.३.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.