मुंबईत बोकाळलेल्या ‘संदेशखालीं’चे करायचे काय ?

बंगालच्या संदेशखाली या भागात तृणमूल काँग्रेसचा गुंड नेता शाहजहान शेख याला अटक करायला आणि त्याच्या घरी छापा घालायला सक्तवसुली संचालनालयाचे (‘ईडी’चे) पथक गेले होते. तेव्हा त्यांच्यासह केंद्रीय पोलिसांवरही शाहजहानच्या गुंडांनी जोरदार आक्रमण केले होते. अशा अनेक संदेशखाली मुंबईसह महाराष्ट्रात अन्यत्र आहेत, जेथे हिंदूंना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. त्याकडे ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या ‘प्रतिपक्ष’ या ‘यू ट्यूब’ वाहिनीच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ते ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी लेखस्वरूपात देत आहोत.

१. गुंड किंवा माफिया यांचे साम्राज्य वाढण्यापूर्वी त्यांची दहशत मोडून काढणे आवश्यक !

‘काट्याचा नायटा होणे’, अशी एक मराठीत म्हण आहे, म्हणजे अंगावर एक बारीकशी पुटकुळी आलेली असते. तिला एक टोक असते. आपण ते जितके खाजवतो, तेवढे त्याचे विषाणू अन्यत्र फैलावत जातात. त्यातून एका पाठोपाठ पुटकुळ्या निर्माण होतात आणि बघता बघता तेथे आजाराप्रमाणे एक त्वचारोग निर्माण होतो. त्याला ‘नायटा’ म्हणतात. त्यामुळे पुटकुळी आल्यावर तिला खाजवत बसण्यापेक्षा वैद्य किंवा डॉक्टर यांच्याकडून उपचार करून घेणे आवश्यक असते, अन्यथा त्या काट्याचा ‘नायटा’ होतो. यालाच ‘काट्याचा नायटा होणे’, म्हणतात. त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनातही अनेक बाहुबली गुंड असतात आणि त्यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर ते पोलिसांना शिरजोर होऊन समाजासाठी धोकादायक सिद्ध होतात. असे अनेक गुंड आणि बाहुबली आपले सुरक्षित अन् सुखनैव असलेले जीवन असुरक्षित करून टाकतात आणि जगणे हेच संकट करतात. उत्तरप्रदेश किंवा बिहारमध्ये असे अनेक बाहुबली होते. त्यांनी गुन्हेगारीचे अड्डे निर्माण केले होते. त्यांच्या बळावर ते राजकारणातही दादागिरी करायला लागले होते. राज्य सरकार आणि प्रशासन यांवरही हे गुन्हेगार आणि माफिया हुकूमत गाजवायला लागले होते. उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना मोकाट रान करून दिले आणि ‘एनकाऊंटर’ (चकमक) करून तेथे डझनावारी बाहुबली गुंड यांचा बिमोड केला. अनेक राज्यांमध्ये आजही असे गुंड माफिया असतात. ते केवळ त्यांच्या परिसरातील लोकांना छळतात आणि दहशतीखाली ठेवतात असे नाही, तर मतदानही प्रभावित करत असतात. काल परवा उत्तरप्रदेशमध्ये मुख्तार अन्सारी नावाचा गुंड कारागृहात हृदयघाताने मृत्यू पावला. तेव्हा त्याच्या अंत्यसंस्कारासाठी परिसरातील सहस्रो लोक जमले होते. ही गंमत नाही. त्यांची दहशत कायद्याहून मोठी निर्माण होती; म्हणूनच त्या माफियाच्या घरी त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव जाऊन पोचत असतात.

२. बंगालच्या संदेशखालीमध्ये धर्मांध गुंडांकडून ‘ईडी’ आणि केंद्रीय पोलीस दल यांच्यावर आक्रमण 

शाहजहानच्या गुंडांनी ‘ईडी’ आणि पोलीस यांच्यावर केलेले आक्रमण केले

 

मध्यंतरी आपल्याला आठवत असेल की, बंगालच्या संदेशखाली या भागात तृणमूल काँग्रेसचा गुंड नेता शाहजहान शेख याला अटक करायला आणि त्याच्या घरी छापा घालायला सक्तवसुली संचालनालयाचे (‘ईडी’चे) पथक गेले होते. त्यांच्या समवेत केंद्रीय पोलिसांचे पथकही होते. तेव्हा या पथकांवर शाहजहानच्या गुंडांनी जोरदार आक्रमण केले. त्यामुळे ‘ईडी’ आणि पोलीस यांचे अनेक अधिकारी घायाळ झाले होते. तेव्हा त्या विरोधातील साधा प्रथमदर्शनी माहिती अहवाल (एफ्.आय.आर्.) तृणमूल काँग्रेसचे सरकार आणि पोलीस प्रविष्ट (दाखल) करून घ्यायला सिद्ध नव्हते. ते तक्रार घेत होते; पण त्यात त्या शाहजहानचे नाव घालण्यास सिद्ध नव्हते. अर्थात् हे लोक न्यायालयात गेल्यावर न्यायालयाच्या आदेशाने ‘एफ्.आय.आर्.’मध्ये शाहजहानचे नाव प्रविष्ट करण्यात आले. त्यानंतर तब्बल ५५ हून अधिक दिवस तो बंगालच्या पोलिसांना सापडत नव्हता. त्याचे कारण शाहजहान याने आसपासच्या परिसरात राज्यघटना आणि कायद्याचे राज्य यांना आव्हान देणारे एक साम्राज्य उभे केले होते. तेथील लोकसंख्याही त्याची रयत असल्याप्रमाणे त्याच्या साम्राज्याचा बचाव करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेवर आक्रमण करण्यासाठी पुढे सरसावली होती. त्यामुळे असे अड्डे निर्माण होण्याला आजच्या भाषेत ‘संदेशखाली’ म्हटले पाहिजे.

श्री. भाऊ तोरसेकर

३. महाराष्ट्रातही विविध संदेशखाली अस्तित्वात

युद्धाच्या कथा ऐकायला मजेशीर वाटतात, असे म्हटले जाते.  आपल्याला एकमेकांवर वार करणारी भाषा आवडते; पण प्रत्यक्ष युद्ध तेवढे मनोरंजक नसते. ती हिंसा असल्याने भयावह असते. माणसांचा मृत्यू आणि रक्तपात हे कल्पनेत चांगले असते; पण ते वास्तवात येते, तेव्हा भयंकर असते. त्यामुळे बंगालचे संदेशखाली, उत्तरप्रदेशमधील माफिया मुख्तार अन्सारी किंवा अतिक अहमद यांच्या बातम्या ऐकतो, तेव्हा त्या आपल्याला मनोरंजक किंवा ‘ब्रेकिंग न्यूज’ वाटतात. तसेच असे काही आपल्या आसपास नाही, यावर आपण समाधानी असतो. हे आपल्या आसपास नाही, हाही आपला भ्रम असतो; कारण आपल्या आसपास असे लहान-मोठे ‘संदेशखाली’ निर्माण होत आहेत, याचा आपल्याला पत्ताच नसतो.

गुंड किंवा माफिया यांची दहशत अमान्य करणारा किंवा त्यांच्या टोळीत अथवा त्यांच्या पंथात न बसणार्‍याला त्या वस्तीतून हुसकावून लावले जाते आणि त्यांच्या गटात बसू शकणारा त्यांच्या कळपात आणून बसवला जातो, तसेच आसपासच्या समाजातील वस्त्या हटवून केवळ एका पंथातील लोकांची दाट वस्ती निर्माण केली जाते आणि मानवी तटबंदी उभी केली जाते. त्यातून संदेशखालीसारखे अड्डे किंवा बालेकिल्ले सिद्ध होतात. संदेशखालीमध्ये शाहजहानने त्याच्या इशार्‍यावर वारूळातून मुंग्या बाहेर पडाव्यात, तशी माणसे समोरच्यावर तुटून पडावीत, अशा लोकांची एक दाट वस्ती निर्माण केली होती. त्यांच्या बातम्या वाचून आपण रमतो; पण आपल्याला माहिती आहे का की, अशा संदेशखाली आपल्याही आसपास उभ्या रहात आहेत ?

काही वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांचे एक पथक तेथील कोण्यातरी गावात साकीब नाचन या जिहादीला पकडायला गेले होते. तेव्हा अख्ख्या गावाने पोलिसांवर मोठे आक्रमण करून त्यांना पळवून लावले होते. शेवटी पोलिसांना मोठा फौजफाटा घेऊन जाऊन त्या जिहादी नाचनला पकडावे लागले होते. वर्ष १९९२-९३ मध्ये बाबरी अयोध्येत पाडली गेली होती; पण पहाता पहाता मुंबई दंगलीच्या आगडोंबात लोटली गेली होती; कारण तेव्हा असेच लहान-मोठे अड्डे मुंबईच्या परिसरात निर्माण केले होते. मुंबईमध्ये तेथील लोकसंख्येच्या २०-२५ टक्क्यांहून अधिक मुसलमान नसतील, तरीही ते ८५ टक्के हिंदूंना ओलीस ठेवू शकले; कारण ते एकेका ठिकाणी दाट वस्ती करून राहिले होते. त्या दाट वस्तीत त्यांचा बाहुबली रहात असतो. आजही दाऊद इब्राहीमची मदनपुरा भागातील मालमत्ता लिलावात काढली, तरी ती घ्यायला कुणी सिद्ध होत नाही, एवढी दहशत आहे. तो पाकिस्तानात आहे; पण येथे त्याची दहशत किती आहे ? यालाच ‘संदेशखाली’ म्हणतात.

४. मुंबईतील संदेशखालीसारख्या वस्त्यांकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

हे सांगण्यामागे कारण असे की, गेल्या काही मासांत मुंबईत अशा ४-५ घटना घडल्या, ज्यात हस्तक्षेप करण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री आणि भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांना स्वत: जाऊन पोलीस ठाण्यात हस्तक्षेप करावा लागला. त्यात काळबादेवीची घटना आहे, भोईवाड्याची घटना आहे, मालवणीची घटना आहे, कुर्ल्याची घटना आहे. यांसारख्या ५-६ ठिकाणी घटना घडल्या आहेत. त्या विखुरलेल्या होत्या. तेव्हा त्या लक्षात आल्या नव्हत्या. अजूनही संदेशखालीसारखे प्रचंड घडलेले नाही; पण त्या त्या विभागात बसलेले धर्मांध गुंड, मस्तवाल, दुकानदार किंवा बाहुबली तेथील बिगर मुसलमान लोकांना हुसकावून लावण्याचे काम करतात. यात दोन ठिकाणी तर दलित कुटुंबांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा ठिकाणी विश्व हिंदु परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांचे लोक पुढाकार घेतात. त्याला स्थानिक पोलीस ठाण्यांकडूनही साहाय्य मिळत नाही. पोलीस ठाण्यात किती भ्रष्टाचार आहे, हे मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी पोलीस कर्मचार्‍यांनीही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, एक दिवस हे लोक तुमच्यावरही उलटल्यावाचून रहाणार नाहीत.

५. हिंदु आणि दलित यांच्यावरील अत्याचारांकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देणे आवश्यक !

उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस

माझ्या आठवणीप्रमाणे वर्ष १९८४-८५ मध्ये खेतवाडी, भिवंडी अशा ठिकाणी दंगली झाल्या होत्या. तेव्हा कामाठीपुरा भागात धर्मांध गुंडानी गोखले नावाच्या एका पोलीस अधिकार्‍याचा गळा चिरून त्याला दुकानाच्या फळीच्या खाली लपवून ठेवले होते. जेव्हा असले बाहुबली जिहादी धर्मांध शिरजोर होतात, तेव्हा ते पोलिसांच्या डोक्यावर मिर्‍या वाटल्याखेरीज रहात नाही. अशा घटना समोर येतात, तेव्हा त्यात पीडित कोण आहे ? कोण नाडला जातो ? कोण पिडला जातो ? त्याचा धर्म न पहाता त्याला संरक्षण देण्यासाठी पोलीस खात्याने पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी पालकमंत्र्यांना समोर येण्याची आवश्यकता नाही. काळबादेवी, भोईवाडा, मालवणी, कुर्ला इत्यादी ठिकाणच्या ५-६ घटनांची माहिती मुंबईच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या ‘ट्विटर’वरील (आता ‘एक्स’वरील) सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्या आहेत. एखाद्या मंत्र्याला त्या त्या ठिकाणच्या गुंडांना वेसण घालण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागते, हे महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाला प्रतिष्ठा देणारे नाही. फडणवीस यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते, त्यातूनच पालघरसारखी घटना घडत असते.

पालघरमध्ये दळणवळण बंदीच्या काळात जमावाने २ साधू आणि त्यांचा चालक यांना मारहाण करून त्यांचे जीव घेतले. ते धाडस त्यांना का झाले ? तो जमाव इतका हिंसक होता की, ते साधू पोलिसांच्या आश्रयाला गेले असतांनाही त्या पोलिसांनी त्यांना जमावाकडे सोपवले. मी असे म्हणणार नाही की, त्या वेळी पोलिसांनीही मरायला पाहिजे होते; पण त्या पोलिसांवर ती परिस्थिती का आली ? कारण पोलीस ठाण्ो जमावाला उद्दामपणा करण्याची संधी देत आले होते. आज हिंदु आणि दलित तरुणांना हुसकावून लावून त्यांच्या रहात्या जागा किंवा त्यांच्या वस्तीतील घरे यांवर ताबा मिळवला जातो, तेव्हा त्यांना न्याय देण्यासाठी मंगलप्रभात लोढा यांसारखा मंत्री तथा मुंबईचा पालकमंत्री हा विविध ५-६ पोलीस ठाण्यात जातो. वास्तविक अशा पीडित आणि गांजलेल्या लोकांसाठी पोलीस ठाण्याने पुढाकार घेतला पाहिजे.

त्यांच्याविषयी राजकीय काहूर माजले, तर पालकमंत्री लोढा यांनी पोलिसांच्या कायदेशीर कारवाईला पाठिंबा देण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेणे, ही गोष्ट वेगळी आहे; पण पोलिसांनी कृतीशील होण्यासाठी आणि ‘हिंदु किंवा दलित नागरिकांवर अन्याय अत्याचार होत आहे. त्याची नोंद घ्या रे बाबा’, अशी विनंती करायला पालकमंत्र्यांना पोलिसांकडे जावे लागणे, ही मुंबई पोलीस खात्यासाठी अत्यंत शरमेची गोष्ट आहे. एकाच वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस यांना मी विनंती करीन की, एका मंत्र्याने सलग या घटना त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर प्रसारित केल्या आहेत. त्याची गंभीर नोंद घेऊन अत्यंत कठोर पाऊले उचलली गेली पाहिजेत, तसेच त्यात गृहमंत्र्यांनी बारीक लक्ष घातले पाहिजे, असे माझे ठाम मत आहे.

६. पीडितांनी पालकमंत्र्यांकडे धाव घेणे, हे पोलीस विभाग आणि शासनकर्ते यांच्यासाठी अयोग्य ! 

पालकमंत्री म्हणून लोढा यांनी पोलीस ठाण्यात जाणे रास्त आहे; पण ते गृहमंत्री नाहीत. नागरी, सामाजिक, प्रशासकीय आणि कायदेशीर समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी जाणे योग्य आहे; पण ही कायदा व्यवस्थेची समस्या आहे. जेव्हा पालकमंत्र्याकडे नडलेले, पिडलेले हिंदू आणि दलित धाव घेतात, तेव्हा ती गोष्ट मुंबईचे पोलीस आयुक्त अन् गृहमंत्री यांना अयोग्य असते. जेव्हा या समस्यांच्या ‘काट्याचा नायटा’ होऊ शकत असतो, तेव्हा तो वेळीच आवरला पाहिजे. अन्यथा मुंबईच्या विविध भागांमध्ये संदेशखालीसारखे अड्डे निर्माण होतील. म्हणून मी प्रारंभी ‘काट्याचा नायटा’ होणे म्हणतो, तेव्हा ते काटे असलेल्या काळात उखडले पाहिजे आणि नुसते उखडून न थांबता त्यावर इतके कठोर उपाय केले पाहिजे की, त्याचा नायटा होण्याची शक्यताही मावळली पाहिजे.

मंत्री लोढा यांचा गृहखात्याशी संबंध नाही. त्यांना धाव घ्यावी लागते आणि कुणामुळे ? विश्व हिंदु परिषद आणि हिंदु जनजागृती समिती या राजकारणबाह्य संघटनांना आपला हिंदु समाज, धर्म, विचार अन् भूमिका या लोकांना वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरवावे लागते, हे कुठल्याही पोलीस खात्याला शोभादायक नसते. दुर्दैव असे की, याच्या बातम्याही होत नाहीत. मंगलप्रभातसारखा एक मंत्री त्याच्या ‘एक्स’वर या गोष्टी प्रसारित करतो; पण त्या प्रसारमाध्यमांवर दाखवल्या जात नाहीत. त्या दाखवण्याची नामुष्की आमच्यासारख्या ‘यू-ट्यूब’ चॅनेलवर येते. हे शासनकर्त्यांनाही शोभादायक नाही. तुम्ही सत्तांतर घडवले; पण पालघरच्या साधूंचे हत्याकांड घडले, तशीच परिस्थिती आजही असेल आणि मंत्री लोढा यांना धाव घ्यावी लागत असेल, तर ते अयोग्य आहे. सामान्य नागरिकांच्या मनात आणि आयुष्यात पालट घडवण्यासाठी शासनकर्त्यांनी प्रयत्न करत राहिले पाहिजे. तो पालट घडला असता, तर मंगलप्रभात लोढा यांसारख्या लोकांना अशा गोष्टींसाठी धाव घ्यावी लागली नसती किंवा त्या पीडित नागरिकांना त्यांच्या रहात्या घरात, वस्तीत, गल्लीत जीव मुठीत धरून जगण्याची वेळी आली नसती.’

– श्री. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार

(साभार : ‘प्रतिपक्ष’ यू ट्यूब वाहिनी)

संपादकीय भूमिका

महाराष्ट्रासह देशात निर्माण झालेली ‘संदेशखाली’सारखी ठिकाणे यंत्रणांनी समूळ उखडून न काढल्यास देशात अराजकता दूर नाही !