केंद्रीय पुरातत्व विभागाकडून पुन्हा एकदा श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे अशास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्याचे निश्‍चित !

मंदिर सरकारीकरणाचे घोर दुष्परिणाम !

  • १४ आणि १५ एप्रिल या दिवशी मूर्तीचे संवर्धन करणार

  • भाविकांना दर्शन घेण्यासाठी उत्सवमूर्ती ठेवण्यात येणार

श्री महालक्ष्मीदेवी

कोल्हापूर – पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केंद्रीय पुरातत्व विभागाला श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन करण्याविषयी कळवले होते. त्यानुसार केंद्रीय पुरातत्व विभाग १४ आणि १५ एप्रिल या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन करणार आहे.

या कालावधीत भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेता येणार नाही. त्या कालावधीत भाविकांना उत्सवमूर्ती आणि कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तरी भाविकांनी पितळी उंबर्‍याच्या बाहेरून कलश आणि उत्सवमूर्ती यांचे घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी केले आहे. (धर्मशिक्षणाच्या अभावामुळे योग्य उपाययोजना न काढता रासायनिक लेपन यांसारखी वरवरची उपाययोजना करणे अयोग्य आहे. तरी प्रशासनाने किमान आता मूर्तीच्या निर्णयासाठी धर्माचार्य, संत यांचे मत घेऊन त्याप्रमाणे कृती करावी ! – संपादक)

संवर्धनाचे मूर्तीवर विपरीत परिणाम होत असतांनाही त्याविषयी आग्रही असणारे प्रशासन हिंदुद्रोहीच !

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या मुखाच्या उजवीकडील भागावर नाकापासून गालापर्यंत गेलेला तडा आणि झालेली झीज

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर वर्ष २०१५ मध्ये रासायनिक वज्रलेपनाची प्रक्रिया केली होती. या वज्रलेपनाला देवीभक्तांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता, तरीही विरोध डावलून ते करण्यात आले. नंतर जेमतेम २ वर्षांतच देवीच्या मूर्तीवरील रासायनिक लेप निघायला आरंभ झाला, मूर्तीवर पांढरे डाग पडायला लागले आणि मूर्तीची झीज होतच राहिली. ही प्रक्रिया करतांना मूर्तीच्या मूळ रूपातच पालट केले गेले. हिंदु जनजागृती समितीने या रासायनिक प्रक्रियेला वारंवार विरोध करूनही धर्मशास्त्रसंमत नसलेले हे रासायनिक लेपन भाविकांवर लादले गेले. नुकतेच पुरातत्व विभागाच्या निवृत्त अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालात आजपर्यंत झालेल्या संवर्धामुळे श्री महालक्ष्मीदेवीच्या गळ्याखालच्या भागांची झीज झाली असून ती झीज २०१५ या वर्षी झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची आहे, तसेच देवीचे नाक, ओठ, हनुवटी या सगळ्यावरती तडे केलेले आहेत, असे स्पष्ट म्हटलेले असतांनाही परत एकदा मूर्ती संवर्धनाचा हट्ट प्रशासनाकडून का केला जात आहे ?

(ही छायाचित्रे देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. –  संपादक)

हे ही वाचा : करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तींची वारंवार रासायनिक संवर्धन करूनही पुन्हा एकदा झीज !