घटस्फोट घेण्याला ‘डायवोर्स रिंग’तून मिळाले ओंगळवाणे रूप !

(डायवोर्स रिंग म्हणजे घटस्फोटाची अंगठी)

न्यूयॉर्क (अमेरिका) – सध्या घटस्फोटाचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात वाढले असून आतापर्यंत जी व्यक्ती घटस्फोट घ्यायची, तिच्यासाठी तो जीवनातील एक मोठा धक्का असायचा. ‘मी समाजात तोंड कसे दाखवू ?’, अशा विचारांनी ती व्यक्ती ग्रस्त असायची. आता मात्र घटस्फोट घेतल्यानंतर ‘मी माझे जीवन हवे तसे जगू शकीन’, असा आत्मकेंद्रित विचार करून लोक घटस्फोट अथवा विभक्त होणारी घटना चक्क ‘साजरी’ करू लागले आहेत. गेल्या काही वर्षांत ‘केक कापून’ असे प्रसंग साजरे केले जात होते; पण आता त्याला आणखी ओंगळवाणे रूप आले आहे, ते म्हणजे ‘डायवोर्स रिंग’चे ! अमेरिकी अभिनेत्री एमिली रताजकोव्स्की यांनी हा विषय जगासमोर जोरकसपणे मांडला आहे.

एमिली म्हणाल्या की, अलीकडेच मी माझ्या साखरपुड्याच्या अंगठीला ‘डायवोर्स रिंग’मध्ये पालटले. मी वर्ष २०२२ मध्ये अभिनेते-निर्माते सेबॅस्टियन बेअर-मॅकलार्ड यांना घटस्फोट दिला. माझी घटस्फोटाची अंगठी माझ्या वैयक्तिक आयुष्याचे प्रतिनिधित्व करते. घटस्फोटानंतर स्त्रीच्या आयुष्यातून पुरुष निघून जात असला; म्हणून त्या स्त्रीने तिच्या हातातील हिर्‍याची अंगठी काढण्याची आवश्यकता नाही, असे मला वाटते. याऐवजी तुम्ही तुमची अंगठी ‘डायवोर्स रिंग’च्या रूपात पालटू शकता.

आत्म-अभिव्यक्तीचा एक सशक्त प्रकार !

न्यूयॉर्कमधील दागिन्यांच्या अनेक दुकानांत गेल्या २-३ वर्षांपासून ग्राहकांसाठी ‘ब्रेकअप’ आणि घटस्फोटाचे प्रतिनिधित्व करणारे दागिने बनवले जात आहेत. ‘असे दागिने हे आत्म-अभिव्यक्तीचा एक सशक्त प्रकार आहे’, असे पाश्‍चात्त्यांचे म्हणणे आहे. पती-पत्नीमध्ये एकमेकांकडून होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास, गैरवर्तन, वेळेची अनुपलब्धता आदी जरी असे असले, तरीही यापूर्वी पती-पत्नी लग्नाला किंवा नातेसंबंधांना चिकटून रहात असत; पण आता अनेक गोष्टी पालटल्या आहेत.

संपादकीय भूमिका 

  • दु:खमय सहजीवनापासून सुटका झाल्याचा साजरा होत आहे आनंद !
  • आत्मसन्मानाच्या नि अहंकाराच्या पोटी आजची तरुण आणि मध्यमवयीन पिढी यांच्यात अशा गोष्टींचा शिरकाव झाला आहे. कुटुंब आणि त्यान्वये समाजव्यवस्था मोडकळीस आणण्याचे हे संकेत असून यातून भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे ?, याचा थोडातरी अंदाज यातून येऊ शकेल !
  • मुळात विभक्त होण्यामागे व्यक्ती-व्यक्तींतील स्वभावदोषच कारणीभूत आहेत. कोणत्याही रोगापेक्षा आत्मकेंद्रीतपणा, अधिकार गाजवणे, मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे, अवास्तव अपेक्षा करणे, समजून घेण्याची वृत्ती नसणे आदी अहंकाराचे पैलू मानवसमूहाला अधिक घातक असून यावर अध्यात्माधारित साधना हाच एकमेव उपाय आहे, हे आपण केव्हा जाणणार ?