तुळापूर (पुणे) येथे छत्रपती संभाजी महाराज यांची ३३५ वी पुण्यतिथी शंभूभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी !

छत्रपती संभाजी महाराज

कोरेगाव भीमा (जिल्हा पुणे) – छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र तुळापूर (तालुका हवेली) येथे भगवे झेंडे, दिंड्या, पताकांसमवेत शंभूराजांच्या जयघोषात ज्योती घेऊन येणार्‍या शंभूभक्तांच्या गर्दीने ८ एप्रिलला संपूर्ण तुळापूर परिसर फुलून गेला होता. शासकीय मानवंदना, तसेच शंभूराजांच्या मूर्तीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यांना अभिवादन करण्यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही तुळापूरला भेट देत पुष्पहार अर्पण केला. खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार आढळराव पाटील यांचे पुत्र अपूर्व आढळराव पाटील यांच्यासह शंभूभक्तांनी तुळापूरला भेट देत शंभूराजांना अभिवादन केले.

पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती आणि श्रीक्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत अन् ग्रामस्थ यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३५ व्या बलीदान स्मरणदिनानिमित्त छत्रपती शंभूराजांना पूजाअभिषेक, पोवाडे, व्याख्याने, पालखी मिरवणूक, साहसी मदार्नी खेळ, तसेच रक्तदान शिबिर, असे कार्यक्रम झाले. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून पूजाभिषेक करण्यात आला, तसेच साखळदंडाचेही पूजन करण्यात आले. या वेळी ह.भ.प. गणेश महाराज फरतळे यांचे व्याख्यान झाले. पोलीसदलाच्या वतीने शंभूराजांना शासकीय सलामीही देण्यात आली. मदार्नी खेळ आणि लातूर येथील शाहीर संतोष साळुंखे यांचा पोवाडा झाला.