सातारा, ११ एप्रिल (वार्ता.) – ‘नायट्रेट सल्फर’ या स्फोटक पदार्थाच्या कांड्यांची धोकादायकरित्या वाहतूक करून त्यांची विक्री करू पहाणारे पोपट बिचुकले यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कह्यात घेतले. त्यांच्याकडून स्फोटक पदार्थांच्या ४० कांड्या आणि हुंडाई क्रेटा गाडी असा २१ लाख ६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे आणि स्फोटक पदार्थ जवळ बाळगणार्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलिसांनी दिले होते. त्यानुसार कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला. पोलिसांनी बिचुकले यांना अडवून त्यांच्याकडे कसून चौकशी केली. तेव्हा गाडीमध्ये स्फोटक पदार्थ असल्याचे आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखेने गाडी आणि स्फोटक पदार्थ शासनाधीन केले आहेत.