‘आम्ही पनवेल येथे रहायला आल्यावर ‘गृहकृत्य साहाय्यक कसा मिळणार ?’ हा आमच्यापुढे मोठा प्रश्न होता. आम्ही दोघे (मी आणि माझी पत्नी) वयस्कर असल्याने आम्हाला गृहकृत्य साहाय्यकाची अत्यंत आवश्यकता होती. देवाच्या कृपेने ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मनीषा गाडगीळकाकू यांनी सौ. कविता पवार यांना आमच्याकडे पाठवून आमचा हा प्रश्न सोडवला. कविताताईंची ‘कामाची पद्धत, वेळेचे पालन करणे, नीटनेटकेपणा, प्रामाणिकपणा, आत्मीयता’, अशा विविध गुणांमुळे आम्ही प्रभावित झालो. ‘कविता अन्य गृहकृत्य साहाय्यकांपेक्षा पुष्कळ वेगळ्या आहेत’, असे आमच्या लक्षात आले.
चैत्र शुक्ल तृतीया (११.४.२०२४) या दिवशी सौ. कविता पवार यांचा ४१ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मागील २ वर्षांत त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सौ. कविता पवार यांना ४१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा ! |
१. व्यवस्थितपणा
अ. ‘सौ. कविता पवार केर काढतांना चालू केलेले दिवे आठवणीने बंद करतात. केर काढतांना हालवलेल्या वस्तूही त्या न विसरता नेहमी पूर्वस्थितीत ठेवतात.
आ. ‘धुलाईयंत्राची मुख्य कळ बंद करणे, धुलाईयंत्राच्या खोलीचे दार बंद करणे’, हे त्यांच्याकडून कधीही रहात नाही.
इ. त्यांनी घासून विसळलेली भांडी स्वच्छ असतात.
ई. त्या आमच्याकडे पोळ्या करण्याचीही सेवा करतात. त्यांच्या पोळ्या अत्यंत उत्तम दर्जाच्या असतात.
२. वक्तशीरपणा
कविताताई ठरलेल्या वेळीच कामाला येतात. एखाद्या दिवशी त्यात काही पालट होणार असेल, तर त्या तसे आम्हाला भ्रमणभाष करून कळवतात. आम्ही गावाला जाणार असू, तर त्या दिवशी त्या लवकर येऊन काम करून जातात. त्यामुळे आम्हाला ‘त्या येणार कि नाही ?’, अशी काळजी कधीही वाटत नाही.
३. प्रामाणिकपणा
कविताताई त्यांच्या जेवढ्या सुट्ट्या ठरल्या आहेत, तेवढ्याच सुट्ट्या घेतात. सर्वसाधारणपणे शहारात कामाला येणार्या अन्य गृहकृत्य साहाय्यकांमध्ये ‘खोटी कारणे देऊन सुट्ट्या घेणे’, हे नेहमीच आढळते. अन्य गृहकृत्य साहाय्यक त्यांच्या ठरलेल्या सुट्ट्या मासाच्या प्रारंभीच घेतात आणि काही अडचणी आल्यावर वेगळ्या सुट्ट्या घेतात; पण कविताताई असे कधीच करत नाहीत. त्या क्वचितच आणि नेहमी पूर्वकल्पना देऊन सुट्टी घेतात. त्यामुळे ‘अकस्मात् किंवा पुष्कळ वेळ त्यांची वाट पाहून घरातील कामे करावी लागली’, असे कधीही झाले नाही. मला वाटते, ‘अन्य गृहकृत्य साहाय्यकांशी त्यांची तुलना होऊच शकत नाही.’
४. निरपेक्षपणे साहाय्य करणे
आम्हाला कधी काही अडचण असेल आणि आम्ही त्यांना येतांना काही वस्तू आणायला सांगितल्या, तर त्या आठवणीने आणतात. त्यासाठी ‘काही वेगळे मानधन हवे’, अशी त्यांची अपेक्षा नसते; किंबहुना त्यासाठी त्यांना काही दिले, तरी त्या घेत नाहीत.
५. स्वीकारण्याची वृत्ती
त्या त्यांना सांगितलेली प्रत्येक गोष्ट नेहमी स्वीकारतात. त्यामुळे त्यांना काही काम सांगतांना अडचण वाटत नाही.
६. आज्ञापालन
त्यांना आम्ही घरकामाविषयी ज्या गोष्टी सांगतो, त्याचे त्या तंतोतंत पालन करतात. त्या कपडे वाळत घालणे, बालद्या जागेवर ठेवणे इत्यादी गोष्टी सांगितल्यानुसारच करतात. ‘कुठलीही गोष्ट करायची राहिली’, असे त्यांच्याकडून कधीही होत नाही.
७. सत्सेवेची तळमळ
‘त्या सर्व ठिकाणची कामे करून वेळात वेळ काढून प्रासंगिक सेवा आणि सत्संग यांसाठी जातात’, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यातून त्यांची सत्सेवा करण्याची तळमळ दिसते.
८. भाव
कविताताई मनाने निर्मळ आहेत. त्यांच्याशी बोलतांना त्यांच्यात ईश्वराप्रती भाव असल्याचे लगेच लक्षात येते. त्या कधीच अनावश्यक बोलत नाहीत; मात्र साधनेचा विषय असेल, तर त्या उत्स्फूर्तपणे आणि भरभरून बोलतात. ‘कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे आत्मीयतेने साहाय्य करणार्या गृहकृत्य साहाय्यक कविताताई यांच्यातील हे गुण, म्हणजे त्यांची साधना चांगल्या प्रकारे चालू असल्याचे निदर्शक आहेत’, असे मला वाटते.
९. कृतज्ञता
‘ईश्वराने आम्हाला कविताताईंसारख्या साधिका गृहकृत्य साहाय्यक म्हणून दिल्या’, यासाठी ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी थोडीच आहे.’
– श्री. यशवंत शहाणे, सुकापूर, पनवेल. (२८.३.२०२४)