सनातन संस्थेच्या पायाभरणीत अतुलनीय योगदान देणारे निष्ठावान साधक : आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे) !

चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा) या दिवशी आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांचा ६३ वा वाढदिवस झाला. या निमित्ताने ८ एप्रिल या दिवशी आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांची काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/782111.html

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

४. कुशाग्र बुद्धीमत्तेचा साधनेसाठी पुरेपूर वापर करणे

दुर्गेशदादा (एम्.डी. मेडिसिन) एक नामवंत आणि प्रथितयश वैद्यकीय व्यवसायी होते. ‘त्यांनी केलेले आजाराचे निदान एकदम चपखल असते’, याची प्रचीती बर्‍याच साधकांना आलेली आहे. हा लौकिक भाग झाला; परंतु ज्या क्षेत्राशी आपला संबंध नाही, त्या क्षेत्रातील अभ्यासही दादा तितकाच मनापासून करतात आणि त्यात प्रावीण्यही मिळवतात. असे म्हणतात, ‘जे न कल्पी कवी, ते साधक अनुभवी ।’ दुर्गेशदादांच्या संदर्भात त्यांच्यासह सेवा करणार्‍या प्रत्येक साधकाला हे अनुभवता येते. आपण कल्पनाही करू शकणार नाही, इतकी सूत्रे त्यांना सेवेत सुचत असतात. जेव्हा दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू होणार होते, तेव्हा ‘विविध विषयांवर लेखन करणे, बातम्यांना संपादकीय टिपण्या देणे’, अशा अनेकविध सेवा दादा एका कुशल संपादकाप्रमाणे करत असत. त्यात परात्पर गुरु डॉक्टर सुधारणा सांगत. त्याही मनापासून स्वीकारून दादा एकेक लेख अनेक वेळा लिहून काढत. आजही परात्पर गुरु डॉक्टरांकडून आलेली सुधारणा दादांच्या लक्षात रहाते आणि ‘ती त्यांना परत सांगावी लागू नये’, यासाठी दादांची धडपड सर्वाधिक असते.

श्री. योगेश जलतारे

५. दुर्गेशदादांनी सेवांच्या नियोजनाविषयी निगडित सेवांची केलेली पायाभरणी ! 

आरंभीच्या काळात आम्ही साधक अन्य साधकांच्या घरी, तसेच जेथे सेवाकेंद्र असायचे, तेथे राहून सेवा करत असू. साधारण वर्ष १९९९ मध्ये संस्थेचा पहिला आश्रम देवद (पनवेल) येथे उभा राहिला. ‘हे आश्रमजीवन कसे असावे ?’, याचे सर्व नियोजन परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आधीच करून ठेवले होते आणि ते प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याची महत्त्वाची सेवा दुर्गेशदादांनी केली. आश्रमात धान्य विभागाची उभारणी, धान्याचा साठा अन् त्याची देखभाल यांसाठी कार्यपद्धत, ‘स्वयंपाकघरात जेवण न्यून पडू नये किंवा अधिक होऊ नये’, यासाठी साधकपरत्वे किती जेवण लागेल ? त्यासाठी किती धान्य वापरावे लागेल ?’, अशा स्वयंपाकघरापासून, तर संगणकीय तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा करणार्‍या ग्रंथ इत्यादी सेवांसाठी किती साधक सेवेसाठी असतील ? त्यांना किती संगणक लागतील ? त्यांची बैठक व्यवस्था, त्यांना येणार्‍या अडचणींचे निवारण, साधकांमध्ये सेवा करतांना काही मतभेद झाल्यास ते सामोपचाराने सोडवणे, साधकांची कुशलता आणि फलनिष्पत्ती वाढवणे, सेवांचे भविष्यकालीन नियोजन, विविध विभागांसाठी साधकसंख्या इत्यादींचा दूरगामी अभ्यास करून त्यानुसार वर्तमानात आराखडे बांधून नियोजन करणे’, अशा अनेक गोष्टी दुर्गेशदादा स्वतः अभ्यासत आणि त्यानुसार प्रत्येक सेवेची घडी बसवत. आज आश्रमात सर्वच सेवांची घडी अन् कार्यपद्धती सुनिश्चित आहेत आणि चांगल्या सुनियोजित पद्धतीने साधक सेवा करू शकत आहेत; परंतु ‘या सर्व उभारणीमध्ये किती कष्ट घ्यावे लागले ? किती अडचणी आल्या आणि कशा सुटल्या ?’, हे कधीतरी दुर्गेशदादांशी अनौपचारिक संवाद साधून अवश्य जाणून घ्या. ते स्वतःविषयी फार बोलत नसल्याने ‘त्यांनी काय केले ?’, हे ते सांगणार नाहीतच; परंतु त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर ‘त्यांना काय काय करावे लागले असेल ?’, याची थोडीतरी कल्पना आपल्याला निश्चित येईल.’

६. सत्संग घ्यायला आणि निरीक्षण करायला शिकवण्याची अभिनव पद्धत ! 

‘आश्रमात सेवांचा समन्वय आणि सुसूत्रता या दृष्टींनी सत्संग असत. दुर्गेशदादा सत्संगात एका कोपर्‍यात शांतपणे बसलेले असत. त्या वेळी ते सत्संगात प्रत्यक्ष कधीच सहभागी होत नसत; परंतु ते एका कागदावर सत्संगातील सूत्रांची नोंद करून ठेवत आणि सत्संग झाल्यावर सत्संग घेणार्‍याला बोलवून ‘कोणते सूत्र अधिक लांबले ? कोणते अर्धवट राहिले ? कोणते सूत्र चुकले ? कोणते चांगले मांडले ?’, असे सर्व निरीक्षण त्याला सांगत. ‘कोणत्या साधकाला परखडपणे सांगायला हवे होते ? कोणत्या साधकाला प्रेमाने सांगितले असते, तर अधिक परिणामकारक झाले असते ?’, अशी सूत्रेही ते आवर्जून सांगत. त्यामुळे सत्संग घेणार्‍या साधकाला बरेच बारकावे शिकायला मिळत आणि पुढच्या सत्संगात सुधारणा करता येत असे.

दुर्गेशदादा स्वतः त्यांच्याकडील सेवा करतांना इतके व्यग्र असत की, त्यांना मान वर करायला वेळ नसायचा. असे असतांनाही ते आश्रमातील अनेक उणिवा सहजपणे टिपायचे आणि आमच्या लक्षात आणून द्यायचे. मी त्यांना एकदा धाडसाने विचारले, ‘‘तुम्ही हे निरीक्षण केव्हा करता ?’’ तेव्हा त्यांनी तेथे बसल्या बसल्या १० – १२ गोष्टी माझ्या लक्षात आणून दिल्या. तेव्हा ‘निरीक्षणासाठी वेगळा वेळ काढण्याची आवश्यकता नाही, तर ती दृष्टी आपल्यामध्ये हवी’, हा भाग मला त्यांच्याकडून शिकायला मिळाला.

७. साधनेविषयी सुस्पष्ट विचारसरणी !

दुर्गेशदादांनी ‘साधना समजून घेऊन ती कशी करायची ? आपण भ्रम का बाळगायचे नाहीत ?’, अशा विविध गोष्टी स्वतःच्या कृतींतून शिकवल्या. एकदा मी त्यांना विचारले, ‘‘मला मोक्षप्राप्ती करायची आहे, तर मी काय करू ?’’ तेव्हा त्यांनी मला स्पष्ट विचारले, ‘‘तुम्हाला मोक्ष म्हणजे काय हवे आहे ?’’ मी त्यांना म्हटले, ‘‘मला सतत आनंदी रहायचे आहे. जीवन-मृत्यूच्या चक्रांतून मुक्त व्हायचे आहे.’’ त्यांनी माझे कुठेही खच्चीकरण न करता पायर्‍यांची एक आकृती मला काढून मला समजावले, ‘‘आज आपण कोणत्या पायरीवर आहोत ? आणि मोक्ष कुठे आहे ? त्यामुळे प्रतिदिन एकेक पायरी चढत जाण्याचा आनंद घ्या. मोक्षाची पायरी सर्वांत वर आहे. तेथपर्यंत पोचू कि नाही किंवा इतक्या मोठ्या ध्येयाचा विचार न करता छोटी छोटी ध्येये घेऊन वाटचाल करत रहा. एक दिवस मोक्षाचा टप्पाही नक्कीच पार करता येईल.’’

८. वस्तूंच्या खरेदीचे निर्णय अभ्यासपूर्वक, तत्परतेने आणि धाडसाने घेणे

‘साधकांना सेवेसाठी सोयी उपलब्ध करून देणे, त्यांना काय हवे-नको ते पहाणे, संगणक, यूपीएस् इत्यादींची खरेदी’, अशा बर्‍याच तांत्रिक सेवांचा दादा तपशीलवार आणि बारकाईने अभ्यास करायचे, तसेच ते त्या वस्तूंच्या खरेदीचे निर्णयही धाडसाने घ्यायचे. त्यामुळे एखादी समस्या आली आणि निर्णय घेण्यात साशंकता असली की, आम्हाला पहिले नाव दुर्गेशदादांचे सुचायचे. त्यांच्याकडे गेल्यावर ते आम्हाला काही प्रश्न विचारत आणि लगेचच काही कालावधीत त्यासंबंधी निर्णय देत. त्यामुळे ‘एखादी गोष्ट निर्णयासाठी प्रलंबित राहिली’, असे होत नसे. महत्त्वाचे म्हणजे ‘दादांनी एखाद्या वस्तूच्या खरेदीविषयी घेतलेला एखादा निर्णय चुकला’, असे आजतागायत माझ्या ऐकीवात नाही, इतका परिपूर्ण अभ्यास ते करायचे. ईश्वराच्या पैशांचा विनियोग काटकसरीने करत असतांना ‘आवश्यक ते घ्यायलाच हवे’, या गोष्टीचा ते साकल्याने अभ्यास करत.

९. ‘प्रमुख’ म्हणून स्वतःचे वेगळेपण न जोपासणे आणि सर्वसामान्य साधकांप्रमाणे सहज आचरण असणे

व्यवस्थापकीय विभाग कुशलतेने हाताळत असतांना त्यांनी मोठेपणाचा बडेजाव कधी केला नाही. उज्जैन येथे प्रसारासाठी साधकसंख्या अल्प असतांना दादा साधकांना प्रसाराला पाठवत असत आणि ‘निवासव्यवस्थेच्या ठिकाणची स्वच्छता करणे, साधकांसाठी खिचडी इत्यादी स्वयंपाक सिद्ध करणे’, या सेवा स्वतः करत असत. कित्येकदा येता-जाता ‘साधक अंधारात सेवा करत आहेत किंवा बिनापंख्याचे बसले आहेत’, असे दादांना दिसल्यास ते येता-जाता ‘दिवा चालू करणे, ‘पंखा हवा का ?’, असे विचारणे’, अशा कृती सहज करत असत. ‘प्रमुख’ म्हणून त्यांनी स्वतःचे वेगळेपण कधी जोपासले नाही. ते तेव्हाही आणि आताही सर्वसामान्य साधकाप्रमाणे सर्व कार्यपद्धती तंतोतंत पाळतात. मी त्यांना कुठेही विशेषाधिकार किंवा सवलत घेतांना पाहिले नाही. ‘सेवेचे उत्तरदायित्व पहाणारा साधक हा ‘प्रमुख’ नसून ‘सेवक’ असायला हवा’, हे सूत्रही दादांच्या चिंतनातूनच पुढे आले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ते पुष्कळ आवडले आणि तेव्हापासून सनातनच्या इतिहासात सर्वत्र ‘सेवक’ हा शब्दप्रयोग रूढ झाला.

१०. धर्माविषयीचा प्रखर अभिमान आणि सनातन संस्थेविषयीची आत्मीयता 

दुर्गेशदादा पूर्वीपासून धर्मावर आक्रमणे करणार्‍यांचा सडेतोड बौद्धिक प्रतिवाद करतात. त्यांनी वृत्तवाहिन्यांवर चालणार्‍या चर्चासत्रांमध्ये कित्येक जणांना निरुत्तर केले आहे. आज सेवांचे स्वरूप पालटले असले, तरी धर्मावर होणारे विविध आघात पाहून दुर्गेशदादांचा जीव कळवळतो. ‘अयोग्य विचारसरणीचे खंडण व्हावे’, यासाठी ते तळमळतात. मध्यंतरीच्या काळात काही लोक सनातन संस्थेवर अनाठायी टीका करत. तेव्हाही ‘त्याचे उत्तर आपण द्यायला हवे’, या विचाराने ते अस्वस्थ होत. ‘कोणताही गुन्हा केलेला नसतांना सनातन संस्थेला कुणी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करते’, ही गोष्ट त्यांना अस्वस्थ करून सोडते.

११. क्लिष्ट विषय सहज-सुलभ भाषेत मांडणे

‘सनातन संस्थेचे दृक्-श्राव्य सत्संग, विविध विषयांवरील संशोधने किंवा अन्य सादरीकरणे यांची मांडणी कशी असावी ?’, याविषयी सर्वच साधक प्रशिक्षित नसल्याने अज्ञभिज्ञ असत. ‘अशा क्लिष्ट विषयांचे सहज-सुलभ भाषेत सादरीकरण कसे करायचे ? ते रोचकपणे कसे मांडायचे ?’, याविषयी पहिली सेवा दुर्गेशदादांनी लीलया केली आहे. त्यांनी नमुना तयार करून दिल्यानंतर त्याप्रकारे तो विषय मांडला जायचा. आजही दादा अनेक विषयांसंबंधी सखोल चिंतन करून साधकांना ते सोप्या भाषेत समजावून सांगतात. आजही दादांकडे काही वेळा एखादा विशिष्ट ग्रंथ छपाईला जाण्यापूर्वी वाचनासाठी येतो. ‘वाचकांनी तो ग्रंथ वाचल्यावर त्यांना सर्वसाधारणपणे काय प्रश्न पडतील ?’, याचा विचार दादा आधीच करतात आणि ग्रंथामध्ये तशा सूचना सुचवतात.

१२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विश्वास संपादन करणारे दुर्गेशदादा ! 

दुर्गेशदादांची अशी अनेक गुणवैशिष्ट्ये आहेत. त्यांतील काही येथे मांडण्याचा प्रयत्न केला; परंतु सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी संपादन केलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विश्वास ! आजही ध्वनी-चित्रीकरणाच्या संदर्भात एखादा मोठा उपक्रम राबवायचा असल्यास परात्पर गुरु डॉक्टर आवर्जून दादांच्या नावे निरोप पाठवून त्यांना त्यात लक्ष घालायला सांगतात. पूर्वीही कुठलेही तांत्रिक आणि बौद्धिक सूत्र आल्यावर परात्पर गुरु डॉक्टर आधी विचारायचे, ‘‘दुर्गेशला विचारले आहे का ?’’

मिरजला सेवेसाठी असतांना परात्पर गुरु डॉक्टर एकदा मला म्हणाले, ‘‘दुर्गेशचा लाभ करून घ्या !’’ तेव्हा मला त्याचे फार आकलन झाले नव्हते. मी तेव्हा दादांनाही याविषयी विचारले होते. त्यानंतर दादांनी मला ते घेत असलेल्या सत्संगाला बोलवायला आरंभ केला; परंतु आज अनेक वर्षांनी ‘दादांनी स्वतःची कृती आणि विचारसरणी यांतून किती बारीक बारीक गोष्टी आमच्यात रुजवल्या !’, हे आमच्या लक्षात येते अन् कृतज्ञता वाटते. ‘त्यांचे हे गुण आमच्यात रुजणे’, हीच त्यांच्याप्रती खरी कृतज्ञता आणि त्यांचा लाभ करून घेणे असेल. ‘हे सर्व आम्हाला करता यावे’, अशी गुरुचरणी प्रार्थना करतो आणि लेखणीला विराम देतो.’

– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१२.२०२३)

(समाप्त)

दुर्गेशदादांच्या धर्मसत्संगांचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले कौतुक ! 

एरव्ही परात्पर गुरु डॉक्टर दुर्गेशदादांचे बर्‍याच सेवांसाठी कौतुक करतातच; परंतु जेव्हा वर्ष २००५ – २००६ मध्ये सनातन संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच काही दृक्-श्राव्य सत्संगांची निर्मिती करण्यात आली, तेव्हा त्यांनी दादांचे केलेले कौतुक विशेष उल्लेखनीय होते. या सत्संगांची गती संथ होती. त्यांत मनोरंजनाचा काही भाग नव्हता, तसेच फार हालचाली नव्हत्या. त्यामुळे काही मनोरंजनप्रिय साधकांना हे सत्संग कंटाळवाणे वाटायचे. जेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांना हा विषय कळला, तेव्हा ते म्हणाले, ‘‘दूरचित्रवाहिन्यांवरील मनोरंजनात्मक मालिका पाहून किती जणांचे ध्यान लागते ? किती जणांना अनुभूती येतात ? या मालिका पहाणारे पहातात आणि विसरून जातात; पण दुर्गेशचे सत्संग पाहून साधकांना अनुभूती येतात. आज जरी सत्संग कंटाळवाणे वाटत असले, तरी त्यांतील विषय साधकांच्या अंतर्मनात बीजरूपात जाईल आणि ते आज नव्हे, तर उद्या कधीतरी निश्चित साधना चालू करतील.’’

गुरुकार्यात सिंहाचा वाटा उचलूनही त्याविषयी कोणताही अहं न बाळगता अलिप्त असणारे  आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत ! 

‘अधिवक्ता योगेश जलतारे यांच्या लेखातून आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांनी सनातन संस्थेच्या पायाभरणीसाठी किती कष्ट घेतले आहेत !’, याची झलक पहायला मिळते. या लेखाचे संकलन करतांना त्यात वर्णिलेले प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर येत होते. त्या वेळी मी पूर्वी अनुभवलेले दुर्गेशदादांविषयीचे काही प्रसंग मला आठवले आणि ‘परात्पर डॉ. आठवले यांनी दुर्गेशदादांच्या साथीने लावलेले सनातनरूपी वृक्षाचे बीज अंकुरित होऊन आता त्याचा वटवृक्ष झाला आहे’, या जाणिवेने माझी भावजागृती झाली. दादांकडे पाहून वाटणारही नाही की, त्यांनी एवढे मोठे दायित्व पार पाडले आहे. त्यांच्या बोलण्यातून तसे कधी व्यक्तही झाले नाही. ‘गुरूंप्रतीची निष्ठा, त्याग, त्यांनी केलेली गुरुसेवा, धडाडी’ इत्यादी त्यांच्यातील गुणांना आणि हे गुण हेरून त्यांच्याकडून अफाट कार्य करून घेणार्‍या परात्पर डॉ. आठवले यांना कोटी कोटी वंदन !’

– सुश्री (कु.) दीपाली होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०२४)