नवी मुंबईतील बेलापूर-पेणधर मेट्रोच्या वेळेत वाढ !

प्रतिकात्मक चित्र

पनवेल – मेट्रो प्रवाशांच्या मागणीनंतर सिडको महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ केली आहे. बेलापूर मेट्रो स्थानक येथून शेवटची मेट्रो रात्री ११ वाजता पेणधरच्या दिशेने रवाना होईल, तर पेणधर मेट्रो स्थानक येथून शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता बेलापूरच्या दिशेने रवाना होईल.

रात्री १० वाजेपर्यंत शेवटची मेट्रो धावत असल्याने हार्बर मार्गे तळोजा येथे येणार्‍या प्रवाशांना खारघर रेल्वेस्थानकाबाहेरून खासगी रिक्शा अथवा इको व्हॅन यांनी प्रवास करावा लागत होता. या परिसरात पथदिवे अनेक ठिकाणी नसल्याने रात्रीचा प्रवास धोकादायक होता. सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासमोर प्रवाशांची वाढीव वेळेची मागणी ठेवल्यानंतर त्यांनी तातडीने ही मान्य केली. साडेचार महिन्यांपासून ही मेट्रो चालू आहे. आतापर्यंत साडेचार लाख प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला.