छत्रपती शंभूराजांनी रामसेजच्या (जिल्हा नाशिक) लढाईत औरंगजेबाला आणले जेरीस !

आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाला ३३५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने…

छत्रपती शंभूराजांना जखडलेल्या अवस्थेत ज्या वेळी औरंगजेबासमोर उभे करण्यात आले, तेव्हा कवी कलश याने औरंगजेबासमोर संभाजी महाराज किती श्रेष्ठ आणि महान आहेत, त्याचे वर्णन करतांना म्हटले,

‘यावन रावन की सभा, संभू बंध्यो बजरंग ।
लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रणरंग ।
ज्यो रवि छवि लखत ही, खद्योत होत बदरंग ।
हे राजन, तुव तप तेज निहारी के, तखत तज्यो अवरंग ।।

(भावार्थ : रावणाच्या सभेत हनुमानाला जसे बांधून आणले होते त्याप्रमाणे शंभूराजांना औरंगजेबासमोर बांधून आणले. हनुमंताच्या अंगाला जसा शेंदूर शोभून दिसतो त्याप्रमाणे रणांगणात माखलेल्या रक्ताने शंभूराजे शोभून दिसतात. सूर्यासमोर काजव्याचा प्रकाश जसा नाहीसा होतो, त्याप्रमाणे शंभूराजांचे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या राजसिंहासनाचा त्याग केला.)

अशा तेजस्वी शंभूराजांनी स्वतःचे शौर्य आणि रणनीती यांच्या बळावर औरंगजेबाला हैराण केले. त्याचे उत्तम उदाहरण, म्हणजे रामसेजचा गड औरंगजेबाला जिंकता आला नाही. धर्मवीर शंभूराजांचे शौर्य आणि युद्धनीती यांना विनम्र अभिवादन !

१. शंभूराजांनी मोगलांच्या मुलखावर आक्रमण करून बहादूरखानाला बहादूरगडावरून खाली उतरवणे

श्री. दुर्गेश परुळकर

औरंगजेब स्वतःला महाबलाढ्य सम्राट समजत होता. त्याच्याजवळ असलेले अफाट सैन्य आणि त्या काळातील प्रभावी शस्त्रास्त्रे होती. सर्वत्र त्याचा दरारा होता. छत्रपती शंभूराजांना आपण सहज आपल्या धाकात ठेवून मराठ्यांचे राज्य नष्ट करू शकतो, असे औरंगजेबाला वाटत होते; पण त्याला महाराष्ट्राची भूमी न जिंकताच प्राण सोडावा लागला.

शंभूराजांनी स्वतःच्या विलक्षण युद्धनीतीच्या बळावर औरंगजेबाला हैराण केले. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना एका ठिकाणी स्वस्थपणे ठाण मांडून बसू दिले नाही. औरंगजेबाचा सरदार बहादूरखान कोकल्ताश मराठ्यांच्या सैन्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बहादूरगडावर तळ ठोकून बसला होता. बहादूरखानाला बहादूरगडावरून घालवून देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी वेगळीच रणनीती आखली. त्यांनी बहादूरगडावर स्वारी केलीच नाही. संभाजी महाराजांनी मोगलांच्या मुलखावर, म्हणजेच नगर, नाशिक, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी धाडी टाकण्यास आरंभ केला. मोगल सैन्याची अशी धारणा होती की, मराठे मोगलांच्या भागावर आक्रमण करण्यासाठी येणार नाहीत; कारण बहादूरगडावर ठाण मांडून बसलेल्या बहादूरखानावर आक्रमण करून तो गड स्वतःच्या कह्यात घेण्याचा मराठे प्रयत्न करतील.

‘शत्रूला जे वाटते ते आपण करायचे नाही, तर शत्रू ज्याची कल्पना करणार नाही, ती गोष्ट आपण करायची असते’, ही युद्धनीती छत्रपती शिवरायांकडून संभाजीराजांनी चांगलीच जाणून घेतली होती. त्याचाच उपयोग संभाजी महाराजांनी केला. मराठ्यांनी मोगल सैनिकांवर अचानक आक्रमण करून त्यांना यमसदनी धाडले. एवढेच नाही, तर मोगलांची ठाणी सुद्धा लुटली. त्यामुळे मोगली मुलखाचे रक्षण करण्यासाठी बहादूरखानाला बहादूरगडावरून खाली उतरावे लागले. बहादूरखानाचे सैन्य मराठ्यांपर्यंत येऊन पोचण्याच्या आत मराठ्यांचे सैन्य वेगाने निघून जात होते. मराठ्यांचा पाठलाग करून त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतांना बहादूरखानाच्या आणि त्याच्या सैन्याच्या तोंडाला फेस आला. पराकोटीचे प्रयत्न करूनही मराठ्यांचे सैन्य त्याच्या हाती लागत नव्हते.

२. मराठ्यांनी औरंगाबाद शहर लुटणे आणि मोगलांच्या सैन्यासमोर स्वतःचा दबदबा निर्माण करणे

एप्रिल १६८१ मध्ये मराठ्यांची एक तुकडी औरंगाबादवर चालून गेली (जे औरंगजेबाच्या नावानेच वसवलेले शहर होते.). मराठ्यांनी तेच शहर लुटून नेले. मराठे औरंगाबाद शहर लुटत असतांना बहादूरखान हा औरंगाबाद जवळच्या बाभुळगावात (२६८ कि.मी. लांब) होता. ‘मराठे आक्रमण करून आलेले आहेत’, ही वार्ता कळताच बहादूरखान औरंगाबादला तातडीने आला; पण तो येण्याच्या आतच मराठे औरंगाबाद लुटून निघून गेले होते. मराठ्यांच्या सैन्याला अडवण्याचे धाडस राजा अनुपसिंहाला झाले नाही, उलट तोच घाबरून लपून बसला होता. ‘मराठे अचानक आक्रमण करतात आणि बघता बघता अदृश्य होतात’, याचा धसका औरंगाबादमधील जनता अन् मोगलांचे सैन्य यांनी घेतला होता. मराठ्यांनी औरंगाबादवर आक्रमण करून तिथल्या जनतेला आणि सैन्याला बेजार केले. अशा परिस्थितीत काय करावे, हे औरंगजेबाला कळले नाही. तो सुन्न झाला.

नाशिकमधील रामसेजचा गड

३. प्रचंड सैन्यासह आलेल्या शहाबुद्दीनखानाला रामसेजच्या युद्धात पराभव पत्करावा लागणे

छत्रपती संभाजी महाराजांच्या आक्रमकतेला थोपवण्यासाठी औरंगजेबाने त्याचा महान सेनापती शहाबुद्दीन फिरोजजंग याला नाशिकमधील रामसेजचा गड जिंकण्यासाठी मोठे सैन्य देऊन पाठवले. हा गड जिंकण्यासाठी फार कष्ट पडणार नाहीत, असा औरंगजेबाचा समज होता; कारण रामसेज गडाची उंची भूमीपासून अदमासे दीड सहस्र फूट होती, तसेच त्या गडावर मराठ्यांचे ६०० पेक्षा अधिक सैन्य नव्हते. शहाबुद्दीन फिरोजजंग ३० सहस्र सैन्य, प्रचंड दारूगोळा, तोफखाना घेऊन रामसेज गड जिंकण्यासाठी निघाला. त्या वेळी त्याच्यासमवेत रामसिंह बुंदेला, महंमद खलील, शुभकर्ण बुंदेला, राव दल्पत बुंदेला, कासिम खान हे प्रमुख सरदार होते. शहाबुद्दीन फिरोजजंग याने रामसेज गडावर वेढा घातला. मोगलांचे ३० सहस्र सैन्य रामसेज गडावर तुटून पडले. गडावरचा किल्लेदार आणि त्याचे सैन्य घाबरले नाही. मराठ्यांनी प्रचंड दगडफेक करून मोगल सैन्याचे आक्रमण थोपवून धरले. मोगल सैन्याच्या विविध प्रकारच्या लष्करी डावपेचांना मराठ्यांच्या सैन्याने दाद दिली नाही. २२ दिवस प्रचंड सैन्यासह रामसेज गड जिंकण्याचा प्रयत्न शहाबुद्दीनने केला; पण त्यात त्याला तीळमात्रही यश प्राप्त झाले नाही.

रामसेज गड हातचा जाऊ द्यायचा नाही; म्हणून शंभूराजांनी रूपाजी भोसले आणि मानाजी मोरे यांच्या समवेत १० सहस्र सैन्य देऊन त्यांना शहाबुद्दीनने घातलेला वेढा उठवण्यासाठी पाठवले. मराठ्यांचे सैन्य येत असल्याचे कळताच शहाबुद्दीन गर्भगळीत झाला आणि प्रारंभी त्याने मराठ्यांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला; पण मराठ्यांचा आवेश पाहून त्याची प्रतिकारशक्ती नष्ट झाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शहाबुद्दीनखानला रणांगणातून पळून जावे लागले. मराठ्यांनी रामसेजचा गड मोगलांच्या हाती जाऊ दिला नाही आणि प्रचंड सैन्यासह आलेल्या शहाबुद्दीनखानाला पराभव पत्करावा लागला.

४. रामसेजचा गड जिंकण्यासाठी बहादूरखानाने लढवलेली क्लृप्ती मराठा सैन्याने हाणून पाडणे आणि त्याला माघार घ्यावी लागणे

रामसेजचा गड जिंकण्यासाठी बहादूरखानाला बहादूरगडावरचा तळ हलवावा लागला. त्याने रामसेजला वेढा घातला आणि ६ मास झाले, तरी बहादूरखानाला रामसेज  जिंकता आला नाही. बहादूरखानाने रामसेज गड जिंकण्यासाठी एक वेगळाच डाव टाकण्याचे ठरवले. त्याने गडाच्या एका बाजूला आक्रमण करणार असल्याची आवई उठवली. तोफा, दारूगोळा असे युद्ध साहित्य जमा केले. लष्करातील लोक आणि अन्य यांना गडाच्या एका बाजूला गोळा केले. हेतूत: एकच गोंधळ उडवून दिला. यातून या बाजूकडूनच शत्रू आक्रमण करणार, असा मराठ्यांचा समज जाणीवपूर्वक करून देण्यात आला. बहादूरखानाने गडावर तोफा डागण्याची आज्ञा केली. त्याच वेळी मोगलांचे सैन्य रामसेजवर चढून जाऊ लागले. मराठ्यांनी मोठमोठ्या आकाराचे दगड, पेटते गोळे, तेलात भिजवलेल्या पेटत्या कापडांचे बोळे मोगल सैन्यावर फेकण्यास आरंभ केला. अशी रणधुमाळी चालू असतांना बहादूरखानाचे निवडक अदमासे २०० मोगल सैनिक गडाच्या मागच्या बाजूने गड चढण्यासाठी पुढे सरसावले. गडाच्या मागच्या बाजूने मराठ्यांकडून कोणत्याही प्रकारचे आक्रमण होण्याची शक्यताच नव्हती. त्याचा लाभ मोगल सैन्याने उठवत ते दोराला धरून हळूहळू गड चढू लागले.

गडाच्या एका भागात घनघोर लढाई चालूच होती, त्यामुळे गडाच्या मागच्या बाजूने मोगल सैनिक गडावर पोचतील, याची बहादूरखानाला खात्री होती. तटावर बहादूरखानाच्या २ सैनिकांनी दोर आवळून धरले होते. त्या दोराच्या साहाय्याने मोगलांचे सैनिक गडावर चढत होते. अचानकपणे त्या २ सैनिकांच्या डोक्यात मावळ्यांनी जोरदार सोटे हाणल्यामुळे ते दोघेही दरीत कोसळले. त्यामुळे अर्ध्या डोंगरावर चढून आलेले मोगल सैनिक दरीत कोसळले. अशा प्रकारे बहादूरखानाचा पुढून आणि मागून आक्रमण करण्याचा डाव उधळला गेला. अखेरीस बहादूरखानाला माघार घेणे भाग पडले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

५. रामसेज गडाचा पराभव औरंगजेबाच्या पचनी न पडल्याने त्याने छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्याची प्रतिज्ञा करणे

औरंगजेब मात्र रामसेज गड जिंकता येत नाही; म्हणून अस्वस्थ झाला होता. माघार घेणे त्याला मान्य नव्हते. औरंगजेबाने बहादूरखानाच्या मागे तो गड कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी तगादा लावला. मराठ्यांची इच्छाशक्ती आणि लष्करी डावपेच यांच्या पुढे  औरंगजेबाच्या सैन्याला हात टेकावे लागले. हा पराभव औरंगजेब पचवू शकला नाही. त्याचा संताप अनावर झाला. त्याने आपल्या डोक्यावरची पगडी खाली फेकली आणि त्याने प्रतिज्ञा केली, ‘जोपर्यंत या काफिराला (छत्रपती संभाजी महाराजांना) पकडणार नाही किंवा ठार मारणार नाही, तोपर्यंत पुन्हा पगडी घालणार नाही.’ त्याचीही प्रतिज्ञा रामसेज गडाच्या कानावर गेली आणि गडावरचा भगवा ध्वज अधिक डौलाने फडकू लागला.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (४.४.२०२४)