नोकरी प्रामाणिकपणे करणारे आणि आईची सेवा मनापासून करणारे फोंडा, गोवा येथील श्री. दिलीप नलावडे (वय ६० वर्षे) !

उद्या, फाल्गुन कृष्ण त्रयोदशी (७.४.२०२४) या दिवशी श्री. दिलीप नलावडे यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. विद्या नलावडे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. दिलीप नलावडे यांना ६० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
श्री. दिलीप नलावडे

१. कधीही अवैध मार्गाचा अवलंब न करणे

‘यजमान पोलीस खात्यात नोकरीला होते. तेव्हा प्रत्येक ५ वर्षांनी त्यांचे स्थानांतर व्हायचे. त्यांचे काही सहकारी पैसे भरून ‘ज्या ठिकाणी अवैध मार्गाने पैसे मिळतात’, अशा ठिकाणी स्थानांतर करून घेत असत; परंतु यजमानांनी तसे कधीही केले नाही. श्री गुरूंच्या कृपेने त्यांचे स्थानांतर प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात ‘जिथे भ्रष्टाचार करण्याची संधी मिळते’, अशा ठिकाणी न होता कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी होत असे.

२. वर्ष २००० मध्ये आम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला.

३. नोकरीत असतांना ‘पदोन्नती मिळावी’, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे

सौ. विद्या नलावडे

वर्ष २००४-२००५ मध्ये यजमानांनी पोलीस उपनिरीक्षक (पी.एस्.आय.) पदाची परीक्षा देण्याचे ठरवले. त्यांची अधिकारी होण्याची तीव्र इच्छा होती. त्यांचे सहकारी पैसे भरून अधिकारी झाले होते; परंतु त्यांचा निश्चय होता, ‘मी एकही पैसा न भरता माझ्या स्वतःच्या प्रयत्नाने अधिकारी होईन.’ त्यासाठी त्यांनी २ मास सुट्टी घेऊन प्रतिदिन १२ – १३ घंटे अभ्यास केला; परंतु दुर्दैवाने परीक्षा २ दिवसांवर आली असतांना काही कारणाने रहित झाली आणि नंतर ती परीक्षा झालीच नाही.

४. गृहरचना संस्थेची बैठक घेतांना उदबत्ती लावून प्रार्थना करून बैठक घेणे

यजमान डोंबिवली येथे आम्ही रहात असलेल्या गृहरचना संस्थेचे ६ वर्षे सचिव (सेक्रेटरी) होते. प्रतिमास गृहरचना संस्थेच्या सभासदांची बैठक घेतांना ते तिथे उदबत्ती लावून प्रार्थना करूनच बैठक घ्यायचे. त्यामुळे सर्व सभासदांना पुष्कळ चांगले वाटायचे. ते गृहरचना संस्थेची कामेही प्रामाणिकपणे करायचे.

५. सासूबाई रुग्णाईत असतांना त्यांची भावपूर्ण सेवा करणे

वर्ष २०१६ मध्ये माझ्या सासूबाई पडल्यामुळे रुग्णाईत झाल्या. त्या शेवटपर्यंत, म्हणजे वर्ष २०२० पर्यंत झोपूनच होत्या. त्यांचे सर्व अंथरुणातच करावे लागायचे. आम्ही घरातील सदस्य एकेक मास त्यांची सेवा करण्यासाठी गावी जायचो. यजमानांनी सासूबाईंची सेवा मनापासून आणि कृतज्ञतेच्या भावाने केली. सासूबाईंचे खराब झालेले कपडे धुण्यासाठीही ते मला साहाय्य करत असत. ते मला सांगायचे, ‘‘आपण आईची सेवा करतो, हे कुणालाही सांगायचे नाही. आपण असे इतरांना सांगितले, तर आपला अहंकार वाढेल.’’ नंतर पुढे सासर्‍यांचे निधन झाल्यावर सासूबाई डोंबिवली येथे आमच्या समवेत रहात असत. यजमान प्र्रतिदिन कामाला जातांना आणि कामाहून आल्यावर सासूबाईंना नमस्कार करत असत. ते म्हणायचे, ‘‘माझी आई माझे दैवत आहे.’’ त्यांनी कधीच आई-वडिलांचे मन दुखावले नाही.

६. पत्नीची काळजी घेणे

मी रुग्णाईत असतांना त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली. घरातील कामे करणे, सामान आणणे, औषधे आणणे इत्यादी सर्व त्यांनी मनापासून आणि सेवाभावाने केले.

७. कृतज्ञताभाव 

त्यांच्यासाठी कुणी काही केले, तर त्यांच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी पुष्कळ कृतज्ञताभाव असतो.

८. जाणवलेला पालट

अ. पूर्वी यजमानांच्या मनात मायेचे पुष्कळ विचार असायचे. आता त्यांच्या मनातील मायेचे विचार न्यून झाले आहेत.

आ. त्यांची भावनाशीलताही आता न्यून झाली असून आता ते स्थिर असतात.

‘हे गुरुदेवा, तुमच्याच कृपेने यजमानांमधील गुण माझ्या लक्षात आले’,  यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. विद्या नलावडे (श्री. दिलीप नलावडे यांची पत्नी), फोंडा, गोवा. (१७.३.२०२४)