(म्हणे) ‘कच्चाथीवू बेटावरील भारताचा दावा निराधार !’ – डगलस देवानंद, श्रीलंकेचे मत्स्यपालन मंत्री

श्रीलंकेचे मत्स्यपालन मंत्री डगलस देवानंद यांचे वक्तव्य

डगलस देवानंद

जाफना (श्रीलंका) – तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी श्रीलंकेला भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये असलेले कच्चाथीवू बेट भेटस्वरूप दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी काँग्रेसच्या विरोधात यावरून आरोप केले आहेत. याविषयी श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनंतर आता मत्सयपालन मंत्री डगलस देवानंद यांनी वक्तव्य केले आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, कच्चाथीवू बेट श्रीलंकेकडून परत घेण्याच्या भारताच्या वक्तव्याला काही आधार नाही. भारतात निवडणुकीचा काळ आहे. अशा वेळी कच्चाथीवू बेटावरून असे दावे-प्रतिदावे होणे नवीन नाही !

श्रीलंकेच्या मंत्र्यांकडून सातत्याने अशी विधाने होत असतांना भारत सरकारकडून अद्याप याविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. तसेच भारताने कच्चाथीवू श्रीलंकेकडून परत मागण्याविषयीही काही विधान करण्यात आलेले नाही.

सौजन्य Oneindia News

देवानंद पुढे म्हणाले की,

१. . वर्ष १९७४ मध्ये झालेल्या करारानुसार दोन्ही देशांचे मासेमार दोन्ही देशांच्या समुद्री क्षेत्रांत मासेमारी करू शकत होते; पण वर्ष १९७६ मध्ये या करारात पालट करण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांच्या मासेमारांना परस्परांच्या समुद्री क्षेत्रात मासे पकडण्यावर प्रतिबंध घालण्यात आला.

२. भारतात कन्याकुमारीच्या जवळ वाड्ड समुद्र आहे. कच्चाथीवूपेक्षा ते ८० पट मोठे क्षेत्र आहे. वर्ष १९७६ मध्ये झालेल्या समीक्षा संशोधनानुसार वाड्ड समुद्र आणि त्यातील सगळी नैसर्गिक साधनसंपत्ती यांवर भारताचा अधिकार आहे.

३. भारत या जागेला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या हिताच्या दृष्टीने काम करत आहे, जेणेकरून श्रीलंकेचे मासेमार तिथे पोचू शकणार नाहीत. आम्ही त्या भागावर कुठलाही दावा केलेला नाही.

संपादकीय भूमिका 

कच्चाथीवूवरून याआधी श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही असेच वक्तव्य केले होते. मुळात माहिती अधिकार कायद्याच्या खाली कच्चाथीवू बेट हे काँग्रेसने कोणत्याही परताव्याविना श्रीलंकेला देऊ केल्याची माहिती मिळाली होती. याविषयी करार झाल्याचा इतिहास असतांना श्रीलंकेने तो नाकारणे, हे हास्यास्पद होय !