१. स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना एका मोठ्या वाहनातून रुग्णालयात नेतांना पहाणे आणि नंतर ते सत्य असल्याचे एका साधिकेकडून समजणे : ‘एप्रिल २०१२ मध्ये मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पांढर्या रंगाच्या एका मोठ्या गाडीतून रुग्णालयात नेतांना पाहिले. त्या वेळी मी आणि संभाजीनगरचे १ – २ साधक रुग्णालयाबाहेर थांबलो होतो. परात्पर गुरु डॉक्टर पुष्कळ वेळ आतच (रुग्णालयातच) होते. हे स्वप्न मला जवळ जवळ २ ते ४ घंटे दिसत होते.
त्यानंतर एक मासाने मला रामनाथी आश्रमातून डॉ. आरती तिवारी हिचा भ्रमणभाष आला. तिने सांगितले, ‘‘काकू, परात्पर गुरु डॉक्टरांनी तुमची आठवण काढली होती आणि त्यांनीच तुम्हाला भ्रमणभाष करायला सांगितला आहे.’’ हे ऐकून मला प्रथम आश्चर्य वाटले आणि नंतर माझी भावजागृती झाली. मी तिला म्हणाले, ‘‘अगं, मलाही त्यांची पुष्कळ आठवण येत होती आणि त्यांच्याविषयी एक स्वप्नही पडले होते. त्यांना रुग्णालयात नेले होते का ? तेथे त्यांना पुष्कळ वेळ लागला होता का ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘हो, त्यांना दात काढण्यासाठी रुग्णालयात नेले होते. तेथे त्यांना पुष्कळ वेळ लागला होता.’’
देवाने मला ही अनुभूती देऊन कृतकृत्य केले होते. परात्पर गुरु डॉक्टरांचा विचार आला नाही, असा माझा एकही क्षण जात नाही. ‘ते माझ्यासारख्या क्षुद्र जिवाचीही आठवण काढतात’, याची मला प्रचीती आली. देवा, अजून मला काय हवे ? त्या वेळी मी ‘अंतराळातच आहे’, असे अनुभवत होते. मला मी धन्य झाल्याचे वाटत होते.
२. स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टरांच्या हृदयाजवळ विश्वदर्शन होणे आणि काही दिवसांनंतर प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांनी ‘ॐ श्री विश्वदर्शन देवताय नमः ।’ हा नामजप साधकांना करायला सांगितल्याचे कळणे : ‘जुलै २०१४ च्या पहिल्या आठवड्यात मला स्वप्न पडले. मी झोपतांना ‘प.पू. डॉक्टर’ असा नामजप करत झोपते. स्वप्नात मला परात्पर गुरु डॉक्टर दिसले. ते हसत होते. त्यांनी अंगात निळसर रंगाचा सदरा घातला होता. माझे त्यांच्या हृदयाकडे लक्ष गेले. तेव्हा तेथे मला संपूर्ण विश्व दिसले. मला पुष्कळ चांगले वाटत होते. नंतर ८ ते १० दिवसांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांनी ‘ॐ श्री विश्वदर्शन देवताय नमः ।’ हा नामजप करायला सांगितला असल्याचे छापून आले. ते वाचतांना मला ‘देवाने आधीच विश्वदर्शन दाखवले’, हे लक्षात आले आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.
३. रामनाथी आश्रमात अश्वमेध यज्ञ होणार असून त्याचा संकल्प परात्पर गुरु डॉ. आठवले करणार असल्याचे कळल्यावर २ – ३ मासांपूर्वी ‘रामायण’ मालिका पहातांना प्रभु श्रीराम अश्वमेध यज्ञाचा संकल्प करतांना त्यांच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले दिसल्याचे लक्षात येणे : मी एकदा दुपारी दूरदर्शनवर ‘रामायण’ ही मालिका पहात होते. त्यामध्ये ‘प्रभु श्रीराम अश्वमेध यज्ञाचा संकल्प करतात’, असे दृश्य होते. ते पहातांना मला त्यांच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले दिसत होते आणि हे दृश्य मी जवळ जवळ ५ मिनिटे पहात होते. नंतर माझ्या मनात पुढील विचार आले, ‘ही गोष्ट त्रेतायुगातील आहे. या कलियुगात एवढा व्यय करून अश्वमेध यज्ञ होऊ शकेल का ? तरीही मला अश्वमेध यज्ञ करतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर का दिसत होते ?’ हे विचार माझ्या मनात १ – २ मास येत होते.
१ – २ मासांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘रामनाथी आश्रमात ‘अश्वमेध’ यज्ञ होणार आहे आणि त्याचा संकल्प परात्पर गुरु डॉ. आठवले करणार आहेत. तो यज्ञ बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील अश्वमेधयाजी पू. नाना (नारायण) काळेगुरुजी करणार आहेत’, अशा आशयाचे लिखाण आणि छायाचित्रे छापून आली होती. ती मी पाहिली. तेव्हा माझा स्वतःवर विश्वासच बसत नव्हता; कारण गुरुदेवांनी आधीच मला हे दृश्य दाखवले होते. देवा, ही अनुभूती देऊन तू मला धन्य केलेस. तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
४. विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांचा अमृत महोत्सव सोहळा ४ मासांपूर्वीच स्वप्नात अनुभवण्यास देणे : १३.१.२०१५ या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मी परात्पर गुरु डॉक्टरांची पाद्यपूजा करत होते. पूजेची सर्व सिद्धता केली होती. सर्वत्र तेज पसरलेले दिसत होते. सुवर्णपात्रात सप्तनद्यांचे जल, पाद्यपूजेसाठी सुवर्णाची मोठी परात, परात्पर गुरु डॉक्टरांच्या आवडीचे पदार्थ, ओल्या नारळाच्या केशरयुक्त वड्या, आरतीसाठी तुपाची पंचारती, गुरुदेवांना बसण्यासाठी मखमली वस्त्राचे आसन, रत्नजडित आभूषणे, पितांबर आणि गुलाबी रंगाचा शेला ठेवला होता, तसेच मी त्यांच्यासाठी सोनचाफ्याच्या फुलांचा मुकुट, गळ्यातील हार, दंड आणि मनगटे यांवर घालायला गजरेही बनवले होते.
माझी पाद्यपूजा २ ते ३ घंटे चालू होती. मी परात्पर गुरुदेवांच्या चरणांवर चंदनाचे स्वस्तिक काढत होते. तेव्हा माझ्या लक्षात आले की, आज फार थंडी आहे. मग मी देवाने सुचवल्यापमाणे केशराचे स्वस्तिक काढले. त्यावर कुंकू लावले. ‘जय गुरुदेव’, असे म्हणत मी गुरुदेवांना फुलांचे हार, वस्त्रे आणि आभूषणे अर्पण केली. कितीतरी वेळ मी हा दिव्य सोहळा अनुभवत होते. थोड्या वेळाने मला जाग आली, तरीही मी भावावस्थेत होते. हे दृश्य मी प्रतिदिन आठवत होते आणि प्रत्येक वेळी माझी भावजागृती होत होती.
१०.५.२०१५ या दिवशी प्राणप्रिय गुरुदेवांचा अमृतमहोत्सव सोहळा होता. तो पहातांना मला वरील स्वप्न आठवून कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. भगवंता, तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती जयश्री मुळे (वय ७८ वर्षे), फोंडा, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |