पाकव्याप्त काश्मीरमधील संघटनेच्या नेत्याची स्पष्टोक्ती
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकव्याप्त जम्मू-काश्मीर हा घटनात्मकदृष्ट्या पाकिस्तानचा भूभाग नाही, असे विधान पाकव्याप्त काश्मीरमधील प्रमुख शहर मीरपूर येथील अवामी कृती समितीचे प्रमुख नेते आरिफ चौधरी यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आरिफ चौधरी पुढे म्हणाले की, पाकिस्तानी प्रशासन पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना चांगली वागणूक देत नाही किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करत नाही. या भागांतील लोक अनेक दशकांपासून दडपशाही, दुर्लक्ष आणि त्रास सहन करत आहेत. आम्हाला लुटले जात आहे. बलपूर्वक विस्थापित केले जात आहे. पाकिस्तान येथील लोकांवर अत्याचार करत आहे. पाकिस्तानच्या घटनेच्या कलम २५७ नुसार पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग नाही. या भागाबाबत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वर्ष १९४० च्या दशकात संयुक्त राष्ट्रांच्या ठरावात करार झाला होता. या अंतर्गत, २६ खटल्यांवर निर्णय घेण्याचे अधिकार पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना देण्यात आले होते; परंतु लोकांना अद्याप हे अधिकार मिळालेले नाहीत.
पाकव्याप्त काश्मीर म्हणजे काय ?वर्ष १९४७ मध्ये फाळणीनंतर पाकिस्तानी सैन्याने आदिवासी बंडखोरांच्या साहाय्याने जम्मू-काश्मीरचा हा भाग कह्यात घेतला होता. भारतीय सैन्य हा भाग परत घेण्यासाठी लढत असतांना तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांमध्ये नेला. संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करून युद्धविराम प्रस्थापित केला आणि आहे ती स्थिती ठेवण्यास सांगितले. तेव्हापासून दोन्ही देशांचे सैन्य आंतरराष्ट्रीय सीमेऐवजी नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूला उभे आहे. ही ८४० कि.मी. लांबीची सीमारेषा दोन्ही देशांमध्ये आखलेली आहे. पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरला ‘आझाद काश्मीर’ म्हणतो. सध्या पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरचे गिलगिट आणि बाल्टिस्तान असे २ भाग केले आहेत. |
भारत सरकार वेळोवेळी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याविषयी बोलत आहे. वर्ष २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची मागणी जोरकसपरे केली जात आहे.