Corruption In Goa Elections : निवडणुकीतील आर्थिक गुन्हे रोखणार्‍या पथकातील दोघे भ्रष्टाचारामुळे निलंबित

पणजी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांकडून राज्यात विविध भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या अंतर्गत दाबोळी येथे स्थापन करण्यात आलेल्या ‘माहिती तंत्रज्ञान मॉनिटरिंग’ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पवार आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे नितेश नाईक यांनी २ जणांकडून १६ लाख रुपये उकळल्याचा संशय आहे. या प्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आले असून ‘या संदर्भात पुढील ४८ घंट्यांत सविस्तर अहवाल सादर करावा’, असा निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

शासनाचे सतर्कतेचे आवाहन !

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग किंवा आयकर विभाग यांचे अधिकारी असल्याचा दावा करणार्‍या अनधिकृत व्यक्ती सर्वसामान्य लोकांकडून अनधिकृतरित्या रोकड जप्त करण्यात गुंतल्या आहेत. अशा वेळी संबंधितांचे ओळखपत्र पहावे आणि संशयास्पद आढळल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाला ०८३२ – २७९४१०० किंवा ९३०७२०५७६९ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी केले आहे.

अनिरुद्ध पवार हा मुरगाव पालिकेचा अभियंता, तर नाईक हा वीज खात्याचा कर्मचारी आहे. या दोघांची निवडणुकीच्या अनुषंगाने दाबोळी येथील ‘माहिती तंत्रज्ञान मॉनिटरिंग’ विभागात नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी एका कारवाईच्या वेळी अशोक चौधरी आणि पवनकुमार वर्मा यांच्याकडून १६ लाख रुपये उकळले असल्याचा संशय असून पवार अन् नाईक यांना अटक होण्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका

हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! पथकातील कर्मचारीच भ्रष्ट, तर निवडणूक चांगली होण्यासाठी कोण घेणार कष्ट ?