निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याच्या प्रकरणी बारामतीत विस्तार अधिकार्‍यावर गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक चित्र

बारामती (पुणे) – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘सी व्हिजिल ॲप’वर आलेल्या तक्रारींचे वेळेत निराकरण न करता विनाअनुमती मुख्यालय सोडणे, उपविभागीय अधिकार्‍यांनी विचारणा केल्यावर त्यांना उर्मट उत्तर दिल्याची घटना बारामतीत घडली आहे. उपविभागीय अधिकारी तथा साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रय खंडाळे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.

लोकसभा निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांकडे वेगवेगळे दायित्व देण्यात आले आहे. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रय खंडाळे यांना ‘भरारी पथक क्रमांक १’चे प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. निवडणूक कालावधीत ‘सी व्हिजिल ॲप’वर एखादी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील ५० मिनिटांत त्याची चौकशी करून अहवाल ॲपवर पाठवणे आवश्यक आहे. होळ (ता. बारामती) येथील तक्रारदार दीपक जनार्दन वाघ यांनी या ॲपवर केलेल्या तक्रारीवर दत्तात्रय खंडाळे यांनी वेळेत कार्यवाही न करता उलट उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी जाब विचारल्यावर त्यांच्याशी उर्मटपणे बोलले. परिणामी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (कर्तव्यात कसूर करून वर उर्मट बोलणारे अधिकारी जनतेशी कसे वागत असतील ? – संपादक)