होळीच्या नंतर तिसर्या दिवशी तिथीने शिवजयंती येते. ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला, हिंदवी स्वराज्याची संकल्पना दिली, त्या शिवाजी महाराजांची जयंती आपण गुलामगिरीच्या दिनांकानुसार १९ फेब्रुवारी या दिवशी साजरी करतो, हे आमचे बौद्धिक दारिद्र्यच आहे. रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, बुद्ध पौर्णिमा या अवतारी आणि महापुरुष यांच्या जयंती आपण तिथीने साजर्या करत असतो. मग छत्रपती म्हटल्याबरोबर आसेतु हिमाचल एकच आवाज निनादतो…. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय !’
इतकी एकतानता आणि भारदस्त मंत्रशक्ती ज्या नावात आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण भारतीय तिथीने साजरी करायची सोडून गुलामीच्या इंग्रजी दिनांकानुसार साजरी करणे, हा त्यांच्या कार्याचा विसर पडणेच होय ! चला, फाल्गुन कृष्ण तृतीयेला (होळीच्या नंतर तिसरा दिवस) आपण शिवजयंती साजरी करूया !
– श्री. किशोर पौनीकर, नागपूर. (२६.३.२०२४)