सातारा, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मुक्ताफळे उधळणारे राहुल गांधी आणि त्यांचे समर्थन करणारे यांवर बहिष्कार घाला, असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. राहुल गांधी यांनी शिवछत्रपतींविषयी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या विधानांना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.
खासदार उदयनराजे म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी प्रसिद्धी माध्यमातून म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी इंग्रजांना राज्य प्रस्थापित करण्यासाठी साहाय्य केले. त्यांच्यासमवेत भागीदारी केली आणि ते हे करत होते, म्हणून इंग्रजांनी त्यांना बक्षिसे दिली. महाराजांनी अफू लागवडीविषयी जनतेला प्रोत्साहन दिले. अशी चुकीची विधाने राहुल गांधी यांनी सामाजिक माध्यमांवर केली आहेत. (राहुल गांधी यांनी अशी विधाने केली असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी खासदार उदयनराजे पुढाकार घेणार का ? – संपादक)
वस्तूतः हिंदुस्थानवर आक्रमण करणार्या सर्व परकियांनी त्यांचे साम्राज्य वाढवण्यासाठी लढाया केल्या, देशाची लूट केली, मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले. समाजावर अन्याय केला; मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेवर होणार्या अन्यायाच्या विरोधात लढा उभारून स्वराज्य स्थापन केले. त्यांनी कुणाशीही तडजोड केली नाही. सर्व धर्मियांना राज्यकारभारात सहभागी करून घेतले, त्यांना विचार दिला. त्या आधारावर समाजाची एकजूट करून परकीय आक्रमणे परतवून लावली. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानास्पद बोलून राहुल गांधी यांनी देशाचा आणि राज्याचा अपमान केला आहे. राहुल गांधी यांच्याविषयी पोलिसात तक्रार न करता निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.’’