सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘आचरणातून आणि सूक्ष्मातून शिकवणे’ हा ग्रंथ वाचल्यावर भावजागृती होणे

आज फाल्गुन कृष्ण तृतीया (२८.३.२०२४) या दिवशी मंगळुरू येथील सनातनच्या ४४ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांचा ८७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना आलेली अनुभूती येथे पाहूया.

पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी

पू. (श्रीमती ) राध प्रभु यांना ८७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा शिरसाष्टांग नमस्कार !

‘१३.२.२०२४ या दिवशी मी नेहमीप्रमाणे पहाटे ४ वाजता उठून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी अनुसंधान साधण्यासाठी बसले होते. गुरुदेवांशी सूक्ष्मातून थोडा वेळ बोलून झाल्यानंतर श्रीमती अश्विनी प्रभु (सून, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी मला गुरुदेवांचा ‘आचरणातून आणि सूक्ष्मातून शिकवणे’ हा ग्रंथ वाचण्यासाठी दिला. मी तो ग्रंथ हातात घेऊन त्यात काय आहे ? हे पहाण्यासाठी मुखपृष्ठावर असलेल्या भावचित्राखाली लिहिलेले वाचले. मी ग्रंथाच्या आतील पानही वाचले. ते वाचत असतांना माझी पुष्कळ भावजागृती झाली. मी मलपृष्ठावरील लिखाणही वाचले. माझ्या नेत्रांतून पुष्कळ अश्रू वाहू लागले. त्यामुळे वाचन करतांना मला त्रास होत होता. मी माझे अश्रू पुसत पुसत सावकाश वाचले. तेवढे वाचण्यासाठी मला एक घंटा लागला. मला पुष्कळ आनंद होत होता. ‘आम्हाला असे श्रेष्ठ गुरु मिळण्यासाठी किती जन्म लागले असतील ?’, असे वाटून कृतज्ञताभाव दाटून येत होता. ‘पुढची पाने संध्याकाळी वाचूया’, असे मी ठरवले. नंतर मी ते पुस्तक २ दिवसांत वाचले. खरोखर हा ग्रंथ प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. उच्च कोटीच्या निर्मळ अनुभूती देणार्‍या नारायणस्वरूप गुरुदेवांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’

– (पू.) श्रीमती राधा प्रभु, मंगळुरू, कर्नाटक. (१३.२.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक