संपादकीय : वाढता वाढता वाढे…!

कवीकल्पनांना धुमारे फुटतात असा समुद्र आणि चंद्र हे निसर्गातील २ महत्त्वाचे घटक ! भारतीय संस्कृतीत तर त्यांना देवत्वच प्राप्त झाल्याने भारतियांची त्यांच्याकडे पहाण्याची दृष्टीही भिन्न आहे. त्यांच्यावर आधारित कालगणनेचे अवघड गणित आपल्या ऋषिमुनींनी घालून ठेवले आहे; परंतु आजचे विज्ञानही पुराव्यांसह हे सिद्ध करते की, पृथ्वी, चंद्र, सूर्य, समुद्र यांची गती कोट्यवधी वर्षांपासून पालटत आहे. ४५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरचा दिवस ८ घंट्यांचा, १४ कोटी वर्षांपूर्वी १८ घंट्यांचा होता. १ सहस्र ६०० वर्षांपूर्वीही तो २४ घंट्यांपेक्षा थोडा अल्प होता. त्यामुळे साहजिकच पृथ्वीवर मोठी उलथापालथ आतापर्यंत झाली आहे आणि अर्थात्च यापुढेही होणार आहे.

सहस्रो वर्षे मानवी मनाला गवसणी घालणारा हा सागर जेव्हा अक्राळविक्राळ स्वरूप धारण करतो, तेव्हा मात्र सर्वांची पाचावर धारण बसते. गेल्या काही वर्षांत जगभरात पूर आणि वादळे येण्याचे प्रमाण, तसेच समुद्राचे पाणी शहरात शिरण्याचे प्रमाण वाढले आहे. काही देशांत प्रशासन सतर्क, वेगवान आणि तांत्रिकदृष्ट्या पुढारलेले असल्याने पूरस्थितीतही अनेकांचे प्राण वाचवले जातात. वर्ष २००४ मध्ये थायलंडमधील ‘फुकेट’ सागर किनार्‍यावर सहस्रो पर्यटक पर्यटन करत होते, तेव्हा तिथेच पर्यटन करत असलेल्या १० वर्षांच्या एका मुलीला ‘समुद्राचे पाणी मागे मागेच जात आहे’, असे दिसले. तिला शाळेत शिकवलेले आठवले की, ‘जेव्हा मोठी सुनामी येणार असते, तेव्हा असे होते.’ तिने पालकांना सांगितले आणि पालकांनी प्रशासनाला हे कळवले. प्रशासनाने तत्परतेने सर्व पर्यटकांना तेथून हालवले, तसेच सागरी किनार्‍यावरील वस्तीही रिकामी केली. त्यानंतर आलेल्या प्रचंड मोठ्या सुनामीने हा सागरकिनारा सोडून अन्य सागर किनार्‍यांवर प्रचंड मोठी हानी केली. नंतर या मुलीला तेथील राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. ‘समुद्राला वारंवार मोठी भरती येण्याचे प्रमाण ५० वर्षांपूर्वीच्या तुलनेत ३०० ते ९०० टक्क्यांनी वाढले आहे’, असे संशोधन संस्थांचे निरीक्षण आहे.

वर्ष १८८० पासून जागतिक सरासरी समुद्र पातळी ८ ते ९ इंच, म्हणजे २१ ते २४ सेंटीमीटर (सेंमी) वाढली आहे. सध्या जगातील समुद्राची पातळी वर्ष १९०० च्या तुलनेत सरासरी ५ ते ८ इंच म्हणजे १३ ते २० सेंमी अधिक आहे. गेल्या दशकात समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याचा जागतिक सरासरी दर ३.६ मिमी प्रतिवर्ष होता. वर्ष २०२२ मध्ये जागतिक सरासरी समुद्र पातळी वर्ष १९९३ च्या पातळीपेक्षा १०१.२ मिमी, म्हणजे ४ इंच वाढली. या शतकाच्या शेवटी जागतिक सरासरी समुद्र पातळी वर्ष २००० च्या पातळीपेक्षा न्यूनतम १ फूट म्हणजे ०.३ मीटर वाढण्याची शक्यता आहे.

जागतिक तापमानवृद्धी

सध्या ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे (जागतिक तापमानवृद्धीमुळे) समुद्राची पातळी सरासरी २ प्रकारे वाढत आहे. प्रथम जगभरातील हिमनद्या आणि बर्फाचे तुकडे वितळत आहेत अन् समुद्रात पाणी भरत आहे. दुसरे म्हणजे जसजसे पाणी गरम होते, तसतसे समुद्राच्या पाण्याची पातळी प्रमाण वाढत आहे. अमेरिकेच्या अलास्का राज्यातील केनाई पर्वतातील ‘आयलिक बे’ या भागात असे लक्षात आले की, ज्या ठिकाणी पूर्वी हिमनग होते, ते वितळून त्याच्या नद्या झाल्या, तलाव झाले आणि तेही आटून तिथे आता चक्क गवताळ प्रदेश निर्माण झाला आहे. याचाच अर्थ पृथ्वीवरील भौगोलिक भाग पालटत आहे. हिमनगाच्या जागी प्रदेश निर्माण होत आहेत. भविष्यात समुद्राची पातळी वाढून त्याने भूमीवर आक्रमण केले, तर आश्चर्य वाटायला नको. अमेरिकेत समुद्राला मोठी भरती येण्याचे प्रमाण वाढल्याने तेथील काही समुद्रकिनारे म्हणजे ‘दलदल’ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अमेरिकेत ३० टक्के लोक किनारपट्टी भागांत रहातात.

भरती-ओहोटीचे दीर्घकालीन मोजमाप आणि अलीकडील उपग्रहांनी पाठवलेली छायाचित्रे यांवरून असे लक्षात येते की, जागतिक समुद्र पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पृथ्वीवरच्या अनेक प्रजाती या समुद्राच्या पातळीवर अवलंबून असतात.

चंद्राचा समुद्राच्या पातळीवर परिणाम !

साडेतीन लाख किलोमीटर दूर असलेला चंद्र समुद्राच्या पाण्याला प्रभावित करत असल्यामुळे भरती आणि ओहोटी येते, हे शास्त्र आपल्याला ठाऊक आहे. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे एका ठराविक अंतरावरून चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. पृथ्वी आणि चंद्र एकमेकांना चुंबकीय शक्तीप्रमाणे आकर्षित करत असतात. २४ घंट्यांत पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते आणि चंद्रही पृथ्वीभोवती फिरत असतो. पृथ्वीचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वी आणि चंद्र फिरतांना ज्या भागाच्या संपर्कात चंद्राचा फुगवटा अधिक असतो, तिथे भरती येते आणि चंद्राचा फुगवटा अल्प असतो, तिथे ओहोटी असते. पृथ्वी आणि चंद्र या दोहोंच्या भ्रमणामुळे पृथ्वीवर २४ घंट्यांत २ वेळा भरती-ओहोटी येते आणि त्यांच्या या भ्रमणामुळेच समुद्राचे पाणी संतुलितही रहाते. म्हणजेच चंद्रामुळे समुद्राची पातळी प्रतिदिन वर-खाली होत असते. चंद्र आणि पृथ्वी यांचे फिरणे आणि त्यांचे गुरुत्वाकर्षण यांचा परिणाम पृथ्वीवरच्या महासागरांवर झाल्याने त्यांतील पाणी खवळल्याप्रमाणे हालचाल करते. त्यामुळे समुद्राचे पाणी पुढे येते. चंद्र पृथ्वीभोवती फिरता फिरता अंशाअंशाने त्याची जागाही पालटत असतो. चंद्र पृथ्वीपासून प्रतिवर्षी ३.७८ सेंटीमीटर दूर जात आहे. नासाच्या संशोधनानुसार प्रति साडेअठरा वर्षांनी तो त्याच्या मूळ जागेपासून हलकासा सरकतो. येत्या काही वर्षांत चंद्राच्या अशा सरकण्यामुळे समुद्राच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती येणार आहे. हे वर्ष २०३० असू शकते, असे ‘नासा’ने (‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेश’ने) म्हटले आहे.

जगातील १० सर्वांत मोठी शहरे ही समुद्र किनार्‍याजवळ आहेत. येथे पायाभूत सुविधा आणि उद्योग यांसाठी मोठी बांधकामे केली जातात. त्यासाठी समुद्राच्या पाण्यात भर घालून तो बुजवला जातो. रस्ते, पूल, भुयारी मार्ग, पाणीपुरवठा, तेल आणि वायू विहिरी, वीज प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आदी कामांचा सागराच्या पाण्यावर परिणाम होत असतो. अमेरिकेच्या किनारपट्टीवरील बर्‍याच ठिकाणी भूमीची धूप, तेल काढणे आणि भूजल उपसा यांसारख्या भूमीप्रक्रियेमुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. भारतातही थोड्या अल्प प्रमाणात हीच स्थिती आहे. थोडक्यात म्हणजे निसर्ग त्याच्या नियमानुसार पालटत राहील. मानवाने मात्र वेळीच सावध होऊन आपत्काळात तरून जाण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि भक्ती वाढवून स्वतःला त्यातून तारून नेले पाहिजे !

निसर्गावर मात करून नव्हे, तर त्याच्याशी जुळवून घेण्याची कला मानवाने आत्मसात केली, तरच त्याचा उत्कर्ष शक्य !