बलीदानदिनानिमित्त राजगुरुनगर (पुणे) येथे झळकले क्रांतीकारकांच्या देशभक्तीचे फलक !

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी क्रांतीकारकांचा प्रेरणादायी इतिहास फलकाद्वारे जनतेसमोर आणला !

राजगुरुनगर (जिल्हा पुणे) – भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात योगदान अथवा बलीदान दिलेल्या देशभरातील क्रांतीकारकांचे चित्र, नाव आणि बलीदान दिवस, तसेच कार्याचा गौरव करणारे फलक येथील शहराच्या बाजारपेठेत झळकले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणारे क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरु, भगतसिंह आणि सुखदेव यांचा ९४ वा बलीदानदिन २३ मार्च या दिवशी झाला. त्यानिमित्त खेड तालुक्यातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रेरणादायी इतिहास फलकाद्वारे जनतेसमोर आणला. हुतात्मा राजगुरु, भगतसिंह, सुखदेव, बाबू गेनू सैद, लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाई, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, मंगल पांडे, अरविंद घोष, मदनलाल धिंग्रा आदी क्रांतीकारकांच्या फलकांचा यामध्ये समावेश होता.

असा साजरा झाला क्रांतीकारकांचा बलीदानदिन !

स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, बजरंग दलाचे अधिवक्ता नीलेश आंधळे, कोंडिबा टाकळकर यांनी सांगितले की, हुतात्मा शिवराम हरी राजगुरु, भगतसिंह, सुखदेव यांचा बलीदानदिन शहरात विविध ठिकाणी अभिवादनाने साजरा करण्यात आला. सकाळी ९ वाजता राजगुरुनगर बसस्थानक परिसरातील हुतात्मा राजगुरु, भगतसिंह, सुखदेव यांच्या स्मृतीशिल्पांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

हुतात्मा स्मारक, भीमा नदीतीरावरील राजगुरु वाड्यावर अभिवादन कार्यक्रम झाला. येथे सकाळी १० वाजता ध्वजारोहण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संध्याकाळी बजरंग दलाच्या वतीने शहरातून प्रतिवर्षीप्रमाणे भव्य मशाल मिरवणूक काढण्यात आली.