|
माले (मालदीव) – मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून महंमद मुइज्जू भारतविरोधी आणि चीनसमर्थक धोरण राबवत आहेत. आता मात्र त्यांनी भारताच्या विरोधातील भूमिका मवाळ केल्याचे दिसत आहे. ते म्हणाले की, भारत आमचा जवळचा मित्र राहील. या वेळी त्यांनी भारताकडून कर्ज सवलतीची मागणीही केली. वर्ष २०२३ च्या शेवटापर्यंत मालदीवचे भारताला अनुमाने ४०९ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (३ सहस्र ४०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम) देणे आहे.
मुइज्जू यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, भारताने मालदीवला साहाय्य पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि सर्वाधिक प्रकल्प राबवले. भारत मालदीवचा जवळचा मित्र राहील, यात शंका नाही. मालदीवने भारताकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले आहे. मालदीवच्या आर्थिक क्षमतेनुसार कर्जाची परतफेड करण्यासाठी पर्याय शोधण्यासाठी आम्ही सध्या भारत सरकारशी चर्चा करत आहोत.
भारतीय सैनिकांना मालदीवमधून हटवण्याच्या सूत्रावर भाष्य !
भारतीय सैनिकांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मुइज्जू म्हणाले की, मालदीवमध्ये भारतीय सैन्याच्या उपस्थितीविषयी भारतासमवेतच्या वादाचे हे एकमेव प्रकरण आहे. भारतानेही ही वस्तूस्थिती मान्य केली असून सैनिकांना परत बोलावण्याचे मान्य केले आहे. एका देशाकडून दुसर्या देशाला दिलेले साहाय्य नाकारणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. आपण असे कोणतेही पाऊल उचलले नाही, ज्यामुळे उभय देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण होईल. सरकारने मालदीवमधील भारतीय सैन्याच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी चर्चेद्वारे समंजस उपाय शोधण्याचे काम केले.
संपादकीय भूमिकाभारतद्वेष्ट्या मुइज्जू यांना स्वतःच्या देशातूनच तीव्र विरोध होऊ लागल्यानंतर ते आता नरमाईचे धोरण अवलंबत आहेत ! ‘खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, ही मुइज्जू यांची प्रवृत्ती आहे. निवडणुकीच्या वेळी ‘इंडिया आऊट’ ही भारतविरोधी मोहीम राबवणार्या, भारताला विरोध करणार्या आणि भारतीय सैन्य मालदीवमधून हटवणार्या मुइज्जू यांच्या भूलथापांना भारत सरकारने कदापि बळी पडू नये आणि यापुढेही त्यांच्याशी आताप्रमाणेच रोखठोक धोरण अवलंबवून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी ! |