भाजीच्या एका गोणीत रानडुकरांना दूर ठेवण्यासाठी शेतकर्यांनी बाँब लपवल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न !
चेन्नई (तमिळनाडू) – राज्यातील तिरुपत्तूर जिल्ह्यातील अंबूर शहराजवळ एका गायीच्या तोंडात देशी बनावटीच्या बाँबचा स्फोट झाला. या अपघातात गायीच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली असून पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. गाय कचर्याच्या ठिकाणी चरतांना कोबीच्या एका गोणीत लपवलेला बाँब तिने खाल्ला, तेव्हा हा स्फोट झाल्याचे तिच्या प्रवीण नावाच्या मालकाने सांगितले. ही घटना येथील पालार नदीच्या काठावर घडली. गायीच्या तोंडातून पुष्कळ रक्तस्राव होत होता. तिला उपचारांसाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, स्थानिक शेतकर्यांनी त्यांच्या पिकांची हानी करणार्या रानडुकरांना मारण्यासाठी गोणीत कच्चा बाँब लपवला होता. प्राथमिक तपासात ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचार्यांनी गावातील रस्ते आणि गल्ल्या येथील कचरा गोळा करून नदीकाठावर टाकल्याचे उघड झाले. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील अन्वेषण केले जात आहे.